rajkiyalive

भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी

अमृत चौगुले, जनप्रवास

जिल्ह्यातील सर्वाधिक पक्ष म्हणून बिरुद मिरविणार्‍या भाजपमध्ये उफाळलेल्या गटबाजीतून दस्तुरखुद्द पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांना संघर्ष करावा लागत आहे. पक्षांतर्गत जिरवाजिरवीतून उफाळलेला हा संघर्ष टोकाला पोहोचला असून, या संघर्षाला आता हायकमांडही वैतागले आहे. दोन्हीकडून एकमेकांवर कडी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. कोणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पक्षांतर्गत कार्यक्रमांतही याचे दर्शन घडत असून, परिणामी कार्यकर्त्यांतही विभागणी होऊन उमेदवारी बदलण्याचा आग्रह ते न झाल्यास त्यांच्या पराभवाचे सर्व्हे सांगत जागा धोक्यात आल्याचा सूर आहे. यामुळे दोघेही पक्षांत एकाकी पडले असून, दोघांनीही एकमेकांना हात देत सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यात 2014 मध्ये मोदी लाटेतून लोकसभेच्या रूपाने भाजपचे कमळ फुलविण्यासाठी संजय पाटील यांना महायुतीतून पालकमंत्री डॉ. खाडे, आमदार अनिल बाबर, माजी मंंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख,या दुष्काळी फोरमच्या सवंगड्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आदींनी मदत केली. त्याचा परिणाम म्हणून माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्याविरोधात वारंवार लढून राजकारणात होणार्‍या गळचेपीतून सुटका झाली.

राजकीय करिअरला खासदारपदाची भरारी मिळून जिल्ह्याच्या केंद्रस्थानी येण्याची संधी चालून आली. काळाच्या ओघात दिग्गज नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील यांच्या निधनाने विरोधक कमी होऊन संजय पाटील यांना राजकारणात मोकळे रान झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यारूपाने सोयीस्कर राजकारणाचा वरदहस्तही होता. तीच परिस्थिती सुरेश खाडे यांच्या बाबतीतही होती.

पण दुर्दैवाने दोन 2014 नंतर जरी पक्षाने भरारी घेतली तरी खाडे व पाटील या दोघांनाही नेतृत्वाच्या संधीचे सोने करता आले नाही. विशेषत: संजय पाटील यांनी तर जिल्ह्याचे पक्षाचे सर्वसमावेशक नेतृत्व करण्याऐवजी स्वत:चा स्वतंत्र गट करीत सोबतीच्या सर्वांचेच कार्यक्रम करण्याचे प्रयत्न केले. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीतील विरोधकांना जवळ करण्याचे प्रकार होत राहिल्याने जिवाभावाचे सर्वच सहर्‍यांची नाराजी ओढावून घ्यावी लागली. त्याचा परिपाक म्हणून 2019 च्या निवडणुकीतच अडचण झाली होती. सर्वांनी विरोध केल्याने उमेदवारीही अडचणीत आली होती. परंतु तत्कालिन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांनी पुढाकार घेऊन त्यावर पडदा टाकत समझोता घडवून आणला होता. त्यामुळे खासदार पाटील यांचे मताधिक्य निम्म्यावर आले तरी विजयाची संधी मिळाली.

त्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्यांच्यात सुधारणा झाली नाही. उलट हे कुरघोड्यांतून लोण वाढतच गेले. त्यातून त्यांनाही त्याचा फटका बसला, एकदिलाच्या अभावाने आणि पाठपुराव्याअभावी रांजणी ड्रायपोर्टचा विषय मागे पडला. सलगरे लॉजिस्टिक पार्कच्या जागेतूनही माघारी पत्करावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना खुद्द भाजपचेच पदाधिकारी आता खुलेआम भेटू लागले. आमदार सुमनताई पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील उपोषण सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांशी मध्यस्ती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर यांनी केली. पालकमंत्री खाडे यांनाही नाईलाजास्तव उपोषण सोडविण्यासाठी जावे लागले. एकप्रकारे संजय पाटील यांना मतदारसंघात घरचा आहेरच आहे.

हेही वाचा
भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

आता तर खुलेआम त्यांना उमेदवारी नको असा जवळजवळ सर्वांनीच पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे पृथ्वीराज देशमुख उमेदवारीच्यादृष्टीने संपर्कमोहीम आणि मोर्चेबांधणी करीत असून, त्यांना पक्षांतर्गत सर्वजण मदत करीत आहेतच. दुसरीकडे संजय पाटील विरोधकही बळ देऊ लागलेत. त्यामुळे संजय पाटील यांची सांगता येत नाही अन् सोसवत नाही अशी अवस्था झाली आहे. तरीही त्यांनी उमेदवारीच्यादृष्टीने प्रयत्न सुरू ठेवलेच आहेत. आता त्यांना एकमेव साथ आहे ती पालकमंत्री खाडे यांची.

दुसरीकडे खाडे यांनाही मतदारसंघात गटबाजीतून विरोध होऊ लागला आहे. मतभेदातून त्यांचे स्वीय सहाय्यक मोहन व्हनकंडे यांनीच बंड पुकारत केलेले शक्तीप्रदर्शन हे त्याचेच द्योतक होते. मागील 2019 मध्येच खाडे यांना मिरज मतदारसंघातून कशीबशी आपली जागा राखता आली. यावेळी तर गटबाजीतून आणि एकूणच नाराजीतून विरोध होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत दोघांच्या बाबतीतही नुकत्याच जिल्हा दौर्‍यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काहीच फुंकर घातली नाही. उलट त्यानंतर काहीच पॅचअप झाले नाही. उलट दररोज त्यांनी गटबाजीतून पक्षांतर्गत विरोधकांचे आणि विरोधकांनी त्यांचे कार्यक्रम करणे सुरूच ठेवले आहे. परिणामी दोघांनाही विरोध वाढून जनतेतही प्रतिमा खालावून सर्व्हेत अडचणी असल्याचे पक्षांतर्गतच रिपोर्ट पाठविले जात आहेत. प्रसंगी उमेदवारी बदलासाठी पर्यायही शोधण्याची मोहीम सुरू असल्याची चर्चा आहे.

परिणामी खाडे आणि संजय पाटील हे पक्षा एकाकी पडले असून, त्यांनी एकमेकांना सावरून घेत एकीतून पुन्हा उमेदवारीच्या संधीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

विरोधकांसमोरही कुरघोड्यांचे दर्शन
भाजपच्या विविध व्यासपीठावर एकत्र असतानाही एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण कार्यकर्त्यांची गोची तर विरोधकांना चर्चेला विषय देणारे ठरत आहे. नुकताच एका आंदोलनातही असाच प्रकार चव्हाट्यावर आला. आंदोलनासंदर्भात पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याचा विषय ऐरणीवर आला. त्यावेळी खासदारांनी फोन लावावा अशी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी सूचना केली. अशावेळी खासदारांनीही फोन लावला. पण तो काही उचलला गेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांसमोर त्यांना हे लाजिरवाणे वाटले. त्यांनी यातून कडी करत स्पर्धक माजी आमदारांना ‘तुम्ही हॉटलाईन आहात, फोन लावा’ असे सांगितले. त्यावेळी संबंधित नेत्यांनीही तुम्ही आमची खेचता का, अशी मल्लिनाथी रंगली. तरीही खासदारांनी त्यांना फडणवीस यांना फोन लावायला सांगितला अन् त्यांनी लावल्यावर तो उचललाही गेला. तेवढ्यावर हा विषय न थांबता विरोधक नेत्यांसमोरच पक्षांतून कसे कार्यक्रम केले जातात याचे खुलेआम प्रदर्शन खासदारांनी घडवून दिले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज