rajkiyalive

sangli political news : जिल्हा बँकेच्या निमित्ताने पूजा पाटील यांचे बँ्रडींग

SHARE:

sangli political news : जिल्हा बँकेच्या निमित्ताने पूजा पाटील यांचे बँ्रडींग : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दहा वर्षांच्या संचालकपदाच्या नियमामुळे अनेक जुन्या आणि अनुभवी चेहर्‍यांना बाजूला व्हावे लागले, तर नव्या नेतृत्वासाठी राजकारणाची दारे खुली झाली. त्यामुळे या निवडणुकीत अनेक नव्या चेहर्‍यांना संधी मिळाली. सहकाराच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली. अनेक दिग्गजांच्या राजकीय कारकिर्दीला नवे वळण मिळाले आणि काही नव्या चेहर्‍यांच्या राजकीय प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

sangli political news : जिल्हा बँकेच्या निमित्ताने पूजा पाटील यांचे बँ्रडींग

मात्र, या संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते एका नावाने… ते नाव म्हणजे सौ. पूजा विशाल पाटील! खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केली. जिल्ह्यातील बदलती राजकीय परिस्थिती, विविध गटांचे हितसंबंध आणि सहकारातील सत्तेची गणिते लक्षात घेऊन त्यांनी दोन जागा मिळविण्यात यश मिळविले. या दोन जागांपैकी एक जागा आपल्या पत्नी सौ. पूजा पाटील यांच्यासाठी मिळविण्यात त्यांना यश आले.
विशेष म्हणजे, पूजा पाटील यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती थेट जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेच्या संचालकपदापासून! त्यातही निवडणुकीच्या रणांगणात उतरून मतांची लढाई लढण्याऐवजी त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात संघर्षाच्या मतदान पेटीतून नव्हे, तर राजकीय समीकरणांच्या यशस्वी जुळवाजुळवीतून झाली आहे.
पण हा केवळ जिल्हा बँकेच्या संचालकपदापुरता मर्यादित असलेला राजकीय प्रवेश आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय जबाबदारीची ही नांदी आहे, असा प्रश्न आता सांगलीच्या राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे.
आगामी काळात महिला आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी, मतदारसंघांची पुनर्रचना आणि जागांच्या संख्येत होणारे संभाव्य बदल यामुळे देशाच्या राजकारणात महिलांसाठी मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. अशा परिस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघ किंवा जिल्ह्यातील एखादा विधानसभा  तदारसंघ महिलांसाठी राखीव झाला, तर काँग्रेसकडून सक्षम महिला चेहरा म्हणून पूजा पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कारण राजकारणात केवळ पद मिळविणे महत्त्वाचे नसते, तर त्या पदाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणे अधिक महत्त्वाचे असते. जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निमित्ताने पूजा पाटील यांना आता जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या नेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. हीच संधी भविष्यात त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाची ठरू शकते.

काँग्रेसला मिळणार नवा महिला चेहरा

सांगली जिल्ह्यात काँग्रेसची मोठी राजकीय परंपरा आहे. अनेक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाला नव्या पिढीतील आणि विशेषतः प्रभावी महिला नेतृत्वाची गरज जाणवत आहे.
सध्याच्या घडीला जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये राज्यव्यापी किंवा जिल्हाव्यापी राजकीय प्रभाव निर्माण करू शकेल, असे महिला नेतृत्व फारसे ठळकपणे पुढे आलेले दिसत नाही. अशा परिस्थितीत पूजा पाटील यांच्या रूपाने काँग्रेसला एक नवा आणि महत्त्वाचा महिला चेहरा मिळू शकतो.
विशाल पाटील यांच्याकडे असलेला राजकीय अनुभव, जिल्ह्यातील संपर्क आणि त्यांच्या राजकीय वाटचालीतून निर्माण झालेले समीकरण याचा फायदा पूजा पाटील यांना होऊ शकतो. अर्थात, त्यांना स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला राजकीय मंच त्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.

विशाल पाटील विधानसभेत, तर पूजा पाटील लोकसभेत?

सांगलीच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चिला जाणारा संभाव्य राजकीय डाव म्हणजे विशाल पाटील आणि पूजा पाटील यांची आगामी निवडणुकांमधील भूमिका! आगामी सांगली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सध्या ठळकपणे पुढे येणारे इच्छुक चेहरे फारसे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत खासदार विशाल पाटील यांनी स्वतः विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, तर पूजा पाटील यांच्यासाठी लोकसभेची जागा खुली होऊ शकते, अशी राजकीय शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशाल पाटील यांनी लोकसभेच्या राजकारणातून विधानसभेकडे मोर्चा वळविला आणि पूजा पाटील यांनी लोकसभेची जबाबदारी स्वीकारली, तर सांगलीच्या राजकारणात एक नवे समीकरण उदयास येऊ शकते. मात्र, हा केवळ राजकीय चर्चेचा विषय आहे की त्यामागे भविष्यातील नियोजनबद्ध रणनीती आहे, हे येणारा काळच स्पष्ट करेल. जिल्हा बँकेत बिनविरोध निवडून आल्यानंतर पूजा पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. केवळ काँग्रेसमधीलच नव्हे, तर जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही त्यांनी सुरू केल्या आहेत.
राजकारणात अशा भेटीगाठींना विशेष महत्त्व असते. कारण निवडणूक जिंकण्यासाठी केवळ पक्षाचे चिन्ह किंवा घराण्याचा राजकीय वारसा पुरेसा ठरत नाही. त्यासाठी सर्वपक्षीय संपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेमध्ये स्वतःची विश्वासार्हता निर्माण करावी लागते. पूजा पाटील यांच्या या भेटीगाठींकडे त्यामुळे केवळ जिल्हा बँकेच्या संचालक म्हणून पाहिले जात नाही. आगामी काळातील राजकीय वाटचालीची ही प्राथमिक तयारी असू शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दहा वर्षांच्या नियमामुळे जुन्या नेतृत्वाची जागा नवे चेहरे घेत आहेत. दुसरीकडे याच बदलत्या राजकीय परिस्थितीत पूजा पाटील यांच्या रूपाने एका नव्या महिला नेतृत्वाचा उदय होताना दिसत आहे. आज त्यांची ओळख खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा बँकेच्या बिनविरोध संचालिका अशी आहे. मात्र, उद्या हीच ओळख बदलून त्या स्वतःच्या राजकीय कर्तृत्वावर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्या बनणार का, हा खरा प्रश्न आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे, आगामी महिला आरक्षण, काँग्रेसला आवश्यक असलेले नवे नेतृत्व आणि विशाल पाटील यांची राजकीय रणनीती या सर्व बाबींचा विचार केला, तर पूजा पाटील यांच्या नावाची चर्चा केवळ योगायोगाने होत असल्याचे वाटत नाही. त्यामुळे आगामी काळात पूजा पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली, उमेदवारी अर्ज दाखल केला किंवा काँग्रेसने त्यांच्यावर मोठी राजकीय जबाबदारी सोपविली, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही!
सध्या ही सर्व समीकरणे शक्यतांच्या पातळीवर आहेत. मात्र, सांगलीच्या राजकारणात एका नव्या महिला नेतृत्वाच्या उदयाची चर्चा सुरू झाली आहे, हे निश्चित!
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *