rajkiyalive

SANGLI : खासदारांच्या होमग्राऊंडवर विशाल पाटलांची कसोटी

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI : खासदारांच्या होमग्राऊंडवर विशाल पाटलांची कसोटी : सांगली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राउंड असलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेसचे विशाल पाटील आणि डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही जोर लावला आहे. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विशाल यांच्यासोबत आहेत. संजयकाकांच्या बालेकिल्लयात प्रचार सभा, बैठका आणि ठिकठिकाणी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यापूर्वी आमचा खासदार अन् तुमचा आमदार असे समीकरण होते, परंतु आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि खासदारांचे पुत्र प्रभाकर यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रंगीत तालीम ठरणार आहे. विरोधकांनी खासदारांचा बालेकिल्ला टार्गेट केल्याचे दिसून येत असले तरी अपक्ष विशाल आणि महाविकासचे चंद्रहार पाटील यांची मतांसाठी कसोटी लागणार आहे.

SANGLI : खासदारांच्या होमग्राऊंडवर विशाल पाटलांची कसोटी

चंद्रहार पाटलांची मतासाठी धडपड, युवा नेत्यांसाठी ठरणार विधानसभेची रंगीत तालीम

निवडणुकीचे रण तापू लागले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपचे खासदार संजयकाका यांचा तासगाव तालुका बालेकिल्ला आहे. गत दोन निवडणुकांमध्ये तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून त्यांनी एकतर्फी आघाड़ी घेतली होती, ’आपलात खासदार, आपलाच आमदार,’ असे म्हणत तासगाव तालुका खासदार संजयकाका यांच्या मागे उभा होता. मात्र मागील पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने विरोधकांनी संजयकाकांचा बालेकिल्ला घेरायला सुरुवात केली आहे. खासदार संजय पाटील यांच्या विरोधात यावेळी पुन्हा एकदा विशाल पाटील अपक्ष महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांनी देखील शड्डू ठोकला आहे. या सर्वांनी सध्या तासगाव तालुक्यात मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महाविकास आघाडीसोबत आहेत.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेतली आहे, असे चित्र दिसत आहे. आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महाविकास आघाडीसोबत आहेत. परंतु राष्ट्रवादीचे बहुतांशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशाल पाटील यांच्याच प्रचारामध्ये उतरलेले दिसत आहेत. परंतु अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच खासदार संजयकाका पाटील यांनीही तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ पिंजून काढला आहे.

अजितराव घोरपडे यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांची साथ सोडली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांची साथ सोडली आहे. ते विशाल पाटलांसोबत आहेत. घोरपडे यांनी कवठेमहांकाळ तालुका आणि मिरज पूर्व भागामध्ये विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका घेण्याचा धडाका लावलेला आहे. गावोगावी जाऊन ते विशाल पाटील यांना निवडून आणल्याचे आवाहन करीत आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरेे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यामध्ये प्रचार दौरा पूर्ण केलेला आहे. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत.

तासगाव तालुक्यातीलच स्वाभिमानी पक्षाकडून महेश खराडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

उसाला जास्तीचा दर मिळावा आणि थकित बिले मिळावीत यासह शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी गेली पाच वर्षे आंदोलन केले होते, त्यामुळे ऊस आणि द्राक्ष उत्पादकांचे काही प्रश्न सुटले, केलेल्या कामांवर त्यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. य मतदारसंघामध्ये त्यांना मिळणार्‍या मताचा फटका नेमका कुणाला बसणार याबाबतही चर्चा रंगली आहे.

लोकसभेनंतर चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत आहे.

यापूर्वी आमचा खासदार अन् आमचा आमदार असे समीकरण होते, परंतु आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि खासदारांचे पुत्र प्रभाकर हे दोन्ही युवा नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. युवा नेत्यांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा रंगीत तालीम ठरणार आहे. त्यामुळे दोघांकडूनही प्रचारासाठी जोर लावला जाईल, असे चित्र दिसून येते.

‘आमचा खासदार, आमचाच आमदार’ला कलाटणी मिळणार

मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काका आणि आबा गटात समझोता दिसत होता. मात्र गेल्या चार साडेचार वर्षांत दोन्ही गट पुन्हा एकदा टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत ठळकपणे दिसत आहे. ’आमचा खासदार ! आमचाच आमदार’ या घोषवाक्याला यावेळी कलाटणी मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील मते मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज