dineshkumar aitwade
samdoli news : निष्ठेचा प्रवाह – वैभव पाटील: गावं बदलतात, माणसं बदलतात, काळ बदलतो पण काही प्रवाह असे असतात की ते कधी आटत नाहीत. त्यांची गती, त्यांचा सूर आणि त्यांचा आत्मा कायम एकसारखाच असतो. समडोळी या छोट्या खेड्यात गेल्या दोन दशकांपासून वाहत असलेला एक असा प्रवाह म्हणजे – वैभव पाटील. आज वैभव पाटील यांचा वाढदिवस..त्यानिमित्ताने
samdoli news : निष्ठेचा प्रवाह – वैभव पाटील
राजकारणात सत्ता येते-जाते. कालचक्र फिरतं, नवे चेहरे उजळतात, जुने विस्मृतीत जातात. पण निष्ठा? ती मात्र फार थोड्यांच्या आयुष्यात असते. आमदार जयंत पाटील यांच्याप्रती असलेली अढळ निष्ठा, तीच निष्ठा वैभव पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. दोन दशकं झाली, सत्तेच्या उंच शिडीवर असताना आणि पूर्ण एकाकीपणाच्या क्षणातही, त्यांनी निष्ठेचा हा झेंडा तसूभरही वाकू दिला नाही.
त्यांचा प्रवास ग्रामपंचायतीत अपक्ष सरपंच म्हणून सुरू झाला. हा प्रवास केवळ सत्तेचा नव्हता; हा होता गावाच्या हृदयात स्थान मिळवण्याचा प्रवास. बाजार समितीच्या सभापतीपदी पोहोचले तरी ते सभापती वैभव पाटील म्हणून कमी आणि आपला वैभव म्हणूनच जास्त ओळखले गेले.

गावात कुठे तंटा झाला, शेतात वाद झाला, घरात संकट आलं-की लोक एकाच दार ठोठावतात. कारण त्या दारामागे बसलेला माणूस ऐकून घेतो, हसतो, रागावतो, पण सोडवतो मात्र नक्कीच. तोंडावर जे असेल ते बोलतो, पण मनापासून सोबत उभा राहतो.
त्यांच्या आयुष्यातील समडोळी गावाची पाणीपुरवठा योजना ही जणू निष्ठेच्या प्रवाहाला लाभलेली जीवनदायी धारच होती. गावाला तहान लागू नये म्हणून त्यांनी मंत्रालयाच्या असंख्य पायर्या झिजवल्या. इतर गावे ग्रामस्थांकडून पैसे गोळा करत असताना, समडोळीकरांना मात्र पैशाचा भार न देता विनामूल्य पाईपलाईन मिळवून दिली. आज केवळ आठशे रुपयांत वर्षभर अखंडित पाणी मिळणे हे त्यांच्या कार्याचे सर्वात मोठे स्मारक आहे.
वसुंधरा अभियानातील पंचाहत्तर लाखांचे बक्षीस असो किंवा ग्रामविकासाच्या असंख्य छोट्या मोठ्या कामांचा माग, फक्त माझ्या गावाला माझं सर्वस्व ही त्यांची भावना. यश त्यांच्या पावलांपाशी अलगद येऊन टेकलं आणि अपयश त्यांच्या पायांना बिलगून अश्रूंनी न्हालं. पण त्यांनी ना यशाचा गर्व केला, ना पराभवाची खंत मनाला लागून घेतली. एक विलक्षण शांतता, एक अढळ निश्चय आणि गावाच्या विकासासाठी झपाटलेली वृत्ती त्यांच्या मनात घर करून होती.
सरपंचपदाची धुरा सांभाळताना त्यांनी गावासाठी रात्रंदिवस झटणं हाच धर्म मानला. मात्र काळाच्या लेखी प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते, आणि दुसर्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अनेकांच्या पावलाखालची वाळू सरकते, आत्मविश्वास ढळतो, पण ते मात्र स्थिर राहिले – जणू पर्वताचं आत्मबळ अंगी बाणवलेलं होतं.
हा पराभव त्यांच्यासाठी एक विराम नव्हता, तर नव्या प्रवासाची सुरुवात होती. यश-अपयशाच्या पारंपरिक चौकटी मोडीत काढत त्यांनी पुढील निवडणुकीत धाडसी निर्णय घेतला – स्वतःचा सुरक्षित वॉर्ड बाजूला ठेवून दुसर्याच वॉर्डातून उभे राहिले. हे पाऊल केवळ राजकीय नाही, तर एक सामाजिक क्रांती होती. गावात आजवर कोणी असा धाडस केले नव्हते – आणि त्यांनी केलंही, पण केवळ केलं नाही तर इतिहास रचला. विक्रमी मतांनी विजय मिळवून त्यांनी सिद्ध केलं की, खर्या सेवकाचं कार्य जनतेच्या हृदयात खोल रुजतं.
पण नियतीची कसोटी अजून संपलेली नव्हती. गेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा पराभव ओढवला. हे अपयश देखील काहीसं पानावर ओघळलेल्या दवबिंदूसारखं – क्षणिक. त्यांनी तो पराभव मागे टाकला, आणि नव्या उत्साहाने कामाला लागले. जणू सूर्य पुन्हा एका नव्या प्रभातासाठी उगवला. त्यांच्या कार्याची ओळख ही केवळ पदावरून नव्हे, तर लोकांच्या मनावर उमटलेल्या ठशांवरून झाली आहे.
आजही त्यांच्या दारी माणसांची वर्दळ तशीच आहे. कधी त्यांचं अंगण ओसाड दिसलं नाही, कधी विश्वासाचा दीप विझला नाही. त्यांच्या शब्दांत माया आहे, त्यांच्या कृतीत न्याय आहे, आणि त्यांच्या नजरेत निस्वार्थ सेवाभाव.
हे सर्व त्यांच्यावर असलेल्या लोकांच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि अपार आदराचं प्रतीक आहे. ते एक नेता नाहीत, तर जनतेच्या हृदयाचा स्पंदन आहेत. त्यांची वाटचाल ही केवळ राजकारणाची नसून, ती समाजसेवेच्या उजळलेल्या वाटेवरून चालणारी एक प्रेरणादायी कहाणी आहे.
आज समडोळीकरांच्या मनात ते केवळ एक माजी सरपंच किंवा माजी सभापती नाहीत, तर एक असा प्रवाह आहेत, ज्याला गावाने आपल्या हृदयातून वाहू दिलं आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










