सांगली :
बनावट नोटा छापणार्या मिरजेतील कारखाना उध्वस्त : शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या तरुणाला जेरबंद करून त्याच्याकडून 1 लाख 90 ़़हजार रुपये किंङ्कतीच्या जुन्या 50 रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट सांगली शहर पोलिसांनी उघडकीस आणले. यावेळी मिरजेतील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकून उद्ध्वस्त करत अहद अहमदअली शेख (वय 40 रा. मिरज) या तरुणास अटक करण्यात आली. यावेळी याठीकानाहून मोठ्या प्रमाणात 50 रुपयांच्या बनावट नोटा, मशनारी, शाई, कागदसह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरचा कारखाना हा गेल्या चार महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा बनावट नोटा बनविणार्या कारखान्यावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
बनावट नोटा छापणार्या मिरजेतील कारखाना उध्वस्त
1 लाख 90 हजारांच्या 50 रुपयांच्या बनावट नोटांसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संतोष गळवे, गौतम कांबळे यांना आकाशवाणी केंद्राजवळ एकजण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी यावेळी पोलिसांनी संशयित अहद शेख या तरुणास जेरबंद केले. यावेळी त्याच्याकडून 75 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना असल्याचे उघडकीस आले. यानंतर या कारखान्यावर छापा टाकून त्याठीकानाहून मोठ्या प्रमाणात जुन्या 50 रुपयांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा उत्कृष्ट नमुण्याचा कागद, मशीन कटर, उत्कृष्ठ दर्ज्याची शाई, प्रिंटिंग मशीन कागदांची बंडले असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल मिळाला. सदरचा कारखाना उद्ध्वस्त करून सर्व मुद्देमाल जप्त करत देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याच्या हेतूने हे सर्व केल्याचे निष्पन्न झाल्याने संशयितास अटक केल्याची माहिती सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
70 हजारांना 1 लाख रुपये अशा प्रमाणे सदरच्या नोटा विकत असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. या व्यक्तीचे एजेंट कोण आहेत?, त्याने किती नोटा छापल्या आहेत?, त्याच्यावर आणखी किती गुन्हे दाखल आहेत का याबाबत तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, तपस्या खोत, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
12 वि पास पण छपाई यंत्रात कौशल्य…
सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सापडला आहे. संशयित अहद शेख यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्याच्याकडे छपाईचे मोठे कौशल्य असल्याने छपाईत त्याचा हातखंडा कोणी धरत नाही. यातूनच त्याने मिरजेतील त्याच्या घराशेजारी छपाईचा कारखाना काढला. छोट्या नोटा कोणाच्याही निदर्शनास येत नाही त्यामुळे तो छोट्या नोटा छापत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो हा बनावट नोटांचा कारखाना चालवत होता. त्यामुळे त्याने किती नोटा चलनात आणल्या आहेत याचा तपास करणे मोठे आव्हानात्मक आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी यावेळी दिली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.