tasgaon news : गव्हाणमधील बैलगाडी शर्यतीत दोन बैलांचा मृत्यू : तालुक्यातील गव्हाण येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत नियमांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. प्रशासनाच्या नाकावर टिचून नियम फाट्यावर मारून शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत बैलगाडीवरील ताबा सुटल्याने बैलजोडी मणेराजुरी हद्दीतील तलावात गेली. बैलांना कासरा व सापत्यांचा फास लागला. त्यामुळे तलावात बुडून दोन बैलांचा मृत्यू झाला. या शर्यती दरम्यान बैलांचा प्रचंड छळ करण्यात आला. बैलांच्या शेपट्या तोडून जखमा करण्यात आल्या होत्या. प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते.
tasgaon news : गव्हाणमधील बैलगाडी शर्यतीत दोन बैलांचा मृत्यू
प्रशासनासमोर नियमांच्या चिंधड्या : बैलजोडी गेली तलावात : बैलांचा छळ, शेपट्या तोडल्या
गव्हाण (ता. तासगाव) येथील लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज (बुधवार) सकाळी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी विक्रम नंदकुमार यादव यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे रितसर परवानगी मागितली होती. दिघे यांनी सुमारे 35 अटी घालून बैलगाडी शर्यतीस परवानगी दिली होती. तर निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरगले, पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांची बैलगाडी मैदानावर नियुक्ती करण्यात आली होती.
सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान आदत गटातील बैलगाड्या सोडण्यात आल्या. मात्र बैलगाड्या सोडण्यापूर्वी प्रशासनाने धावपट्टी, बैलांचे आरोग्य, त्यांना काही जखमा केल्या आहेत का, यासह अन्य बाबींची शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने केवळ कागदे रंगवली होती. प्रत्यक्षात कोणतीही खातरजमा केली नव्हती. त्यामुळे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी घातलेल्या अटींचे उल्लंघन करत बैलगाडी शर्यती सोडण्यात आल्या.
या शर्यतीसाठी जास्तीत जास्त एक किलोमीटरचे अंतर दिले होते. मात्र प्रशासनाशी हातमिळवणी करुन यात्रा कमीटीने अडीच ते तीन किलोमीटर बैलगाड्या पळवल्या. या बैलगाड्या मणेराजुरी हद्दीतील साठवण तलावापासून परत येणार होत्या. मात्र संतोष पांढरे (रा. शिंगणापूर) व संतोष गलांडे (रा. अंकले, ता. जत) यांच्या बैलजोडीला या तलावाजवळ परत फिरता आले नाही. ही बैलजोडी थेट सुमारे 30 फुट तलावात गेली. यावेळी बैलांच्या गळ्यातील सापत्या व कासर्याचा बैलांना फास लागला. त्यामुळे बैलांचा बुडून मृत्यू झाला.
या शर्यतीत प्रशासनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. बैलांच्या शेपटांना प्रचंड जखमा करण्यात आल्या होत्या. मात्र या शर्यतीचे निरीक्षण करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेले निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरगले, पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी पूर्णपणे डोळेझाक केली. त्यामुळे यात्रा कमीटीने रेटून नियम फाट्यावर मारुन बैलगाड्या शर्यती घेतल्या.
tasgaon-news-two-bulls-die-in-bullock-cart-race-in-gavan
प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे लाखो रुपयांच्या मुक्या बैलांना जीव गमवावा लागला. तालुक्यातील अनेक गावात अशा पद्धतीने बैलगाड्या शर्यती घेतल्या जातात. अनेक ठिकाणी तर कोणतीही परवानगी न घेता दांडगाव्याने शर्यती घेतल्या जातात. मुक्या प्राण्यांचा प्रचंड छळ होत असताना प्रशासन मात्र नपुंसकपणे त्याकडे पाहत बसण्याचे काम करते. गव्हाण येथील शर्यतीत अनेक नियम व अटींचे उल्लंघन झाले. प्रशासनाने जर नियमांच्या अधीन राहून शर्यती घेतल्या असत्या तर मुक्या बैलांची जीव गेला नसता.
प्रकरण दडपण्यासाठी यात्रा कमीटीची पळापळ…!
गव्हाण येथील शर्यतीत दोन बैलांचा बुडून मृत्यू झाला. प्रशासनाचे सगळे नियम पायदळी तुडवून या शर्यती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान, तलावात बुडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने यात्रा कमीटीच्या पायाखालची वाळू सरकली. हे प्रकरण दडपण्यासाठी यात्रा कमीटीसह गावपुढा-यांनी सकाळपासून पळापळ सुरू केली होती. प्रशासन ’मॅनेज’ करण्याची भाषा केली जात होती.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.