rajkiyalive

SANGLI LOKSABHA : लोकसभेच्या निमित्ताने खाडे, गाडगीळांची लिटमस टेस्ट

भाजप आमदारांसाठी विधानसभेची सेमीफायनल, मताधिक्य देण्याची जबाबदारी

जनप्रवास । अनिल कदम
SANGLI LOKSABHA : लोकसभेच्या निमित्ताने खाडे, गाडगीळांची लिटमस टेस्ट : सांगली ः लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना सांगलीत भाजपने हॅटट्रिक साधण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे सांगली आणि मिरजेत केवळ दोनच आमदार आहेत. उर्वरित दोन ठिकाणी काँग्रेस, एक राष्ट्रवादी आणि स्वर्गीय अनिल बाबर यांच्या निधनाने शिंदे गट सेनेची जागा रिक्त आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉ. सुरेश खाडे आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मताधिक्य देण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांची विधानसभेपूर्वी लिटमस टेस्ट ठरेल.

SANGLI LOKSABHA : लोकसभेच्या निमित्ताने खाडे, गाडगीळांची लिटमस टेस्ट

सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत होत आहे. भाजपविरोधात महाविकास आघाडी आणि अपक्ष रंगतदार बनली आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना सलग तिसर्‍यांदा मैदानात उतरले आहेत. संजयकाकांनी हॅटट्रिक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीमध्ये विशाल पाटील महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र शिवसेनेचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना तिकीट देवून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत.

पलूस-कडेगाव आणि जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असून माजी मंत्री विश्वजीत कदम आणि जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचा समावेश आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमनताई पाटील आमदार आहेत. तर खानापूर-आटपाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे स्वर्गीय अनिल बाबर हे आमदार होते, त्यांच्या निधनाने ती जागा सध्या रिक्त आहे. भाजपकडे सांगली आणि मिरज मतदारसंघ आहे. मिरजेतून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि सांगलीत सुधीर गाडगीळ हे आमदार आहेत. लोकसभेची निवडणूक ही खर्‍या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार्‍या आमदारांसाठी सेमिफायनल’ असणार आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. मात्र गेल्या दहा वर्षात हा बालेकिल्ला ढासळला आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ हे सलग दोनवेळा विजयी झाले. त्यामुळे मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळे सांगलीत मताधिक्य देण्याची जबाबदारी गाडगीळ यांच्यावर साहजिकच आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी लोकसभा प्रमुख शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपा किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांना सोबत घेवून जोरदार फिल्डिंग लावली आहे. ग्रामीण भागात अरविंद तांबवेकर, राहुल सकळे यांच्यामार्फत भाजपकडून प्रचाराला बळ दिले जात आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी हॅट्ट्रिक केली आहे.

त्यामुळे भाजप उमेदवाराची मदार पालकमंत्र्यांवर मदार आहे. लोकसभेसाठी मिरज विधानसभेची भूमिका महत्वाची असते. या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसला मताधिक्य मिळत होते. गेल्या दहा वर्षातील परिस्थिती आता बदलत चालली आहे. मिरज पंचायत समितीवर आजपर्यंतच्या इतिहासात कधीच भाजपचा झेंडा फडकला नव्हता, गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आणि पंचायत समितीवर भाजपने झेंडा फडकवला. महापालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपचे नगरसेवक निवडून देखील आले होते. पालकमंत्री सुरेश खाडे हे भाजपचे प्रतिनिधीत्व करत असून या मतदारसंघात भाजपने दबदबा निर्माण केला आहे.

पालकमंत्री खाडे यांची यापूर्वी शहरी भागावर मदार होती, मात्र गेल्या चार वर्षात त्यांनी ग्रामीण भागातही गट बांधला आहे.

वेळोवेळी स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देवून विकासकामे केली आहेत. त्यामुळे मिरज ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढली असल्याचे दिसून येते. सांगलीतून आ. गाडगीळ आणि पालकमंत्री डॉ. खाडे यांची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मताधिक्य देण्यासाठी प्रयत्नशिल राहतील.

लोकसभा निकालावरुन विधानसभेची दिशा…

लोकसभेच्या निकालावरून विधानसभेची दिशा ठरेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतदारसंघात लीड कायम राखण्यासाठी भाजप आमदार सरसावले आहेत. तर लीड कमी करून विद्यमान आमदाराची गोची करण्यासाठी विरोधकांकडून जोमाने प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पक्षांतर्गत परफॉर्मन्स ऑडिट’ होऊन येणार्‍या रिझल्टवर बरेच काही अवलंबून असेल, असे चित्र दिसून येते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज