rajkiyalive

जिल्ह्यातील ‘धुरंदर’ चक्रव्यूहात

अनिल काळे, जनप्रवास

मिरज मतदार संघाने टाकले पेचात : ‘चाणक्य’ चक्रावले

 

लोकसभा निवडणुकीच्या तारखाच अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी विधानसभेच्या रणशिंगाचा आवाज आतापासूनच राज्यातील विविध पक्षांच्या कानात घुमू लागला आहे. आतापर्यंत राज्याच्या राजकारणात युतीबरोबर की, महाविकास आघाडीबरोबर यासंदर्भात कोणताच निर्णय न घेतलेेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील झालेच तर मिरज विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगू शकतात, त्या दृष्टिकोनातूनच मिरज विधानसभा मतदारसंघात हालचालींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडी ही मविआमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत घटक पक्ष बनल्यास मिरज विधानसभा मतदारसंघांवर प्राधान्याने दावा सांगेल अशी ‘वंचित’ च्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा असून वंचित बहुुजन आघाडीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे निवडणूक मैदानात उतरण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिरज विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या गळ्यात घालून बाळासाहेब होनमोरेंना उध्दव ठाकरेंच्या ‘ उबाठा’ च्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविण्याची व्यूहरचना सुरू आहे. त्याचप्रमाणे 2014 च्या निवडणुकीत 16.8 मतांच्या टक्केवारीनुसार 29728 मते घेतलेले सिध्देश्वर जाधव हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

मिरज विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधात मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळेच काँग्रेसला रोखण्याबरोबरच या मतदारसंघात दावा सांगण्यासाठी चढाओढ लागणार आहे. इंद्रजीत घाटे हे युवा नेतृत्व वंचित समाजाच्या विकासासाठी झटणारे आहे, अशीच भावना सोयी-सुविधांपासून दूर असलेल्या या मतदारसंघातील बहुजन समाजाची भावना आहे. तथापि महाविका आघाडी झाल्यानंतर या जागेसंदर्भात घटक पक्षांमध्ये अधिकच पेच निर्माण होण्याची शक्यता राजकीय निरिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

 

 

मंत्री सुरेशभाऊ खाडे यांची विधानसभेची हॅट्ट्रीक पूर्ण झाली, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळविला, तथापि भाजपच्या दिल्लीश्वरांच्या अलीकडील धोरणांचा विचार करता नवी फळी तयार करण्यास त्यांनी जोर दिलेला दिसत आहे. अनुसुचित जातीसाठी आरक्षीत मिरज विधानसभेच्या 21 ऑक्टोबर 2019 ला झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुरेशभाऊ खाडे यांनी विजयाची हॅटट्रीक साधली . या निवडणुकीत बाळासाहेब होनमोरे यांच्यापेक्षा केवळ 30398 मतांचे अधिक्य सुरेश खाडे यांनी घेतले. त्यामुळेच विरोधी महाविकास आघाडीची महत्वाकांक्षा बळावली आहे.

2009 आणि 2014 च्या निवडणुकीत 62 टक्क्यांहून अधिक मतदान झालेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत मात्र मतनान 53.57 वर घसरले, तथापि 2019 च्या निवडणुकीत खाडे यांचे मताधिक्य 30398 इतके कमी का झाले ? 2009 च्या निवडणुकीत सुरेश खाडे यांनी 54 हजार 456 चे मताधिक्य घेतले होते, तर 2014 च्या निवडणुकीत मताधिक्य वाढून 64067 इतके झाले, मात्र 2019 विचार करता हे मताधिक्य केवळ 30398 वर आले,

 

 

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सिध्देश्वर जाधव यांनी 29728 मते ( 16.02 टक्के), अपक्ष सी. आर. सांगलीकर यांनी 21598 मते ( 11.64 टक्के), शिवसेनेचे तानाजी सातपुते यांनी 20160 मते ( 10.86 टक्के), तर बाळासाहेब होनमोरे यांनी मोठी मते घेतली होती. आता महाविकास आघाडीत असलेल्या आणि त्यावेळी वेगवेगळे लढलेल्या उमेदवारांच्या मतांची बेरीजच 82485 होते. त्याचाच फायदा उचलण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे. 2019 साली मतदानात जी साडेआठ टक्क्यांची घट झाली ती कोणत्या मतांची? का झाली? याचा शोध विरोधकांनी घेतला तर विरोधी उमेदवार या मतदारसंघात बाजी मारण्याची शक्यता आहे.

1999 व 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे हाफिजभाई धत्तुरे यांनी विधिमंडळात मिरजेचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचीही ताकद आहे. उमेदवार कुणीही असो, शिवसेना म्हणून मतदान करणारे कट्टर कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत. जवळपास 20,000 शिवसेनेची हक्काची मते या मतदारसंघात आहेत, शिवसेनेकडे उमेदवार नसला तरी काँग्रेस मात्र बदलत्या राजकीय वातावरणात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिरज विधानसभेच्या जागेची मागणी करू शकते. जयंतराव पाटील ही जागा सहजासहजी अन्य पक्षांच्या झोळीत टाकतील असे वाटत नाही . विरोधकांमधील विभाजनाचा जो फायदा आतापर्यंत भाजपला होत होता, तो मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत होणार नाही, राष्ट्रवादी (शरद पवार गट) , शिवसेना ( उध्दव ठाकरे गट) व काँग्रेसची महाविकास आघाडी आगामी निवडणुकीत संघटीतपणे निवडणूक रिंगणात उतरेल.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज