सांगली :
SANGLI CRIME NEWS : हरिपूर मधील विस्तारित भागात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंगले फोडून घरफोडी : 40 तोळे दागिने दोन लाखांची रोकड लंपास. : मिरज तालुक्यातील हरिपूर गावच्या हद्दीत असलेल्या विस्तारित भागात चोरट्यांचा हैदोस पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन बंगले फोडून घरफोडी करत 40 तोळे सोन्या-चांदीचे आणि दोन लाखांची रोकड दागिने असा एकूण सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घरफोडीची घटना हि सोमवार दि. 05 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झाली.
SANGLI CRIME NEWS : हरिपूर मधील विस्तारित भागात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंगले फोडून घरफोडी : 40 तोळे दागिने दोन लाखांची रोकड लंपास.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी धाव घेतली होती. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पाहणी करत संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली. दरम्यान, घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वान हे चोरट्यांचा माग काढत अडीच किलोमीटर गेले आणि तेथेच घुटमळले. या प्रकरणी प्रशांत प्रदीपकुमार अडसुळे (रा. सुमंगल पार्क, हरिपूर) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोंदवलेकर महाराज मठ आणि स्वामी समर्थ महाराज मठ याठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, प्रशांत अडसुळे हे खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांचे वडिल प्रदीपकुमार हे आजारी असल्याने त्यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे घरातील सर्वजण रविवारी रात्री बंगल्यास कुलुप लावून रुग्णालयात गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते तीन चोरट्यांनी फिर्यादी प्रशांत अडसुळे यांचा बंगल्याचा कडी – कोयंडा उचकटून आत प्रवेश केला.
आतील लोखंडी कपाटात असलेले सुमारे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख 2 लाख रुपये घेवून तेथून पोबारा केला. परिसरातील आणखी एक बंगला फोडला. परंतु त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यत नोंद करण्यात आलेली नव्हती. चोरट्यांनी जाताना हरिपूर येथील गोंदवलेकर महाराज मठ आणि गजानन महाराज मंदिर येथेही चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. तेथून चोरटे पसार झाले. दरम्यान चोरीचा प्रकार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रदीपकुमार अडसूळ हे घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना घटनेची कल्पना दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देवून परिसराची पाहणी केली. श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले. फिर्यादी प्रशांत अडसुळे यांच्या घरापासून गोंदवलेकर महाराज मठापर्यत श्वान पथकाने माग काढला परंतु नंतर ते परिसरातच घुटमळले. रविवारी मध्यरात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरट्यांनी अक्षरश: धुडगुस घातल्याचे पहावयास मिळाले. पोलीस तपासात सीसीटिव्हीत दोन ते तीन चोरटे दिसत असल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीकोनातून पोलीस तपास सुरु आहे. दोन पोलीस पथके चोरट्यांच्या शोधार्थ पाठविण्यात आली आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.