rajkiyalive

सरकार पडावे हीश्रींची इच्छा…

दिनेशकुमार ऐतवडे

नुकतेच अजितदादा पवार ( ajitdada pawar)यांनी बारामतीत शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले होते. काहींनी 38 व्या वर्षी बंड केले मी 64 व्या वर्षी केले असा टोला शरद पवारांना लगावला वसंतदादा पाटील यांचे सरकार पडलेे कसे आणि त्यावेळचा इतिहास तुमच्यासाठी….

 

(political ) सरकार पडावे ही श्र्रींची इच्छा…

मार्च 1978 मध्ये वसंतदादा  (vasantdada patil )मुख्यमंत्री झाले. जुलैमध्ये त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. बारामतीचे आमदार आणि दादांच्या मंत्रीमंडळातील सहकारी शरद पवार वयाच्या 38 वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवून एक नवा इतिहास घडविला. शरद पवारांबरोबर 40 आमदारांनी पक्ष सोडला त्यामध्ये वाळव्यातून निवडून आलेले विलासराव शिंदेही होते.

7 मार्च 1978 रोजी रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी होवून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळात दत्ता मेघे, सुशिलकुमार शिंदे, शरद पवार हेही मंत्री होते. वाळव्यातून राजारामबापुंचा पराभव झाला होता. ते जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत घेण्यात आले आणि शरद पवारांच्या मंत्रीमंडळात ग्रामीण विकास, माहिती, विधी व न्याय आणि अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच एन. डी. पाटील हे विधानपरिषदेवर होतेच त्यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

सत्ता स्थापन झाल्यानंतर नासिकराव तिरपुडेंनी आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली. इंदिरा गांधी यांचा काँग्रेस आय हा पक्ष राज्यात नवीनच असल्याने आणि त्याची संपूर्ण जबाबदारी नासिकराव यांच्यावर असल्याने त्यांनी आपले पंख पसरायला सुरुवात केली. राज्यातही त्यांनी दादांना आणि रेड्डी काँग्रेसच्या इतर नेत्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. दोन महिन्यात दादांना राज्य चालविणे अवघड झाले, एवढा त्रास त्यांना सोसावा लागला. पण ते कुणापुढे बोलूही शकत नव्हते.

 

सरकार चालवणे वसंतदादांना तारेवरची कसरत होवू लागली होती.

रेड्डी काँग्रेसमधील शरद पवारांसारख्या नेत्यांनाही नासिकराव तिरपुडेंबद्दल नाराजी वाढत चालली होती. पण या सर्व गोष्टी या सर्वांचे नेते यशवंतराव चव्हाण यांना कोण सांगणार हे सरकार पडावे अशी बर्‍याच जणांनी बोलूनही दाखवले होते. पण आपलेच सरकार कसे पाडायचे, हाही मोठा प्रश्न होता. यशवंतराव चव्हाणांनाही काही निर्णय घेता येईना.

’हे राज्य पडावे ही श्रींची इच्छा’ हा अग्रलेख लिहून कोंडी फोडली.

राज्यातील एका अग्रगण्य दैनिकाच्या संपादकांची आणि यशवंतराव चव्हाणांची घनिष्ठ मैत्री होती. यशवंतराव चव्हाणांची खडानखडा माहिती त्या संपादकांना होती. एके दिवशी त्या संपादकांनी आपल्या अग्रलेखात ’हे राज्य पडावे ही श्रींची इच्छा’ हा अग्रलेख लिहून कोंडी फोडली. सर्व नेत्यांना यशवंतरावांची इच्छा कळाली आणि सर्वजण कामाला लागले. या सर्वांचे नेतृत्व करत होते 38 वर्षीय बारामतीचे शरद पवार.
या घडामोडी घडत असताना शिराळ्यातून निवडून आलेले शिवाजीराव देशमुख आणि वाळव्याचे आमदार विलासराव शिंदे आपल्या कुटुंबीयांसमवेत उत्तर भारतात देवदर्शनासाठी गेले होते.

