rajkiyalive

LOKSABHA 2024 RESULT : सांगली, हातकणंगले, कोल्हापूरात धाकधूक वाढली

जनप्रवास । सांगली

LOKSABHA 2024 RESULT : सांगली, हातकणंगले, कोल्हापूरात धाकधूक वाढली : सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) होत असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सांगलीत काट्याची टक्कर झालेल्या निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील की अपक्ष विशाल पाटील बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LOKSABHA 2024 RESULT : सांगली, हातकणंगले, कोल्हापूरात धाकधूक वाढली

सांगलीत काका कि विशाल, कोल्हापुरात महाराज की संजय मंडलिक, हातकणंगलेत सत्यजित पाटील, धैयशिल माने की राजू शेट्टी

याशिवाय महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह 20 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू महाराज की शिवसेनेचे संजय मंडलिक, तर हातकणंगलेत सेनेचे धैर्यशिल माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा फैसला होईल. विजयाचा गुलाल आपल्याला लागावा, यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. निकालाला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. सांगलीसाठी 62.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तब्बल 26 दिवसांनंतर मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी आणि अपक्षांसह 20 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तरी खरी लढत ही भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे बंडखारे व अपक्ष उमेदवार विशाल पाटील या दोन उमेदवारातच झाली, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु महाविकास आघाडीतील फुटीमुळे ठाकरे गटाची निवडणुकीत कोंडी झाली होती.

यंदा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेने (उबाठा) कोल्हापुरची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. ही निवडणूक काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची राहिली. माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांचीही विशाल यांनाच छुपी मदत झाली असल्याची चर्चा आहे.

भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी हॅटट्रिक करण्याचा चंग बांधला, मात्र भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष दिसून आला. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी खासदारांवर आरोप करीत त्यांच्याविरोधात प्रचार केला. त्यामुळे लोकसभेची जागा कायम राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांना कस लागला होता. अखेरच्या टप्प्यात भाजपने मतदार खेचण्याचा प्रयत्न केला होता.

महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेवून प्रचाराचे रान तापवण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविकास आघाडीत फूट पडल्याने काँग्रेस नेते उघडपणे कमीच दिसून आले होते, त्यामुळे सेना बॅकफूटवर गेली होती. भाजप, महाविकास आघाडी आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची राहिली. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंडलिक यांच्यासमोर काँग्रेसचे शाहू महाराज यांच्यात जोरदार लढत

कोल्हापुरात विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर काँग्रेसचे शाहू महाराज यांच्यात जोरदार लढत झाली होती. हातकणंगले मतदारसंघात हातकणंगलेत सेनेचे धैर्यशिल माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी तिरंगी चुरशीची निवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी सेनेचे खासदार असल्याने जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस तळ ठोकून मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवली होती.

शेट्टींच्या अस्तित्वाची लढाई

राजू शेट्टी यांनी राजकीय पक्षांचा पाठिंबा न घेता ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी केलेल्या आंदोलनावर मते मागितली. निवडणुकीपूर्वी ऊस दरासाठी शेट्टीने सांगली कोल्हापूर जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडले होते. दोन्ही जिल्ह्यातील कारखानदारांना वेठीस धरले. दोन्ही जिल्ह्यातील कारखानदारांना एफआरपी देण्यास भाग पाडल्याने शेतकरी मागे राहतील असा अंदाज बांधण्यात आला. याशिवाय महायुतीचे धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील हे दोन मराठा उमेदवार असल्याने जैन समाजाची मते आणि उर्वरित शेतकर्‍यांच्या मतांवर दोन्ही उमेदवारांपेक्षा आपण वरचढ राहण्याचा अंदाज शेट्टींना आहे.

सांगली लोकसभेसाठी मिरज रोडवरील सेंट्रल वेअर हाऊसच्या गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रथम टपाली मतदानांची मोजणी होईल. त्यामध्ये निवडणूक कर्मचारी, सैनिक मतदार यांच्या समावेश असेल. त्यानंतर पहिली फेरी शक्य आहे. त्यानंतर प्रत्येक एक फेरी याप्रमाणे निकाल जाहीर होतील. निकालाचा कल सकाळी अकरा वाजता, तर दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

मतमोजणीसाठी किती टेबल राहणार, किती आणि कर्मचारी असणार याचे पूर्ण नियोजन झालेले आहे, तर सांगली लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण मतमोजणी सरासरी 21 फेर्‍यात पूर्ण होणार आहेत. यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आले आहेत.

20 उमेदवारांचे भवितव्य ठरणार

सांगली लोकसभेसाठी 20 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. मात्र खरी लढत भाजपचे संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यातच झाली. याशिवाय सिकंदर पटवेगार (बहुजन समाज पार्टी), आनंद नलगे (बळीराजा पार्टी), महेश खराडे (स्वाभिमानी पक्ष) यांच्यासह अपक्षांचे भवितव्य निकालावर ठरणार आहे, त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असल्याचे चित्र दिसत होते.

अशी होणार मतमोजणी

– सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु,
– मतमोजणीचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग,
– फेरीनिहाय मतमोजणीची माहिती ध्वनीक्षेपकावरून मिळणार,
– विनापरवाना मतमोजणी कक्षात प्रवेशाला प्रतिबंध
– मतमोजणी कक्षात भ्रमणध्वनी व इलेक्ट्रॉनिक उपकरणास बंदी,
– शासकीय 6 हजार 881 कर्मचार्‍यांचे टपाली मतदान.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज