जयंत पाटील महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चेला जोर
sangli political news : अजितदादांचे संकेत अन् भाजपच्या पोटात गोळा : राज्यातील विधानसभेचा निकाल लागल्यानंतर माहितीचे सरकार स्थापन झाले आहे. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सपशेल अपयश आल्याने काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सत्तेची आस असताना हो हूलकावणी मिळाल्याने पक्षांतराची चर्चा रंगली आहे. निवडणुकीच्या निकालापासून शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शांत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महायुतीच्या सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा जोर धरीत आहे.
sangli political news : अजितदादांचे संकेत अन् भाजपच्या पोटात गोळा
निवडणुकीत महायुतीच्या जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या पाडावासाठी विविध प्रयत्न केले, मात्र जयंतराव सत्तेत सहभागी झाले तर जिल्ह्याचे नेतृत्व आणि पालकमंत्री हे पदही त्यांच्याकडे जाईल. त्यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याचे चित्र दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये सांगली जिल्हाही मागे राहिला नाही. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक पाच जागा महायुतीने बाजी मारली. तर महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळाल्या. चार ठिकाणी विजय मिळवत भाजप जिल्ह्यातील मोठा पक्ष ठरला. काँग्रेसने एक तर राष्ट्रवादीने हक्काची एक जागा गमावली.
सांगली, मिरजेबरोबरच शिराळा आणि जत विधानसभा भाजपने मिळवली. राष्ट्रवादीने शिराळा गमावली मात्र इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा कायम राखली. शिवसेना शिंदे गटाने आपली एकुलती एक जागा कायम राखली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. इस्लामपुरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सावध करणारा निकाल दिला.
गड राखला पण मताधिक्य घटले. ऊस दराबातचा प्रश्न, भोवतालची चौकडी, सामान्य लोकांची नाराजी, तेच-तेच पदाधिकारी यामुळे मतदारांत नाराजी दिसून आली. त्यामुळे अवघ्या 13 हजार मतांनी विजय मिळविला. निकालानंतर चार दिवस शांत राहिलेले जयंत पाटील यांनी मेळावा घेवून कार्यकर्त्यांना निराश होवू नका, काम करत राहण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर यंदा पार पडलेल्या लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार विरूद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाची सरशी झाल्याचे दिसून आले होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने चांगली मुसंडी मारली. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत जावून अजितदादांनी भेट घेतली.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. अजितदादा की भाजपसोबत जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात भाजप वाढीला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचाच हातभार असल्याचे यापूर्वी बोलले जात होते. काँगे्रसला रोखण्यासाठी जयंतरावांनी जिल्ह्यात भाजप मोठे केले होते. काहीवेळा भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले, मात्र शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या कारणांमुळे गेल्या काही वर्षापासून भाजप नेत्यांपासून जयंतराव दुरावले. लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी महायुतीला टार्गेट केले होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत जयंतरावांना लक्ष केले.
भाजप, अजितदादा गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांना एकत्रित करुन जयंतरावांच्याविरोधात वातावरण तयार केले. जिल्ह्यातील जयंतराव विरोधक त्यांच्या पाडावासाठी एकत्र आले होते. त्याचा परिणाम जयंतरावांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले. नाराज जयंतराव महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे.
शरदचंद्र पवार आणि अजितदादा राष्ट्रवादीचे मनोमिलन झाले तर महायुतीत सहभागी होतील. जयंत पाटील थेट विरोधी बाकावरुन सत्तेत आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत.
जयंत पाटील भाजप किंवा राष्ट्रवादीसोबत गेल्यास त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वी त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास आणि जलसंपदा या विभागाचा कार्यभार पाहिला आहे. जयंतरावांचा सत्तेत समावेश झाला तर त्यांना मंत्रिपदासह जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपमधील काही नेत्यांनी मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यांची संधी हुकणार आहे.
सध्या भाजपचे चार आमदार आणि शिंदे गटाचे एक आमदार मिळून असे पाच आमदार आहेत. मात्र जिल्ह्यात आत्तापर्यंत भाजपला एकमुखी नेतृत्व करण्यात अपयश आले आहे. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडे दोनवेळा पालकमंत्री पद होते. परंतू जिल्ह्याचे नेतृत्व करु शकले नाहीत.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटात प्रवेश करुन तासगाव-कवठेमहांकाळमधून निवडणूक लढविली, परंतु त्यांना तेथेही अपयश आले. जर जयंतराव महायुतीत सहभागी झाले तर जिल्ह्याचे नेतृत्वही त्यांच्याच हातात जाईल, हे स्पष्ट दिसून येते. तसे झाल्यास जयंतरावांच्या नेतृत्वात काम करावे लागेल. या कारणांमुळे भाजपच्या आमदार आणि माजी आमदारांच्या पोटात गोळा आल्याचे चित्र दिसत आहे.
जयंत पाटील-गोपीचंद पडळकर वाद विकोपाला
शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. निधीवरुन पडळकर जयंतरावांना लक्ष करीत होते. मागील महायुतीचे सरकार आणि नवे सरकार आल्यानंतर आमदार पडळकर हे पुन्हा जयंत पाटलांना टार्गेट करीत आहेत. संधी मिळेल तेथे आरोप करुन जयंतरावांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जयंतराव महायुतीत सहभागी झाले तर दोन्ही नेत्यांतील वाद शमणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



