सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर स्पर्धेत, कठोर निकषांत कुणाचा नंबर
sangli bjp news : भाजपमध्ये रस्सीखेच कुणाला संधी, कुणाला कात्री: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी आझाद मैदानात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सत्ताधारी आमदारांचे डोळे लागले आहेत. त्यातच भाजप आणि एकनाथ शिंदें यांनी यंदा मंत्रिपदं देताना कठोर निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे.
sangli bjp news : भाजपमध्ये रस्सीखेच कुणाला संधी, कुणाला कात्री
जिल्ह्यात भाजपचे चार तर शिंदे गटाचा एक आमदार निवडून आला आहे. भाजपचे आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सत्यजित देशमुख तर शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्यात रस्सीखेच आहे. ज्येष्ठता, जातीय समीकरणे आणि जिल्ह्यातील वर्चस्व या निकषांवर मंत्रिपदाची गळ्यात पडणार आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये कोणत्या आमदाराची मंत्रिपदी निवड होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले होते, त्यानंतर निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, त्यानंतर पंधरा दिवस मुख्यमंत्री पदावरुन भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनेत मतभेद सुरु होते. अखेर बुधवारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता होती, मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभराने लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले असून आठपैकी पाच आमदार निवडून आले आहेत. भाजपचे चार आणि शिंदे गटाचे एक आमदार आहेत. 2014 मध्येही जिल्ह्यात भाजप चार आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता, त्याची पुनर्रावृत्ती 2024 मध्ये झालेली पहायला मिळत आहे.
जिल्ह्यातून मंत्रिपद मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यासाठी त्यांनी लॉबिंग सुरू केले असून समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुंबईत तळ ठोकला आहे. माजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर यांच्यापैकी कोणाला कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागली आहे. राज्याच्या राजकारणात सांगली जिल्हा हा नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात दिवंगत नेते पतंगराव कदम, आर आर पाटील यांच्यासह शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना प्रमुख पदे मिळाली. तुलनेत भाजप सरकारच्या काळात जिल्ह्यातील नेत्यांना मोठी पदे मिळाली नाहीत.
महायुतीचे 236 आमदार आहेत. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात मंत्रिपदाचे वाटप होईल. भाजपला 21, शिंदे गटाला 10 ते 12 आणि अजितदादा गटाला 8 ते 10 मंत्रिपदे मिळतील. त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सत्ताधारी आमदारांचे डोळे लागले आहेत. त्यातच भाजप आणि एकनाथ शिंदें यांनी यंदा मंत्रिपदं देताना कठोर निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदाची जबाबदारी देताना आमदारांची सेवा ज्येष्ठताही विचारात घेतली जाईल. याशिवाय जेष्ठांची संख्या कमी करुन तरुणांना संधी मिळू शकते. मंत्रिपद देताना जातीय समीकरणे महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. सर्वधर्म समभाव याकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील आमदारांचे वर्चस्व आणि पक्षवाढीसाठी त्यांच्याकडून मिळणारे योगदान याबाबतचा विचारही केला जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारीही संबंधित मंत्र्यावर राहिल.
आमदार सुरेश खाडे हे मिरज या आरक्षित मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. गत विधानसभेत कामगार मंत्री राहिलेले सुरेश खाडे हे पुन्हा मंत्री होतील व त्यांना चांगले पद मिळेल अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. आत्तापर्यंत दोनवेळा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात संपर्क वाढलेला आहे. दुसर्या बाजूला आमदार सुधीर गाडगीळ हे तिसर्यांदा आमदारपदी विराजमान होवून हॅटट्रिक केली आहे. भाजपच्या वरिष्ट नेत्यांच्या मर्जीतील आमदार म्हणून गाडगीळ यांची ओळख आहे. स्वच्छ आणि पारदर्शी चेहरा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशीही त्यांचा घरोबा आहे. मागील विधानसभा कालावधी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली नाही. आता त्यांचा समावेश नक्की होईल, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्याकडून केला जात आहे.
आमदार गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेवर आमदार असताना आता विधानसभेत जनतेतून मोठ्या मताधिक्याने निवडून गेले आहेत. धनगर समाजातील ते प्रमुख नेते मानले जातात त्याशिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. तरुण आमदार आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. त्यामुळे त्यांनाही प्रमुख मंत्री पदाची संधी मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यातून चर्चा आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटातून खानापूरमधून सुहास बाबर हे आमदार झाले आहेत. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा वारसा ते चालवत आहेत. पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. थेट जनसंपर्क आणि दर्जेदार कामे करुन घेण्यात हातखंडा आहे. दिवंगत नेते अनिल बाबर यांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र त्यांचे जानेवारी 2024 निधन झाले. बाबर यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जिल्ह्यातील आठ आमदारांमध्ये सुहास हे सर्वाधिक 78 हजाराच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे तरुण आमदार असलेले सुहास यांना शिवसेनेच्या कोट्यातून सुहास यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.
चौकट….
निकषांचा परिक्षेत आमदारांचा कस
महायुतीचे तब्बल 236 आमदार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे. मंत्रिपदाची जबाबदारी देताना आमदारांची सेवा ज्येष्ठताही विचारात घेतली जाईल. याशिवाय जेष्ठांची संख्या कमी करुन तरुणांना संधी मिळू शकते. मंत्रिपद देताना जातीय समीकरणे महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. सर्वधर्म समभाव याकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यातील आमदाराचे वर्चस्व आणि पक्षवाढीसाठी त्यांच्याकडून मिळणारे योगदान याबाबतचा विचारही मंत्रिपदासाठी केला जाणार असल्याची चर्चा आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.