sangli mahapalika news : सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रिपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या धर्तीवर सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार आहेत. विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला महायुती आव्हान देईल. महायुती संदर्भात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शहर जिल्हाध्यक्ष सकारात्मक आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) व जनसुराज्य पक्ष महायुतीमध्ये येणार का? याकडे लक्ष लागले आहे.
sangli mahapalika news : सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार
शिवसेना (शिंदे गट) व जनसुराज्यच्या भूमीकेकडे लक्ष
महापालिकेच्या निवडणुका गेल्या 21 महिन्यांपासून प्रलंबित आहेत. प्रभाग रचना व ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुका लांबल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकत्र येणार का? असे सवाल उपस्थित होत होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महायुती एकत्रित येऊन निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेली पंचवार्षिक निवडणूक भाजप पक्षाने स्वबळावर लढवली होती. तर विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती.
भाजपने सत्ता मिळवली. पण अडीच वर्षानंतर सत्ता राखता आली नाही. अडीच वर्षानंतर झालेल्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर तर काँग्रेसचा महापौर झाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. माजी महापौरांसह अनेक माजी नगरसेवकांनी आ. जयंत पाटील यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद घटत चालली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांच्या संघर्षामुळे अनेक जण फुटीच्या उंबरठ्यावर आहेत.
या परिस्थितीमध्ये भाजपचे पारडे जड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील ताकद मनपा क्षेत्रात वाढत आहे.
गेल्या वर्षभरापासून अनेक पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षात प्रवेश करत आहेत. आ. इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आदी मनपा क्षेत्रात पक्षाची ताकद वाढवत आहेत. अनेकांचा भविष्यात पक्षप्रवेश सोहळा देखील होणार आहे. पण मनपा निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीची युती होणार का? याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत. भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केल्याने सांगलीत महायुती होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र आले तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिंदे गट, जनसुराज्य व आठवले गटाला एकत्र यावे लागणार आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये शिंदे गट व जनसुराज्यची ताकद कमी आहे. गेल्या निवडणुकीत शिंदे व जनसुराज्य पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता. सध्या जनसुराज्य पक्षाने पेरणी सुरू केली आहे. भाजपचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी जनसुराज्यमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाची काय भूमीका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
sangli-mahapalika-news-bjp-ncp-to-form-alliance-for-sangli-municipal-corporation-elections
युती करून निवडणुका लढवणार: पद्माकर जगदाळे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणूनच लढवणार आहे. मनपा क्षेत्रात अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. त्यांचा प्रवेश झाल्यानंतर व निवडणुकीची प्रभाग रचना, आरक्षण सोडत झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरू होतील. त्यानंतर जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करू, पण निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितले.
वरिष्ठांचा आदेश मानून महायुती होणार: प्रकाश ढंग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. वरिष्ठांचा आदेश मानून मनपा निवडणुकीत महायुती होईल. या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश खाडे व आ. सुधीर गाडगीळ निर्णय घेतील. भविष्यात जागा वाटपचा विषय होईल त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यावर कोठेही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊनच हा निर्णय होईल, असे मत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी व्यक्त केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











