rajkiyalive

islampur vidhansabha 2024 : निशिकांत पाटील, प्रभाकर पाटील घड्याळ बांधणार

भाजपला झटका, पवार गटाला धक्का देण्यासाठी अजित दादांची खेळी

सांगली / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागावाटप निश्चित होत असताना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे हातात घड्याळ बांधणार आहेत. निशिकांत दादा आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात तर प्रभाकर हे माझी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित यांच्या विरोधात शड्डू मारण्याच्या आहेत. शरद पवार गटाला धक्का देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खेळी यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जिल्ह्यातील नेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत असताना दोन्ही नेत्यांच्या रूपाने भाजपला झटका बसणार असल्याचे स्पष्ट दिसते.

islampur vidhansabha 2024 : निशिकांत पाटील, प्रभाकर पाटील घड्याळ बांधणार

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या विविध भागात नाराजांसह दुरावलेल्या नेत्यांची मोट बांधत आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्राकडे भाजप नेत्यांनी मात्र दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे पंधरा दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. गडकरी जिल्ह्यात आल्याने राजकीय खलबते होतील, अशी चर्चा भाजपच्या नेत्यांकडून बाळगण्यात आली, मात्र तसे काहीच झाले नाही. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे जिल्हा दौर्यावर आले होते. त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जावून निवडणुकीबाबतचा आढावा केवळ घेतला होता.

महायुतीकडून येत्या दोन दिवसात पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऍक्टिव्ह झाले आहेत. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्या जागांवर दावा सांगितला आहे. इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मागील काही वर्षांपासून राजकीय वर्चस्वावरून मतभेद आहेत. याशिवाय तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्यामुळे इस्लामपूर आणि तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. इस्लामपूर मतदारसंघाबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आग्रही आहेत. मात्र गतवेळप्रमाणेच यंदाही शिवसेनेने या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. इस्लामपूर शिंदे सेनेला मिळावा यासाठी निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीलाच उघड विरोध करण्याचे धोरण सेनेने अवलंबले होते. आनंदराव पवार आणि गतवेळी सेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले गौरव नायकवडी यांचे नाव त्यासाठी पुढे करण्यात आले आहे.

निशिकांत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे .

भाजपपासून फारकत घेऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ हातात बांधण्याची तयारी दर्शवली आहे. पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे समजते. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक लढत देण्याचा वरिष्ठ नेत्यांचाही प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष पक्षाला सोडचिट्टी देऊन अजित दादांना साथ देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील रिंगणात उतरणार आहेत. मात्र, महायुतीच्या फॉर्म्युल्याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेकडून तत्कालीन राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीत हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आण्याची शक्यता आहे. लोकसभेला संजयकाका पाटील यांचा झालेला पराभव आणि विधानसभेला रोहित पाटील यांचा होत असणारा उदय लक्षात घेऊन भाजप या मतदारसंघातही इस्लामपूर प्रमाणेच संभ्रमात आहे. त्यामुळे उमेदवारांपुढे चांगल्या पर्यायाची किंवा निवडणुकीसाठी त्वेषाने उतरण्याची आवश्यकता आहे. भाजप या दोन्ही मतदार संघांकडे तेवढ्या आग्रहीपणाने पाहत नाही. ही बाब लक्षात घेऊन अजितदादा पुढे सरसावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, माजी खासदार संजयकाका राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे लवकरच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.

भाजपमध्ये गळचेपी, नेते नाराज

भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यापूर्वी सांगली जिल्ह्यातील नेत्यांना बळ दिले होते. परंतु गेल्या काही वर्षात फडणवीस यांच्याकडूनही पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दहा वर्षात भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लवला होता. काही दिवसापूर्वी खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन तुतारी हातात घेतली. जतचे माजी आमदार विलासराव जगताप नाराज आहेत. अशातच भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व माजी खासदार संजयकाका पाटील हे दोन्ही नेते अजितदादांना साथ देणार असल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसणार आहेत.

 

जिल्हाध्यक्षांवरच पक्ष बदलण्याची नामुष्की

वास्तविक गेल्या अनेक वर्षापासून इस्लामपूर मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आहे. लोकसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे तळ ठोकून धैर्यशील मानेंना निवडून आणले आहे. अजितदादांनी इस्लामपूर मतदार संघावर हक्क सांगितल्याने भाजपला काही फरक पडणार नाही. गेल्या निवडणुकीतही येथून शिवसेनेने उमेदवार दिला होता. सध्या निशिकांत पाटील भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. तडजोडीच्या राजकारणात त्यांच्या हातात जर घड्याळ आले तर भाजप जिल्हाध्यक्षांनाच पक्ष बदलण्याची नामुष्की येणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज