rajkiyalive

सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या फार्म्युल्याने शेतकर्‍यांना 110 कोटींचा फटका

…अन्यथा 1 डिसेंबरपासून राजारामबापू कारखान्याच्या गेटवर ठिय्या मारणार माजी खा.राजू शेट्टी

 

जनप्रवास, इस्लामपूर 

सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेला ऊसदराचा फार्म्युला त्यांच्या पथ्यावर असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना तब्बल 110 कोटींचा फटका बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसदराचा कोल्हापूर फॉर्म्युला सांगली जिल्ह्यात लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरचा ऊसदर मान्य असल्याचे जाहीर करावे. अन्यथा शुक्रवार दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 10 पासून राजारामबापू कारखान्याच्या गेटवर ठिय्या मारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 

 

राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदर संघर्ष 38 दिवसानंतर संपला. जिल्हा प्रशासनापासून मुख्यमंत्र्यांशी बोलणी करून सर्वमान्य तोडगा काढला. जे कारखानदार 1 रुपया देवू शकत नाही असे म्हणत होते त्यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 110 कोटी द्यायला भाग पाडले. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात फारसा भौगोलिक बदल नाही. कोल्हापूरपेक्षा सांगली जिल्ह्यात जादा रिकव्हरी आहे. तरीही सांगलीतील कारखानदारांनी दराचा फॉर्म्युला 2900 पर्यंत खाली आणला.

यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना गतवर्षीच्या ऊसातून तब्बल 12 कोटी 52 लाखांचा तोटा होणार आहे. तर ठराविक काही कारखान्यांना याचा लाभ होणार आहे. सांगली जिल्ह्यातील गतवर्षी झालेल्या गाळपानुसार चालू हंगाम गळीत झाल्यास कारखान्यांना अंदाजे 96 कोटी 46 लाखांंचा लाभ होणार आहे. यामध्ये राजारामबापू कारखाना तिन्ही युनिट मिळून 36 कोटी 19 लाख, सोनहिरा कारखाना 24 कोटी 91 लाख, क्रांती कारखाना 18 कोटी 86 लाख, दत्त इंडिया वसंतदादा 4 कोटी 18 लाख, विश्वास कारखाना 5 कोटी 28 लाख, दालमिया 7 कोटी 3 लाख या कारखान्यांचा समावेश आहे.

 

 

राज्याच्या सीमेलगत असणारा शिरगुप्पी कारखाना एअआरपीपेक्षा तब्बल 655 रुपये देण्यासाठी तयार आहे. मग सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना अवघड गोष्ट नाही. भविष्यात साखरेचे दर वाढणार आहेत. देशात 285 लाख टन साखर गरजेची आहे. तर जागतिक बाजारपेठेत 21 लाख टनाची तूट आहे. सांगलीतील कारखानदार ऊसदर आंदोलनाला दाद देत नाहीत. शेतकर्‍यांनी पहिल्या उचलीतूनच ज्यादा पैसा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा सांगलीतील शेतकर्‍यांची कमी ऊसदरावर बोळवण होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ऊसतोडी घेण्याचे बंद करा. कारखानदारांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे.

राजू शेट्टींचा गौप्यस्फोट
उसदर आंदोलनाच्या काळात बैलगाडी किंवा ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडली तरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. ऑक्टोबरपासून कारखान्यांची बाहेर जाणार्‍या साखरेचे ट्रक आडवून साखरेची नासधूस केली. परंतू एकही तक्रार कारखानदारांनी केली नाही. त्यामुळे ती साखर विनाहिशोबाची असल्याचा गौप्यस्फोट माजी खा.राजू शेट्टी यांनी केला.

 

 

आगामी काळात रिकव्हरी वाढणार
यंदा साखर उतारा कमी आहे हे धांदात खोटे आहे. कर्नाटक राज्यात 1 नोव्हेंबरला 7 टक्के रिकव्हरी होती. सध्या ती 12 टक्क्यावर पोहचली आहे. आगामी काळात थंडीमुळे रिकव्हरी वाढणार आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. परंतू रिकव्हरी चोरायची ठरवली तर काही पर्याय नाही. असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज