rajkiyalive

SANGLI CRIME : कुपवाडमधील कदम टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

सांगली जनप्रवास
SANGLI CRIME : कुपवाडमधील कदम टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार : एमआयडीसी कुपवाड परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गंभीर गुन्हे दाखल असलेली रोहित उर्फ दाद्या कदम टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले. टोळी प्रमुख रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम (वय 23 रा. अहिल्यानगर, कुपवाड), सदस्य शैलेश तानाजी पडळकर (वय 29 रा. विचारे मळा, कुपवाड) आणि रियाज बाबासाहेब मुजावर (वय 35 रा. विचारे मळा, कुपवाड) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली.

SANGLI CRIME : कुपवाडमधील कदम टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

पोलीस अधीक्षकांचा दणका : खून, घरफोडीसह गंभीर गुन्हे टोळीवर दाखल.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कुपवाड परिसरातील रोहित कदम याच्यासह टोळीवर 2017 ते 2023 या कालावधीत खून करून पुरावा नष्ट करणे, घातक हत्यारांनी खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ आणि दमदाटी करून दुखापत पोहचवणे, रात्रीची घरफोडी करणे यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरच्या टोळीतील सदस्य हे कायदा न जुमानणारे असल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिला होता.

सदरच्या प्रस्तावाचे अवलोकन करून, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांचा चौकशी अहवाल, टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्य स्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबींचा विचार करून टोळी प्रमुख रोहित कदम यांच्यासह तिघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणूक, सण, उत्सव काळात गुन्हेगारी कृत्य करणार्‍या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेऊन त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अविनाश पाटील यांच्या पथकाने केली.

—————————-

सांगलीच्या आठवडी शनिवार बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ : महिलेच्या पर्स मधील 61 हजार केले लंपास.

सांगली : शहरातील अतिशय वर्दळीचा असलेला शनिवारच्या आठवडी बाजारात नेहमी चोरट्यांचा सुळसुळाट असतो. आठवडी बाजारातून सोने खरेदीसाठी निघालेल्या एका महिलेच्या पर्स मधील 61 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलून लंपास केली. सदर चोरीची घटना हि शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जेहरा सय्यद अल्लवी (वय 68 रा. मालगाव) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगलीच्या शनिवार आठवडी बाजारात नेहमीच गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरटे सतत उचलत असतात. मात्र, या बाजारात चोरी करणारे चोरटे काही पोलिसांच्या हाती लागत नाहीत. जेहरा अल्लवी या मूळच्या मिरज तालुक्यातील मालगाव मध्ये राहत असून सध्या त्या दुबईतील अबुधाबी मध्ये राहतात.

शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या सोने खरेदी करण्यासाठी सांगलीमध्ये आल्या होत्या. यावेळी आठवडी बाजारातून जात असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत अल्लवी यांच्या पर्स मध्ये ठेवलेली 61 हजार रुपयांची रोख रक्कम हातोहात लंपास करून चोरटयांनी पोबारा केला. काही वेळात अल्लवी या पर्स मध्ये पैसे आहेत का हे पाहत असताना सदर चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
—————————-

उसने पैसे परत दिले नसल्याच्या कारणातून एडक्याने केला हल्ला : दोघांना केली मारहाण : दोघांविरोधात गुन्हा दखल.

सांगली : शहरातील वडर कॉलनी येथील एका पानशॉप जवळ उसने घेतलेले पैसे देण्यासाठी वेळ का लावतो या कारणातून एका तरुणावर एडक्याने हल्ला केल्याची घटना घडली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. सदरची घटना हि रविवार दि. 21 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी जखमी साजिद मोदीन मकानदार (वय 21 रा. वडर कॉलनी, सांगली) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण आणि हल्ला करणार्‍या अक्षय वडर आणि आकाश शिंदे (दोघे रा. वडर कॉलनी, सांगली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, साजिद मकानदार हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील वडर कॉलनी मध्ये राहतो. संशयित दोघांकडून मकानदार याने उसने पैसे घेतले होते. रविवार दि. 21 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वडर कॉलनीतील माउली पानशॉप समोर मकानदार थांबला असता संशयित दोघेजण त्याठिकाणी आले. उसने घेतलेले पैसे परत देण्यास का वेळ करतो असे म्हणत अक्षय वडर याने त्याच्या जवळ असलेल्या एडक्या सारख्या हत्याराने हातावर वार करून जखमी केले.

यावेळी मकानदार याचा मित्र इरफान मुल्ला हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्याला दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत निघून गेले. घडलेल्या या घटनेनंतर जखमी मकानदार याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज