‘शक्तीपीठ’ प्रकल्प आराखडा तीन महिन्यात पूर्ण होणार: हालचाली गतीमान

SHARE:

जिल्ह्यातील 1135 गटातून महामार्ग: पाच हजार शेतकर्‍यांना फटका

जनप्रवास । सांगली

‘शक्तीपीठ’ प्रकल्प आराखडा तीन महिन्यात पूर्ण होणार: हालचाली गतीमान : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या हालचाली गतीमान होणार आहेत. प्रकल्पाचा आराखडा दोन-तीन महिन्यात पूर्ण करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. या संदर्भात अधिसूचना निघाली असून भूसंपादन अधिकार्‍यांच्या नेमणुका देखील झाल्या आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 135 गटातून हा महामार्ग जाणार असून साडेचार हजार शेतकर्‍यांना याचा फटका बसणार आहे.

‘शक्तीपीठ’ प्रकल्प आराखडा तीन महिन्यात पूर्ण होणार: हालचाली गतीमान

नागपूर ते गोवा या महामार्गा बारा जिल्ह्यातून जाणार असून सुमारे 802 किलोमिटर लांबीचा हा महामार्ग आहे. या द्रुतगती महामार्गाव्दारे 12 जिल्ह्यातील 19 देवस्थाने जोडली जाणार आहेत. मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर एमएसआरडीसी शक्तीपीठ या प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार महामार्गाची उभारणी करत आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून हा महामार्ग सुरू होणार असून गोव्याच्या सीमेवर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे महामार्ग समाप्त होणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे 22 तासाचा प्रवास हा 11 तासात होणार आहे. सुमारे 802 किलोमिटर लांबीच्या या महामार्गासाठी भूसंपादनासह 86 हजार 300 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच हजार शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात मार्चला अधिसूचना काढली आहे. त्यात बाधीत शेतकर्‍यांच्या हरकती व आक्षेप देखील नोंदविण्यात आले आहे. प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून 611 हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. मात्र लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने या महामार्गाबाबत पुढील कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. मात्र आता या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यात आराखडा पूर्ण करण्याचे टार्गेट असणार आहे. त्यानंतर आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी घेतली जाईल.

त्यामुळे प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू होणार आहेत. जमीन अधिग्रहण अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी या तालुक्यातील प्रातांधिकार्‍यांची नेमणूक केली गेली आहे. मात्र शेतकर्‍यांनी जमिनी अधिग्रहण करण्यास विरोध केला आहे. या संदर्भात शेतकर्‍यांचे मेळावे देखील होऊ लागले आहेत. त्यामुळे शासन जमिनी अधिग्रहण करण्यासाठी मोबदला किती देणार? यावर शेतकर्‍यांची आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

शक्तीपीठ महामार्गामुळे पिकाऊ जमिनी बाधीत…

शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला चालना मिळणार असली तरी तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातील अनेक पिकाऊ जमिनी बाधीत होत आहेत. यामध्ये द्राक्ष, ऊस व फळ बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अल्प भूधारक शेतकर्‍यांचा या महामार्गाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या विरोधात आंदोलनाचा एल्गार शेतकर्‍यांनी दिला आहे.

बारा जिल्ह्यातील धार्मिक स्थळे जोडणार

धार्मिक स्थळे जोडण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे. या महामार्गामुळे वर्धा जिल्ह्यातील केळझरचा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर, सेवाग्राम, वाशीम येथील पोहरादेवी, नांदेड येथील माहुरगड, सचखंड गुरूव्दारा, हिंगोली येथील औढ्या नागनाथ, बीड येथील परळी वैजनाथ, आंबेजोगाई, धाराशीव येथील तुळजापूर, सोलापूर येथील पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, सांगली औदुंबरचे दत्त मंदिर, कोल्हापूर येथील नरसोबावाडी जोतीबा मंदिर, आंबाबाई मंदिर, संत बाळूमामा मंदिर, सिंधुदूर्ग कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *