rajkiyalive

sangli news : सांगली-हरिपूर रस्ता कामाची मुदत वर्षाची, दीड वर्षे झाले तरी काम अपूर्णच..

sangli news : सांगली-हरिपूर रस्ता कामाची मुदत वर्षाची, दीड वर्षे झाले तरी काम अपूर्णच.. : सांगली-हरिपूर रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याची मुदत एक वर्षे होती, वर्ष झाले मुदत संपली. ठेकेदारावर मेहरबानी दाखवत पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली, ती मुदत देखील संपली. तरी अद्याप 40-45 टक्के काम बाकी आहे. सध्या हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. दीड वर्षात सुमारे शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. त्यापैकी 30 हून अधिक अपघात गंभीर आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

sangli news : सांगली-हरिपूर रस्ता कामाची मुदत वर्षाची, दीड वर्षे झाले तरी काम अपूर्णच..

शंभरहून अधिक अपघात, तीन जण गंभीर: याला जबाबदार कोण?

सांगली जिल्ह्यातील एक प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून हरिपुरची ओळख आहे. कृष्णा-वारणा संगम, बागेतील गणपती मंदिर, संगमेश्वर मंदिर आणि हळदीचे पेव म्हणून या गावाची ओळख आहे. त्यामुळे हरिपुरला भाविकांची संख्या मोठी असते. शिवाय हरिपूर-कोथळी रस्त्यासाठी नदीवर बांधलेल्या पुलामुळे सांगली-हरिपूर रस्त्यावर गर्दी वाढली आहे. सांगली-हरिपूर रस्ता काँक्रीटीकरण करण्याचे काम 2023 मध्ये मंजूर झाली. त्यावेळी अनेकांनी हा रस्ता काँक्रीटीकरण करण्यापेक्षा डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. मात्र 12 कोटी खर्चून दोन किलोमिटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करत ठेकेदाराला ऑक्टोबर 2023 मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली. एक वर्षात म्हणजे ऑक्टोबर 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याची अट ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने घातली होती.

मात्र ठेकेदाराने प्रत्यक्षात फेबु्रवारी 2024 मध्ये कामाला सुरूवात केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला इतिहासाचे साक्षीदार असलेले वृक्ष आहेत. वृक्षांची तोड न करता काम करण्याची मागणी झाली होती. पण काही वृक्षांची कुर्‍हाड पडणार होती. काम सुरू करण्यापूर्वी या वृक्षांचा सर्वे करून वृक्ष तोडावेत व नंतर कामाला सुरूवात करावी, अशी अट ठेकेदाराला घातली होती. मात्र त्यांच्याकडून तसे झालेले नाही. कामाला सुरूवात झाली, अनेक अडथळे आले. त्यामुळे वर्ष झाले तरी काम पूर्ण झाले नाही. मुदत संपल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ दिली. ही मुदत देखील एप्रिल 2025 मध्ये संपली आहे. तरी देखील 40 ते 45 टक्के काम अपूर्ण आहे.

झालेल्या कामाची गुणवत्ता तपासली गेली नाही. काँक्रीटीकरणाचे काम करताना दोन्ही बाजुला गटारी करणे आवश्यक होते. पण गटारी मंजूर झाल्या नाहीत. तर दुसरीकडे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज किमान एक-दोन अपघातांना निमंत्रण देणारा हा रस्ता आहे. रस्ता अरूंद आणि एकाच बाजूने सुरू असल्याने अन्य वाहनचालक, पादचारी, सायकलस्वारांची तारांबळ उडते. तयार झालेल्या रस्त्याची उंची वाढल्याने बाजूला खोल चरी आहेत. त्यामुळे दुचाकी किंवा सायकल रस्त्यावरून खाली चरीत पडते. गेल्या दीड वर्षात सुमारे शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. त्यातील 30 हून अधिक अपघात गंभीर आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल आता हरिपूरकर उपस्थित करत आहेत.

पावसाळा आता सुरू होत आहे. शिवाय श्रावण महिन्यात हरिपूर येथील संगमेश्वर देवाची यात्रा असते. त्यासाठी हरिपुरला भक्तांची गर्दी होते. मात्र या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले नाही तर आणखी अपघात वाढतील, याला जबाबदार कोण असणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

sangli-news-the-deadline-for-the-sangli-haripur-road-work-is-one-year-even-after-one-and-a-half-years-the-work-is-still-incomplete

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका: शिवाजी मोहिते

सांगली-हरिपूर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू होऊन दीड वर्ष झाले तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. ठेकेदाराला एक वर्षात काम पूर्ण करण्याची अट घातली होती. वर्ष झाले, काम झाले नाही म्हणून सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. तरी देखील काम पूर्ण झाले नाही. रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. याला जबाबदार ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकारी आहेत. त्यामुळे ठेकेदाराला प्रथम काळ्या यादीत टाकावे व श्रावण महिन्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे युवा नेते शिवाजी मोहिते यांनी दिला.

जूनमध्ये काम पूर्ण होईल: क्रांतीकुमार मिरजकर

हरिपूर-सांगली रस्त्याचे काम जून महिन्यात पूर्ण होईल. हे काम बाधीत वृक्षांची तोड करण्यास विलंब झाल्यामुळे अपूर्ण राहिले आहे. वृक्षतोडीस परवानगी मिळाली आहे. दोन दिवसात वृक्षांची तोड करून त्याचा लिलाव केला जाणार आहे. त्यानंतर या रस्त्याच्या कामास गती येईल. काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज