rajkiyalive

SANGLI LOKSABHA : संजयकाकांच्या विधानाने भाजप उमेदवारीचा संभ्रम कायम…

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : संजयकाकांच्या विधानाने भाजप उमेदवारीचा संभ्रम कायम… लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत, पण मतदारसंघात ताकदवान पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीमधील उमेदवारीचा घोळ अद्याप संपलेला दिसत नाही. तर विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे, असे विधान जाहीर सभेत केल्याने भाजपच्या उमेदवारीवर संभ्रम निर्माण होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीला प्रदेशकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने ते व पक्षाची मंडळी गावनिहाय प्रचारासाठी कामाला लागली आहेत.

देशातील लोकसभेच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. राज्यात लोकसभेसाठी एप्रिल महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष व जाहीर होणार्‍या उमेदवाराला मार्च महिना आणि एप्रिल महिन्यातील काही दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. या 40 ते 50 दिवसांच्या काळात उमेदवारांना विजयापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या दहा वर्षात हा बालेकिल्ला ढासळला आहे.

भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसचा पराभव करत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

त्यामुळे मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे. या उलट काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी, राष्ट्रवादीत पडलेली फूट यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील विस्कटले. याचा फायदा पुन्हा भाजपला मिळणार असताना भाजपकडून उमेदवारीचा घोळ सुरू असल्याचे चित्र आहे.

भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी मागितली आहे.

तर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये येऊ शकतो. त्याला सांगली लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे. मात्र सध्या तरी संजयकाका पाटील व पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळू नये, यासाठी त्यांच्या पक्षातील काही लोक पुढे होते. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्ती करत भाजपमधील अंतर्गत संघर्ष थांबवला आणि काकांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर काका दुसर्‍यांदा खासदार झाले खरे पण पक्षातील संघर्ष कायम राहिला.

भाजपमधील एक गट संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करत आहेत.

उमेदवारीवरून दोन गट पडले आहेत. पालकमंत्री सुरेश खाडे हे खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीच्या बाजुने आहेत. पण इतर अनेक नेते मंडळी काकांना विरोध करत आहेत. तर दुसरीकडे काही नेते काका सोडून कोणाला पण पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी करू लागले आहेत. केंद्रीय व राज्य पातळीवरील नेते आता मतदारसंघात येत आहेत. उमेदवारीसाठी चाचपणी करत आहेत. दोन वर्षांपूर्वी भाजपने केलेल्या सर्वेमध्ये सांगलीची जागा धोक्यात दाखविली होती. त्यामुळे केंद्र व राज्य पातळीवरून सांगली लोकसभा मतदारसंघात येणार्‍या नेत्यांची गर्दी वाढली आहे.

हरिपूर येथे पक्षाचा मेळावा दोन दिवसांपूर्वी पार पडला.

या मेळाव्यासाठी मध्यप्रदेशचे कामगारमंत्री प्रल्हादसिंग पटेल उपस्थित होते. या मेळाव्यात खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा विजय निश्चित आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आवाहन केले होते. यामुळे पक्षात पुन्हा संभ्रम वाढला आहे. संजयकाकांना उमेदवारी फिक्स आहे की नाही? उमेदवारी फिक्स झाली असेल तर प्रदेश पातळीवर अद्याप ग्रीन सिग्नल का मिळाला नाही? त्यामुळे भाजप उमेदवार बदलणार की काय? अशी चर्चा आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी मिळाली तर भाजपमधील अंतर्गत नाराजी थांबविण्यासाठी ते हे बोलले असतील काय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी फिक्स झाली आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळणार आहे. त्यानुसार विशाल पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना वीस दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेसने दिल्या आहेत. विशाल पाटील कामाला देखील लागले आहेत. मतदारसंघात तालुकानिहाय गावांचे दौरे त्यांनी सुरू केले आहेत. प्रदेशचे नेते, निरीक्षक देखील काही मेळाव्याला हजेरी लावू लागले आहेत. पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत विशाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याने काँग्रेस कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत.

भाजपच्या पहिली यादी 29 रोजी…

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दि. 29 रोजी होणार आहे. या बैठकीत भाजपच्या देशातील शंभर लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. कमजोर मतदारसंघात प्रचाराला जास्त वेळ मिळावा यासाठी उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्याबरोबर मंत्र्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील याच वेळी केली जाणार आहे. यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराची घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज