rajkiyalive

SANGLI CONGRESS : अकरा वर्षानंतर काँग्रेस भवन गुलालाने न्हाहले

जनप्रवास । सांगली

SANGLI CONGRESS : अकरा वर्षानंतर काँग्रेस भवन गुलालाने न्हाहले : सांगली लोकसभा मतदारसंघाची 2009 ची निवडणूक आणि महापालिकेच्या 2013 च्या निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस कमिटीसमोर अकरा वर्षात जल्लोष झाला नाही. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी काँग्रेसला विजयश्री खेचून आणल्याने सांगलीत काँग्रेस कमिटी व विष्णूअण्णा भवनसमोर दिवसभर जल्लोष दिला. काँग्रेस भवन गुलालात न्हाहले. तर दुसरीकडे खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर सन्नाटा होता. उबाठा गटाचे चंद्रहार पाटील यांचे कार्यालय देखील कुलूप बंद होते.

SANGLI CONGRESS : अकरा वर्षानंतर काँग्रेस भवन गुलालाने न्हाहले

‘भाजप’ कार्यालयासमोर सन्नाटा: उबाठा कार्यालयाला कुलूप

सांगली लोकसभा मतदारसंघात 2009 च्या निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा पराभव केला होता. त्यावेळी काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. त्यानंतर 2013 च्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचा पराभव करून महापालिकेत सत्ता मिळवली होती.

त्यावेळी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर जल्लोष केला होता. मात्र त्यानंतर 2014 ची लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, 2018 ची महापालिका निवडणूक व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यामुळे गेल्या अकरा वर्षांपासून काँग्रेसमध्ये सन्नाटा होता. अनेक कार्यकर्ते काँग्रेसपासून लांब गेले होते.
पण 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी एकीचा नारा दिला.

आ. विश्वजीत कदम, विशाल पाटील, आ. विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी एकी दाखवली. उमेदवारी मिळाली नाही तरी देखील विशाल पाटील अपक्ष लढले आणि निवडून आले. त्यामुळे काँग्रेस कमिटीसमोर अकरा वर्षांनी गुलाल दिसला. काँग्रेस कमिटी गुलालाने न्हाहून निघाली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. गुलालाची प्रचंड उधळण झाली. रस्त्यावर गुलालाच सडा पडला होता. सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत कार्यकर्ते एकच जल्लोष करत होते.

दुपारी पडलेल्या पावसात देखील कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह कायम होता.

अनेक वर्षांपासूनची काँग्रेस कार्यकर्त्यांची विजयाची असलेली इच्छा पूर्ण झाली. विष्णूअण्णा भवनवर देखील जयश्रीताई पाटील समर्थक कार्यकर्त्यांची जल्लोष केला. तर दुसरीकडे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे मार्केट यार्डातील कार्यालय व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग कार्यालयासमोर दिवसभर सन्नाटा होता. भाजपचे कार्यकर्ते सकाळी कार्यालयात गोळा झाले होते. मात्र दुपारी बारानंतर निकालाचा कल बदलत गेल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी कार्यालय सोडले. त्यामुळे भाजपच्या कार्यालयासमोर शांतता पसरली होती.

तर महाविकास आघाडीचे प्रचंड युध्द करून उमेदवारी मिळावलेले उबाठा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले. मतदानादिवशी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी त्यांचे कार्यालयच उघडले गेले नाही. त्यांच्या कार्यालयाला मंगळवारी दिवसभर कुलूप लावले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज