जुलैपर्यंत काम न झाल्यास रेलरोको
जनप्रवास । सांगली
SANGLI : चिंतामणनगर रेल्वे पुलाचे काम अपूर्ण; सर्वपक्षीय समितीने घातले वर्षश्राध्द : सांगली- माधवनगर रस्त्यावरील चिंतामणनगरच्या रेल्वे पुलाचे काम सुरू करून एक वर्ष झाले तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने पुलाजवळ वर्षश्राध्द घालत दोनशे लोकांना जेवण केले. तर प्रशसान व ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुलाचे काम जुलैअखेर न झाल्यास रेलरोको आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर व गजानन साळुंखे यांनी दिला.
SANGLI : चिंतामणनगर रेल्वे पुलाचे काम अपूर्ण; सर्वपक्षीय समितीने घातले वर्षश्राध्द
मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी माधवनगर रस्त्यावरील चिंतामणनगर रेल्वे पूल पाडून नव्याने पूल बांधण्यात येत आहे. गेल्या वर्षी दि. 10 जूनला हे काम सुरू केले होते. सहा महिन्यात काम पूर्ण करण्याची अट ठेकेदाराला होती. मात्र अद्याप काम पूर्ण झाले नाही. या संदर्भात सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. सांगली शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. तसेच विटा, खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यासाठी एकमेव रस्ता आहे. पर्यायी मार्गाचा विचार न कराता याचे काम सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिक तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी त्यांना मोठ्या नरकयातना सोसाव्या लागत आहेत.
वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन असेल जिल्हा प्रशासन ढिम्म आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांची धारणा झालेली आहे. सर्वांना जागा आणण्यासाठी आज पुलाचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध आंदोलन करून दोनशे लोकांना प्रसाद देण्यात आला. पुलाचे काम सुरू असलेल्या जागेवरच जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासन आणि या पुलाच्या कामाचे मक्तेदार यांच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात चक्क श्राद्ध घालून सांगलीकरांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा प्रशासन आणि मक्तेदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी केली. जुलैअखेर काम पूर्ण न झाल्यास बेमुदत साखळी उपोषण, रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, चिंतामणनगर पुलाचे काम रखडल्याने या रस्त्यावरील व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. चार दुकानांना टाळे ठोकलेले आहे. अन्य दुकानातील कर्मचारी काम सोडून जात आहेत. याचा फटका गणपती पेठ, कॉलेज कॉर्नर ते थेट माधवनगर या संपूर्ण बाजारपेठेवर होत आहे. हॉटेल चालक शरद पाटील म्हणाले, सांगलीच्या प्रमुख बाजारापेठेंना जोडणारा हा मार्ग बंद असल्याने एक हात तोडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. व्यापार्यांचे मोठे नुकसान होत आहे. जगन्नाथ ठोकळे यांनी प्रशासन ठेकेदाराकडून कामाला गती देण्याबाबत कोणताही प्रतिसाद नाही. यामुळे हे सरळ ऐकतील असे वाटत नाही. यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणासारखा मार्ग अवलंबण्याची गरज असल्याचे सांगितले.
या आंदोलनात माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, गजानन सांळुखे, वाहतूकदार संघटनेचे नेते बाळासाहेब कलशेट्टी, महेश पाटील, सचिन देसाई, प्रशांत भोसले, नीताताई केळकर, माजी नगरसेवक मनोज सरगर, उद्योजक दीपक पाटील, माधवनगरच्या सरपंच अंजु तोरो, प्रशांत भोसले, उपसरपंच अनिल पाटील, शेखर तोरो, इरफान मुल्ला, गिरीश शिंगणापूरकर, बुधगावचे विक्रम पाटील, उमेश पाटील, प्रदिप बोथरा, राजू आवटी, अशोक गोसावी, व्यापारी असोसिएशनचे अनिल कुमठेकर, डॉ. डी. आर. शिंदे सहभागी झाले होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.