त्या काळात फोन, मोबाईल नसल्यामुळे या घडामोडीची त्यांना कल्पना नव्हती. दहा पंधरा दिवसानंतर आपले देवदर्शन आटोपून ते परतीच्या प्रवासाला लागले. पुण्यामध्ये आल्यानंतर विलासराव शिंदे यांनी आपल्या एका पाहुण्यांच्या घरी मुक्काम केला. शिवाजीराव देशमुख मात्र शिराळ्याला निघून आले.

 प्रेस घेवून सरकार पाडण्याचे समर्थन केले

त्याच रात्री उशीरा यशवंतराव चव्हाण दिल्लीहून पुण्याला आले. योगायोगाने यशवंतराव चव्हाणही त्याच पाहुण्यांच्या घरी रात्री उशीरा मुक्कामाला आले. तोपर्यंत मुंबईत सर्व घडामोडी घडल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी यशवंतराव चव्हाणांची आणि विलासराव शिंदेची भेट झाली. विलासराव शिंदेना सोबत घेवूनच यशवंतराव चव्हाणांनी प्रेस घेवून सरकार पाडण्याचे समर्थन केले आणि शरद पवारांना पाठिंबा दिला.
शरद पवार काँग्रेसचे 40 आमदार घेवून जनता पक्षाच्या 99 आमदारांच्या पाठबळावर सरकार स्थापन्याचा दावा केला. सुशिलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला.

हेही वाचा
1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री
1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी
1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात
1967 : आप्पासाहेब बिरनाळेंना लॉटरी

पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अल्पमतात आले.

त्यामुळे वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडे यांनी आपआपल्या पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील पहिले आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यात कोसळले. वसंतदादा पाटील याच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. एस. एम. जोशींनीही पवारांना नेतृत्व बहाल केलं. आबासाहेब कुलकर्णी, एस.एम. जोशी, किसन वीर ते तेव्हांचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या पाठिशी राहिले.

18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात बिगर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये समाजवादी काँग्रेस जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिष्ट पक्ष सहभागी झाले होते. या बिगर काँग्रेस आघाडीचे नाव पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद असे ओळखले जावू लागले. पुलोदच्या या प्रयोगामुळे शरद पवार अवघ्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. ते स्वतंत्र भारतातील सर्वात तरूण मुख्यमंत्री झाले.

17 कॅबीनेट आणि 17 राज्यमंत्र्यासह राज्यात पुलोदचा प्रयोग सुरू झाला.

पुलोद सरकारच्या मंत्रीमंडळात सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्रीच काम करत होते. त्यात उत्तमराव पाटील, सुंदरराव शेळके, अर्जुनराव कस्तुरे, निहाल अहमद आणि सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांचा समावेश होता. नंतर 2 ऑगस्ट 1978 रोजी नवीन 28 जणांना मंत्रीमंडळात घेत पवारांनी विस्तार केला. अशा प्रकारे शरद पवारांच्या नेतृत्वात 17 कॅबीनेट आणि 17 राज्यमंत्र्यासह राज्यात पुलोदचा प्रयोग सुरू झाला. उपमुख्यमंत्रीपद सुंदरराव शेळके यांच्याकडे सोपविण्यात आले. शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोविंदराव आदीक, दत्ता मेघे, सदानंद वर्दे, माई वैद्य यांच्यासारखे नेतेही त्यावेळी पुलोद सरकारमध्ये होते.

सांगलीत अक्षता कलशाचे पूजन; शहरातून शोभायात्रा

दादांचा विलासराव शिंदेंवर राग

ज्या विलासराव शिंदना राजारामबापुंविरोधात निवडून आणले, त्यांनीच शरद पवारांची साथ देवून आपले सरकार पाडले या गोष्टीचा राग वसंतदादा पाटील यांना होता. त्यांचा हा राग उम्या हयातीत कमी झाला नाही.

conclusion

एकंदरीत शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले की राजकारणाचा तो एक भाग होता. याला अनेक मतमतांतरे आहेत. तत्कालिन परिस्थितीत प्रत्येक राजकारणी असे काहीतरी निर्णय घेतच असतो. भारतीय राजकारणात असे अनेक उदाहरणे आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज