SANGLI LOKSABHA : अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा

SHARE:

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI LOKSABHA : अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा सांगली ः राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येवून आघाडी केली आहे. जिल्ह्यात एकास एक लढत झाली तर भाजपचा पराभव होवू शकतो. एकापेक्षा जास्त लढत झाली तर लढाई अवघड आहे. आघाडीतील उमेदवारीवरुन काँग्रेस नाराज आहे. राजकारणात संयम लागतो. एकदा लढाई सुरु झाली की मागे-पुढे पाहू नका, मैदान मोकळेच आहे. आपण पुढची पाऊले संयमाने टाकत आहेत. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा, असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

SANGLI LOKSABHA : अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा

जयंत पाटील यांचे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आवाहन

येथील विष्णुदास भावे नाट्य मंदीरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. अरुणअण्णा लाड, आ. सुमनताई पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, बाबासाहेब मुळीक, संजय बजाज, जिल्हा बँकेच्या संचालिका अनिता सगरे, मनोज शिंदे, विराज नाईक, जिल्हाप्रमुख संजय विभुते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, देशात गरीत, सर्वसामान्य आणि श्रीमंत जनता भरडली जात आहे.

तुमच्या खिशातून जेवढे पैसे काढता येतील, तेवढे काढण्याचे भाजपने ठरवले आहे. कोण खासदार होतंय हे महत्वाचे नाही, भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. राज्यात 30 ते 35 जागा महाविकास आघाडीला मिळतील, त्यामध्ये सांगलीतून चंद्रहार पाटलांचा असतील, असा विश्वास आहे. आपण समजूूतदारपणा घेतला पाहिजे. महाविकास आघाडीत सर्व पक्षांनी हातात हात घालला पाहिजे. तर सत्ता मिळवता येईल.

लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जागा वाटपाचा निर्णय झाला आहे.

मागील काही वर्षे जुने चेहरे निवडणूक लढवित आहेत. आता सेनेने नवीन चेहरा दिला आहे. शेतकरी, गरीब घरातल्या मुलाला मैदानात आणले आहे. आता कार्यकर्त्यांनी इकडे-तिकडे करु नये. जागा वाटपाने काँग्रेस नाराज आहे. मात्र अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, तेथे सर्वांना विश्वासात घ्यावे लागते. एकदा लढाई सुरु झाली की धावत जावू, पण संयम सोडू नका, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले.

आला तर ठीक अन्यथा सोडून लढू – बानुगडे-पाटील

फोडा आणि राज्य करा, या नितीने भाजपचा कारभार सुरु आहे. इंग्रजांनी जे केले. ते भाजपकडून सुरु आहे. ही लढाई सत्ताधार्‍यांविरोधात, हुकुमशाहीविरोधात आहे. त्यामुळे फोडा आणि राज्य करा, या निती सांगली जिल्ह्यातही सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात संभ्रम सुरु आहे. कुणा एका पक्षाचा खासदारासाठी लढाई नाही. आता सोबत येतील, त्यांना घेवून पुढे जावू. जे येणार नाहीत, त्यांना सोडून मशाल प्रज्वलित करु, असे सांगत सेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी काँग्रेसला इशारा दिला.

शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. सध्या शासन फोडाफोडीतच व्यस्त आहे.

त्यांना दुष्काळासह शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दोन महिन्यात सुमारे दोन हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी द्रोही हे सरकार आहे. सातत्याने पिकाचे हमीभाव पाडण्यात येत आहेत. जाहीरनाम्यात अनेक गॅरंटी दिली. मात्र त्यांची वॉरंटी काय आहे ? लोकांच्या खात्यावर 15 लाख रुपये देतो,पक्की घर बांधतो, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधतो, देश आत्मनिर्भर करतो, अशी गॅरंटी दिली. मात्र त्यांच्या पक्षाचीच आज गॅरंटी राहिली नाही त्यांच्या पक्षालाच आत्मनिर्भर करण्याची वेळ आली आहे.

देशात अस्वस्थता वाढतेय ः आ. लाड

एका महिन्यात विकासाचा मुद्दा का उपस्थित झाला नाही ? यावर कोणीही बोलत नाही. दिलेल्या आश्वासनावर कोणी बोलत नाही. उद्योग आणतो, 15 लाख खात्यावर टाकतो, त्याचे काय झाले. त्यावर कोणीही बोलत नाही. देशभरात रेल्वेच्या अनेक कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी मोदीच कशाला हवा? शेतकर्‍यांच्या प्रश्नाचं काही देणंघेणं नाही. शिक्षण संपत चाललाय देशात अस्वस्थता वाढत चालल्याची टीका आ. आमदार अरुणअण्णा लाड यांनी केली.

आमदार सुमनताई पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीबाबत चांगलं वातावरण तयार झालं आहे. चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ठाम राहून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

एकदा कंडका पाडाच ः संजय विभुते

काँग्रेसचे नेते आम्हाला भेटतच नाहीत, ज्योतिषाकडे जावून त्यांना शोधायचे ेेंका? काँग्रेसची जर ताकद होती, तर 2019 मध्ये खासदार का निवडून आणला नाही. आ. विक्रम सावंत यांना का त्रास होत आहे, त्याचे दुखणं काय आहे, हे समजले नाही. आम्ही नुरा कुस्ती करणार नाही. आमचे कार्यकर्ते चिडले तर तुम्हाला ते सोसणार नाही, त्यामुळे एकदा कंडका पाडाच, असे विनंती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केली.

यावेळी दिगंबर जाधव, बजरंग पाटील, अजित सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लाड, हिंदकेसरी संतोष वेताळ, डेमॉक्रटिक पार्टीचे सुकुमार कांबळे, ताजुद्दीन तांबोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

तर मी निवडणुकीतून माघार घेतो ः चंद्रहार पाटील

चार वेळा माझ्या उमेदवारांची घोषणा झाली. मात्र घटक पक्ष आमच्यापासून लांब राहत आहेत. नेमके त्यांचे दुखणं काय आहे, हे माझ्या अजूनही लक्षात आले नाही. मी शेतकर्‍यांचा मुलगा आहे. हे त्यांना आवडत नसेल किंवा माझ्या घरात कोणी आमदार नाही, खासदार नाही, माझे आजोबा मुख्यमंत्री नाहीत, माझा कारखाना नाही, त्यामुळे उमेदवारीत माझी अडचण वाटत असेल तर काँग्रेसने तसे जाहीरपणे सांगावे, मी निवडणुकीतील माघार घेतो, असे चंद्रहार पाटील यांनी जाहीरपणे सांगितले.

मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

महाविकास आघाडीतील धुसफूस आता पेट धरू लागली असून सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्या मोठ्या संख्येने आलेल्या पदाधिकार्‍यांसह प्रचारात उतरले. दरम्यान काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम, आ. जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत व पृथ्वीराज पाटील हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले असल्याचे समजते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *