rajkiyalive

kolhapur election news : कोल्हापूर जिल्ह्यात विद्यमानांना शह देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली

गटातटाच्या राजकारणाबरोबर पक्षीय राजकारण ही होणार

जयसिंगपूर/ अजित पवार

kolhapur election news : कोल्हापूर जिल्ह्यात विद्यमानांना शह देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस पक्ष तीन, राष्ट्रवादी अजित पवार गट दोन, शिवसेना शिंदे गटा एक, जनसुराज्य शक्ती पक्ष एक आणि अपक्ष दोन ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत. विद्यमान आमदारांना शह देण्याकरता विरोधकांनी कंबर कसली आहे. यामुळे गटातटाच्या राजकारणाबरोबरच पक्षीय राजकारण मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

kolhapur election news : कोल्हापूर जिल्ह्यात विद्यमानांना शह देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली

शिरोळ मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), इचलकरंजी प्रकाश आवाडे (अपक्ष), हातकणंगले राजू बाबा आवळे (काँग्रेस), शाहुवाडी पन्हाळा मतदार संघात विनय कोरे (जनसुराज्य शक्ती पक्ष), कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी अजित पवार गट), चंदगड राजेश पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट), कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील ( काँग्रेस), कोल्हापूर उत्तर कै. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (काँग्रेस), राधानगरी भुदरगड प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे गट) प्रतिनिधित्व करीत आहेत. यापैकी करवीर विधानसभा मतदारसंघ पी.एन. पाटील यांचे निधन झाल्याने सध्या रिक्त आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. बदललेल्या सत्ता संघर्षाच्या समीकरणात कोल्हापूर जिल्हा ही मागे पडला नाही. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शह देण्याकरिता विरोधी महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील आणि माजी आमदार उल्हास पाटील हे इच्छुक आहेत. पण या दोघांपैकी एकास एक फाईट झाली तर मात्र निवडणूक अटीतटीची होऊ शकते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार कोण, हे पहावे लागणार आहे. यानंतरच विधानसभा कोण गाठतो हे निश्चित होणार आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आवाडे यांनी आपला पुत्र राहुल आवाडे यांची उमेदवारी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण आवाडे यांना शह देण्याकरिता महाविकास आघाडीकडून कोण, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मदन कारंडे हे सुद्धा इच्छुक आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र माने या मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता प्रयत्नशील आहेत. हातकणंगले मतदारसंघात राजूबाबा आवळे हे यांच्या विरोधात जनसुराज्य- भाजपचे नेते दलितमित्र अशोक माने आणि माजी आम. सुजित मिणचेकर इच्छुक आहेत.

शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघात विनय कोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांना या निवडणुकीत मतदारांना सामोरे जावे लागणार आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना शाहू उद्योग समूहाचे समरजीतसिंह घाटगे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील यांना नंदिनी बाभुळकर, आप्पी पाटील, शिवाजी पाटील यांचे कडवे आव्हान होऊ शकते.

कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांना माजी आमदार अमल महाडिक अथवा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा सामना करावा लागणार आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव स्वतः इच्छुक असल्या तरी सत्यजित जाधव, दश्मिका जाधव, काँग्रेस नेते सचिन चव्हाण, सारंगधर देशमुख, मधुरिमाराजे छत्रपती अथवा माजीमंत्री आणि काँग्रेसचे नेते बंटी पाटील, भाजपकडून सत्यजितनाना कदम हे सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात सध्या प्रकाश आबिटकर हे नेतृत्व करीत आहेत. पण त्यांना माजी आमदार के. पी. पाटील अथवा ए. वाय. पाटील यांचा महाविकास आघाडीकडून सामना करावा लागणार आहे. करवीर मतदारसंघातून कै. पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके तर जनसुराज्यशक्तीकडून संताजी घोरपडे यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज