दिनेशकुमार ऐतवडे
sangli vidhansabha news : सांगली मतदार संघात 17 पैकी 11 वेळा दादा घराण्यातील उमेदवार :सांगली विधानसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये 2004 नंतर दुसर्यांना बंडखोरी झाली आहे. काँग्रेसची उमेदवारी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना मिळाली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. दादा घराण्याला डावलले असा सूर सध्या उमटत असला तरी गेल्या 17 विधानसभा निवडणुकीत 11 वेळा दादा घराण्याला उमेदवारी मिळाली आहे. तसेच दोन वेळा वसंतदादा पाटील विधानपरिषदेवर असल्याने त्यांनीच बाहेरील उमेदवारीला संधी दिली होती.
sangli vidhansabha news : सांगली मतदार संघात 17 पैकी 11 वेळा दादा घराण्यातील उमेदवार
2004 मध्ये मदन पाटील यांनी बंडखोरी केली तर आता त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी 2024 मध्ये बंडखोरी केली आहे. राज्याची निर्मिती व्हायच्या अगोदरच मुंबई प्रातांसाठी निवडणूक व्हायच्या. 1952 मध्ये पहिल्यांदा सांगली विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यावेळी थोर स्वातंत्र्यसैनिक वसंतदादा पाटील यांना पहिल्यांदा काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यानंतर पुन्हा 1957 आणि 1962 मध्ये वसंतदादांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी विजयाची हॅट्रीक केली. 1967 मध्ये दादांनीही सांगलीतून आप्पासाहेब बिरनाळेंना उभे केले. त्यानंतर 1972 मध्ये दादा विधानपरिषदेवर असल्याने त्यांनी पुन्हा एकदा बाहेरील म्हणजे प्रा. पी. बी. पाटील यांना उभे करून निवडून आणले.
1978 मध्ये पुन्हा एकदा दादा निवडणुकीला सामोरे जावून आमदार झाले.
1980 मध्ये मध्यावधी निवडणुका लागल्या. यावेळी दादांनी आपल्या पत्नी शालिनीताई पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली त्याही निवडून आल्या आणि आमदार झाल्या. 1985 च्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा वसंतदादा आमदार झाले. परंतु 1986 मध्ये त्यांची राज्यस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्याने येथील जागा रिकामी राहिली.
सांगलीत पोटनिवडणूक लागली आणि दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांना उमेदवारी मिळाली. दादा हयात असताना विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव झाला. संभाजी पवार या नवख्या तरूणांना त्यांचा पराभव केला. 1952 नंतर पहिल्यांदाच दादा घराण्यातील उमेदवाराचा पराभव झाला होता.
त्यानंतर 1990 मध्ये पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका लागल्या. काँग्रेसची उमेदवारी पुन्हा एकदा विष्णुअण्णा पाटील यांना मिळाली तर विरोधी गटातर्फे जनता दलातर्फे संभाजी पवार यांना मैदानात उतरवण्यात आले. याहीवेळी विष्णुअण्णा यांचा पराभव झाला संभाजी पवार दुसर्यांना आमदार झाले.
1995 मध्ये वसंतदादांचे पूत्र प्रकाशबापू पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. उमेदवारी न मिळाल्याने विष्णुअण्णांचे पूत्र मदन पाटील यांनी बंडखोरी केली. जनता दलातर्फे पुन्हा एकदा संभाजी पवार पुढे होतेच. त्यावेळी प्रकाशबापू पाटील आणि मदन पाटील या दोघांचाही पराभव झाला. दादा घराण्यातील या दोघांचा एकाचवेळी पराभव झाला.
पहिल्यांदा दादांच्या विचाराबाहेरील उमेदवार
1999 मध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकर लागल्या. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच झाल्या. काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी प्रकाशबापू पाटील यांना मिळाली तर राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी मदन पाटील यांना मिळाली. विधानसभेला काँग्रेसची उमेदवारी सांगलीवाडीचे नगरसेवक दिनकर पाटील यांना मिळाली तर विरोधी गटातर्फे संभाजी पवार उभे होते. यावेळी पहिल्यांदाच संभाजी पवारांचा पराभव झाला.
2004 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. विद्यमान आमदार असल्याने दिनकर पाटील यांनाच तिकीट मिळाली. मदन पाटील गट नाराज झाला. त्यांनी बंडखोरी केली आणि विजय मिळविला. 1985 नंतर पहिल्यांदा 2004 मध्ये दादा घराण्यातील उमेदवारी सांगली विधानसभेला निवडून आला.
2009 मध्ये मदन पाटील यांना पुन्हा एकदा काँग्रेसची उमदेवारी मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपने संभाजी पवारांना उतरवले. मंत्री असतानाही मदन पाटील यांचा पराभव झाला. 2014 मध्ये पुन्हा एकदा मदन पाटील यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळाली. परंतु नवख्या सुधीर गाडगीळ यांनी त्यांचा पराभव केला. 2016 मध्ये मदन पाटील यांचे निधन झाले.
2019 च्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. यावेळी दुसर्यांना भाजपच्या सुधीर गाडगीळ यांनी बाजी मारली. यंदा 2024 मध्ये पुन्हा एकदा पृथ्वीराज पाटील यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. परंतु जयश्री पाटील यांनी बंड केले आहे.
आजपर्यंत 17 वेळा विधानसभेची निवडणूक
11 वेळा दादा घराण्यात उमेदवारी
दोन वेळा दादांनीच दिले बाहेरचे उमेदवार
बापू आणि मदन पाटील लोकसभेला असल्याने दिनकर पाटील यांना मिळाली उमेदवारी
पृथ्वीराज पाटील यांच्या रूपाने दोनवेळा दादा घराण्याबाहेर उमेदवारी
1952 वसंतदादा पाटील
1957 वसंतदादा पाटील
1962 वसंतदादा पाटील
1967 आप्पासाहेब बिरनाळे
1972 प्रा. पी. बी. पाटील
1978 वसंतदादा पाटील
1980 शालिनीताई पाटील
1985 वसंतदादा पाटील
1986 विष्णुअण्णा पाटील
1990 विष्णुअण्णा पाटील
1995 प्रकाशबापू पाटील
1999 दिनकर पाटील
2004 दिनकर पाटील
2009 मदन पाटील
2014 मदन पाटील
2019 पृथ्वीराज पाटील
2024 पृथ्वीराज पाटील
अशा तर्हेने आजपर्यंत झालेल्या 17 विधानसभा निवडणुकीत 11 वेळा दादा घराण्याला उमेदवारी मिळाली असून, दादांच्या विचाराबाहेेेेरील केवळ दोघांनाच उमेदवारी मिळाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.