pune padvidhar election : प्रताप उर्फ भैय्या माने यांच्यासाठी मंत्री मुश्रीफ यांची ताकद पणाला : पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेंसकडून जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी शड्डू ठोकला आहे. निवडणुकीसाठी अद्याप वर्षभराचा कालावधी बाकी असला तरी मतदार नोंदणीची यंत्रणा गतीमान झाली आहे. जास्तीत जास्त मतदारांची नोंद कशी करता येईल ? यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी ताकद पणाला लावली आहे.
pune padvidhar election : प्रताप उर्फ भैय्या माने यांच्यासाठी मंत्री मुश्रीफ यांची ताकद पणाला
त्याचाच एक भाग म्हणून गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या माध्यमातून पदवीर मतदार नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या तिन्ही संस्थांमधील पदवीधर असलेल्या कर्मचार्यांबरोबरच त्यांच्या संपर्कातील मित्र व नातेवाईकांमधून मतदार नोंदणी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रताप उर्फ भैय्या माने यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाच जिल्ह्यात गतीमान पद्धतीने मतदार नोंदणी सुरू आहे. मंत्री मुश्रीफ यांनी त्याची धुरा गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह अन्य जबाबदार कार्यकर्त्यांकडे सोपवली आहे. ज्यांची मतदार नोंदणी सर्वाधिक त्यांचा उमेदवारीवर अप्रत्यक्षरित्या हक्क असतो. त्यामुळे जास्तीत जास्त नोंदणीवर भर दिला जात आहे.
अरुण लाड हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्यामुळे ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीलाच मिळावी अशी मागणी अजित पवार गटाकडून म्हणजेच मंत्री मुश्रीफ यांच्याकडून होत आहे. पण भाजपने त्यांचे चिरंजीव शरद लाड यांना आपल्या तंबूत घेऊन उमेदवारी देण्याचा शब्द दिला असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत आहेत.
जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या 191 शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक समाजघटक या बँकेशी जोडला गेला आहे. विकास संस्था, दूध संस्थांबरोबरच अनेक सहकारी संस्था या बँकेशी संलग्नित आहेत. बहुसंख्य माध्यमिक शिक्षकांचे पगार हे जिल्हा बँकेतूनच होतात. तसेच शेतकर्यांचे ऊस बिल आणि महिला बचत गटांच्या व्यवहाराच्या माध्यमातून दररोज शेकडो सभासद बँकेतच्या प्रत्येक शाखेत येतात.
यामधील सुमारे 50 टक्क्यांहून अधिक सभासद हे पदवीधर असतात. त्यामुळे बँकेच्या सर्व शाखांमध्ये पदवीधर मतदार नोंदणीची जबाबदारी तेथील शाखा व्यवस्थापकाकडे दिली असल्याचे समजते. त्यांच्या मदतीसाठी एक लिपीकही दिला आहे. मतदार नोंदणीसाठी संबंधित सभासदांकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन बँकेच्या कार्यालयीन वेळेनंतर मतदार नोंदणीची मोहिम राबविली जात आहे.
गोकुळसह बाजार समितीमधूनही मतदार नोंदणीची मोहिम
गोकुळ दूध संघाचे जाळे जिल्हाभर आहे. गाव तेथे दूध संस्था असल्यामुळे संघातील कर्मचार्यांचा तळागाळापर्यंत संपर्क आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक असो अथवा विधानसभा, लोकसभेची. ज्यांचे गोकुळवर वर्चस्व आहे, त्यांच्याच बाजूने या निवडणुकांमध्ये पारडे झुकलेले असते. पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक देखील याला अपवाद ठरलेली नाही. कारण गोकुळच्या कर्मचार्यांकडूनही मतदार नोंदणीचे काम वेगवान पद्धतीने सुरु आहे.
बाजार समितीमधील कर्मचारी देखील या मोहिमेत ताकदीने सहभागी झाले आहेत. त्यामुळे पदवीधरच्या निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षाहून अधिक काळ बाकी असला तरी राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे.
शिक्षक मतदारसंघातूनही होणार काटाजोड लढत
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकाच वेळी होणार आहे.त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांकडूनही मतदार नोंदणी सुरु आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे त्यांनी गेल्या काही महिन्यापासूनच मतदार नोंदणी सुरु केली आहे.
तर विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे यांना भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार असली तरी चुरशीचा सामना हा आमदार आसगावकर आणि गावडे यांच्यामध्येच पहावयास मिळण्याची शक्यता आहे. गतनिवडणूकीत शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काटाजोड लढत झाली होती. दोन्ही आघाडीतील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रचारासह, एक-एक मत मिळवण्यासाठी मोठी चुरस पहावयास मिळाली होती.
’शिक्षक’मधून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर व भाजपचे जितेंद्र पवार यांच्यामध्येच प्रमुख सामना होईल असे प्राथमिक चित्र होते. पण मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर माजी आमदार अपक्ष उमेदवार दत्तात्रय सामंत व प्रा. आसगावकर यांच्यामध्येच चुरस पहावयास मिळाली. पवार सुरुवातीपासूनच तिसर्या क्रमांकावर राहिले. तर आसगावकर हे आघाडीवर राहिले.
सामंत यांना महाविकास आघाडी व महायुतीच्या घटक पक्षातील आजी, माजी आमदार व प्रमुख नेत्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत केल्यामुळेच त्यांना दुसर्या क्रमांकाची मते मिळाली होती. तसेच सामंत यांनी आमदारकीच्या माध्यमातून शिक्षकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना मतपेटीतून मिळाली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











