jayant patil news : जयंत पाटलांना घेरण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्यात : जिल्ह्याच्या राजकारणात वाळवा तालुक्याला पूर्वीपासून अधिक महत्व आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकवेळ वाळवा तालुका ‘किंगमेकर’ बनला आहे. राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना (शिंदे गट) व उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्याला मिळाले आहे. एकंदरीत जयंत पाटील यांना घेरण्यासाठी जणू काही सर्वच राजकीय पक्षांनी एकाच तालुक्यात जिल्हाध्यक्षपद दिले आहे.
jayant patil news : जयंत पाटलांना घेरण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्यात
जिल्ह्याच्या राजकारणात स्व. वसंतदादा पाटील व स्व. राजारामबापू पाटील यांचा संघर्ष सवार्ंना ज्ञात आहे. त्यामुळे जिल्ह्यात सांगली विरूध्द वाळवा अशी थेट लढत प्रत्येक निवडणुकीत असत. दादा-बापू नंतर आ. जयंत पाटील व दादा घराणे यांच्यातील संघर्ष देखील कायम राहिला. त्यामुळे वाळव्याचे नाव संपूर्ण जिल्ह्यात गाजले. आ. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळवले. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आले. त्यामुळे राज्यात त्यांच्या नावाचा व तालुक्याचा दबदबा वाढला. राज्यातील राजकारणात गेल्या दोन वर्षात मोठ्या घडामोडी घडल्या. अशामध्ये वाळवा तालुक्यात पाच जिल्हाध्यक्षपदे मिळाली. वास्तविक हे पाचही पक्ष राज्यातील मोठे पक्ष आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून इस्लामपूरचे आनंदराव पवार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शिवसेना पक्षात फूट पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची सूत्रे हातात घेतली, त्यांच्याबरोबर आनंदराव पवार यांनी जाण्याचा निर्णय घेतला. ते सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते मूळचे इस्लामपूरचे आहेत. तर दुसरीकडे शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुखपद वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावचे अभिजीत पाटील सांभाळत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली असताना ते जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढविण्याची प्रयत्न करत आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची स्थापना झाली. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आपले पुतणे देवराज पाटील यांच्याकडे सोपवली. देवराज पाटील यांचे मुळचे गाव कासेगाव आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपद देखील इस्लामपुरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील-भोसले यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निशिकांत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. चार माजी आमदारांना त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रवाहात आणले आहे. तर आ. जयंत पाटील यांच्याशी ते दोन हात करतात. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गळ्यात टाकली.
तर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्षपद देखील वाळवा तालुक्याला मिळाले आहे. येलूर येथील युवा नेतृत्व सम्राट महाडिक यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद मिळाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून दहा वर्षे काम करताना त्यांनी आपली ताकद वाढवली होती. नुकत्याच झालेल्या शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ते किंगमेकर ठरले होते. भाजपचे आ. सत्यजीत देशमुख यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे पक्षाने माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांना डावलून भाजपने जिल्हाध्यक्षपद महाडिक यांना दिले.
jayant-patil-news-all-district-presidents-in-walwa-taluka-to-surround-jayant-patil
राज्यातील महत्वाच्या पाच पक्षांची जिल्हाध्यक्षपदे ही वाळवा तालुक्याला मिळाली आहेत. केवळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद हे जत तालुक्याला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांमध्ये जिल्हाध्यक्षांची भूमीका महत्वाची असते. प्रत्येक उमेदवार ठरविताना व त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देणे हे जिल्हाध्यक्षांचे काम असते. पाच पक्षाची जिल्हाध्यक्षपदे आता वाळवा तालुक्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीत वाळवा तालुका किंगमेकर असणार आहे.
आ. जयंत पाटलांना घेरण्याचा डाव…
राज्याच्या राजकारणात आ. जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा डाव अनेक पक्षांकडून झाला. आता त्यांच्याच जिल्ह्यात त्यांची कोंडी सत्ताधारी महायुतीतील पक्षांकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद निशिकांत पाटील यांना देण्यात आले. ते आ. जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. तर दुसरीकडे महाडिक कुटुंब व आ. जयंत पाटील यांच्यात संघर्ष आहे. त्यामुळे सम्राट महाडिक यांना जिल्हाध्यक्षपद देत भाजपने ताकद दिली आहे. आनंदराव पवार हे पूर्वीपासून आ. जयंत पाटील विरोधक आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांना शिवसेना जिल्हाप्रमुखपदी कायम ठेवले आहे. त्यामुळे महायुतीतील पक्षाकडून आ. जयंत पाटील यांना घेरण्याचा डाव आखला जातो की काय? अशी चर्चा सुरू आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











