सांगलीकरांना शुद्ध पाणी हवं आणि ते थेट चांदोली धरणातूनच आणावे लागेल

SHARE:

सांगलीकरांना शुद्ध पाणी हवं आणि ते थेट चांदोली धरणातूनच आणावे लागेल, अशी आग्रही भूमिका ‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली’मध्ये मांडण्यात आली. तर कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एकजूट, रखडलेली ड्रेनेज योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी दबावगट निर्माण करणे, वारणा उद्भव योजना, कचरा वर्गीकरणाचा प्रश्न यांसह स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या विविध मुद्यांवर सविस्तर मुद्दे मांडण्यात आले.

 

 

‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली… यासाठी काय हवं, यावर तुमचं मत हवं’, असं आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले होते. त्यानुसार येथील कृष्णाकाठी बैठक पार पडली. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ञांनी आपले मत मांडले. पृथ्वीराज पाटील म्हणाले, कृष्णा नदी कोरडी पडल्यानंतर मी पात्रात उतरून स्वच्छता केली. नदीची अवस्था पाहून आरोग्यदायी सांगलीसाठी व्यापक मोहिम राबवण्याचा निर्धार केला. शहरात स्वच्छता, दूषित पाण्यासोबत हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो आहे. त्यावर निश्चित कार्यक्रम आखू, एकजुटीने काम करू. डॉ. मनोज पाटील यांनी प्लॅस्टिक कचर्‍याच्या स्वतंत्र संकलनाची संकल्पना मांडली.

माजी महापौर सुरेश पाटील यांनी वृक्षारोपण वाढवणे, झाडे जगवणे गरजेचे आहे. वारणा उद्भवऐवजी थेट चांदोली धरणातून पाणी आणणे आता संयुक्तिक ठरेल. मोहल्ला क्लीनिकसारखी संकल्पना आरोग्य व्यवस्था सुधारू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. वि. द. बर्वे यांनी सगळे प्रश्न महापालिकेच्या खुंटीवर अडवण्याऐवजी सांगलीकरांनी स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे, असे मत मांडले. अविनाश जाधव यांनी कृष्णा नदीची अवस्था मुळा-मुठा नदीपेक्षा भयानक होईल, अशी भिती केली. डॉ. सुहास खांबे यांनी विविध मार्गांनी नदीत मिसळणार्‍या रसायनांचे गणित मांडत ते थांबवण्याची सूचना केली.

 

 

सतीश साखळकर यांनी कृष्णा व वारणा नदीचे प्रदूषण समान पातळीवर असून शुद्ध पाण्यासाठी आता चांदोली धरण हाच पर्याय उरल्याचे स्पष्ट केले. ई-टॉईलेट, घरोघरी कचरा डबे, शहराचे भाग बनवून त्यानुसार स्वतंत्र नियोजनाची संकल्पना मांडली. हणमंत पवार यांनी भुयारी गटारीचा दुसरा टप्पा मेअखेर पूर्ण व्हावा, यासाठी उपोषणाला बसू, अशी सूचना केली. विजयकुमार दिवाण यांनी चांदोलीतून पाण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. डॉ. राजेंद्र भागवत म्हणाले, ‘‘शुद्ध पाणी व आरोग्याचं नातं आहे. या शहरात टायफाईड, कॉलरा, कावील, लेप्टोपायरोसिस, मूत्रमार्गातील संक्रमण अशा साथींसह पोटाचे विकार वाढण्यामागे अशुद्ध पाणी हे कारण आहे. दुषित पाण्यातून येणारे काही विकार थेट मंदूपर्यंत जातात.

एस. के. रांजणे, संजय चव्हाण, सर्जेराव पाटील, डॉ. दिलीप पटवर्धन, एम. एस. रजपूत, प्रशांत पाटील मजलेकर, रावसाहेब पाटील, अभिजित भोसले, राकेश दड्डणावर, प्रभाकर केंगार, डॉ. रवींद्र ताटे, डॉ. सुनिल पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेत महत्वाचे मुद्दे मांडले. आशिष कोरी यांनी सूत्रसंचालन केले.

पुढचे पाऊस एकसाथ: पृथ्वीराज पाटील
या मंथनातून समोर आलेल्या मौलिक सूचनांच्या आधारे एक व्यापक आणि राजकारण विहरीत ‘क्लीन सांगली, हेल्थी सांगली’ मोहिम हाती घेवू. शुद्ध पाणी हा अजेंड्यावरील विषय असेल. त्याचा विस्तृत कार्यक्रम घेवून लवकरच पुढचे पाऊल एकसाथ उचलू, अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *