जनप्रवास । प्रतिनिधी
MARATHA RESEARVATION : सांगलीत ऑगस्टमध्ये जरागेंचे वादळ अन् ओबीसींचा राज्यस्तरीय एल्गार : राज्यात मराठा व ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरून प्रचंड तेढ निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध होऊ लागला आहे. तर मराठा समाजातील कुणबी व सगेसोयर्यांना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारपासून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. तर दि. 8 ऑगस्टला त्यांची जाहीर सभा सांगलीत होणार आहे. या विरोधात प्रतिआंदोलन म्हणून ओबीसी समाजाचा राज्यस्तरीय एल्गार मेळावा दि. 11 ऑगस्टला सांगलीत होणार आहे. या आरक्षण वादामुळे मराठा व ओबीसी समाजात चांगलेच वातावरण तापणार आहे.
MARATHA RESEARVATION : सांगलीत ऑगस्टमध्ये जरागेंचे वादळ अन् ओबीसींचा राज्यस्तरीय एल्गार
मराठा व ओबीसी आरक्षण वादामुळे वातावरण तापणार
सगेसोयर्यांसह सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आंदोलन स्थगित केले होते. मात्र पुन्हा आंदोलनाचे हत्यार त्यांनी उपसले आहे. सगेसोयर्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा अध्यादेश काढावा, यासाठी शासनाला दि. 13 जुलैची मुदत दिली होती. ती मुदत संपली आहे. त्यानंतर जरांगे यांनी दि. 20 जुलैपासून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा ऑगस्टमध्ये करण्यात आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात ते दि. 8 ऑगस्टला येणार आहेत. सांगलीमध्ये त्यांची सभा देखील होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी मराठा समाजाच्या पदाधिकार्यांनी सुरू केली आहे. या सभेत ते काय भूमीका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तर दुसरीकडे ओबीसी समाजाने जरांगे यांच्या विरोधात प्रतिआंदोलनाची तयारी केली आहे. त्याचे रणशिंग फुंकण्याचे ठिकाण देखील सांगलीच निश्चित केल आहे. मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. त्यामुळे जरांगे आंदोलन करून शासनावर दबाव आणत आहेत. शासनाने त्यांची मागणी मान्य करू नये म्हणून ओबीसी समाजाने एल्गार दिला आहे.
त्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगलीतील ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. तर गुरूवारी शिष्टमंडळाने मुंबईत मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या मेळाव्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. याबरोबर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्याबरोबर अनेक ओबीसी समाजाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
दोन्ही समाजाचे स्वतंत्र मेळावे ऑगस्ट महिन्यात सांगलीत होणार आहेत. तीन दिवसाच्या अंतरावर हे मेळावे आहेत. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजात वातावरण चांगलेच तापणार आहे. विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. जरांगे-पाटील यांनी सत्ताधार्यांचे उमेदवार पाडण्याची धमकी यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या मेळाव्यात ते काय भूमीका मांडणार? याला महत्व आहे. तर ओबीसी समाजाने देखील उमेदवार देण्यासंदर्भात विचार करू, असा इशारा सरकारला दिला आहे. त्यामुळे सांगलीत होणार्या मराठा व ओबीसी समाजाच्या मेळाव्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची दाट शक्यता आहे
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.