sangli mnp news : महापालिकेची प्रभाग व सदस्य संख्येवरून प्रशासनाचा संभ्रम : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या निवडणुकीसाठी किती प्रभाग होणार? किती सदस्यांचा एक प्रभाग? व सदस्य संख्या 78 च राहणार की वाढणार? याबाबत प्रशासन देखील अद्याप संभ्रमात आहे. राज्य शासन व राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार? याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.
sangli mnp news : महापालिकेची प्रभाग व सदस्य संख्येवरून प्रशासनाचा संभ्रम
निवडणूक आयोग व राज्य शासनाच्या आदेशाकडे लक्ष
महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक 2018 मध्ये झाली होती. तर सभागृहाची मुदत 19 नोव्हेंबर 2023 ला संपली. पण ओबीसी आरक्षण व प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे महापालिकेची निवडणूक तब्बल 21 महिने लांबणीवर पडली. नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिका निकालात काढली आहे. चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश देखील दिले आहेत. तर 2022 पूर्वी प्रचलित असलेली आरक्षण व्यवस्था महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागू होईल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे 2018 मध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळाले होते. ते आरक्षण कायम राहिले आहे.
आता किती सदस्यांचा एक प्रभाग यावर कल सुरू आहे. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता एक-सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे. महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात केली आहे. तसा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील झाला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा निर्णय काय ठेवणार की यात बदल करणार? याकडे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सांगली महापालिकेची लोकसंख्या 6 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या किमान 65 तर कमाल 85 कायम राहणार आहे. पण 2021 ची जणगणना झालेली नाही. मग सदस्यसंख्या वाढणार का? यावर देखील कल सुरू आहे. राज्य शासनाने अद्याप प्रभाग संख्या व सदस्य संख्या निश्चित केली नाही. आठवडाभरात हे निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच सदस्यसंख्या व प्रभाग संख्या निश्चित होईल. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता राज्य शासन व निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. सध्या तरी प्रशासन संभ्रमात आहे.
sangli-mnp-news-administrations-confusion-over-the-number-of-wards-and-members-of-the-municipal-corporationn
21 महिन्यानंतर निवडणुकीबाबतचे आदेश…
महापालिकेच्या सभागृहाची मुदत ही 19 नोव्हेंबर 2023 ला संपली आहे. सभागृहाची मुदत संपून 21 महिने पूर्ण होत आहेत. त्यानंतर निवडणुकीबाबतचे आदेश न्यायाकडून देण्यात आले आहेत. या काळात प्रशासक म्हणून आयुक्तांनी काम पाहिले आहे. आता नवीन सभागृह अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या प्रक्रियेसाठी चार महिन्याचा कालावधी मात्र लागणार आहे.
महापालिकेची 2018 ची स्थिती
* मनपाचे एकूण प्रभाग- 20
* मनपाची एकूण सदस्य संख्या- 78
* खुले- 46, ओबीसी- 21, एससी- 10 व एसटी- 1
* 18 प्रभागात चार तर दोन प्रभाग तीनची सदस्यसंख्या
* पक्षीय बलाबल- भाजप- 41 काँग्रेस- 20 राष्ट्रवादी- 15 इतर -2

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.