shalinitai patil news : बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन

SHARE:

shalinitai patil news : बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन : महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री, माजी खासदार डॉ. शालिनीताई पाटील यांचे शनिवारी दुपारी 3 वाजून 48 मिनिटांनी माहीम मुंबई येथील ज्योती सदन या निवासस्थानी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे.

shalinitai patil news : बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन

सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योतिजीराव फाळके पाटील यांच्या त्या कन्या होत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत वकिलीची पदवी घेतली होती. सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. विचारस्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि निर्भीड राजकीय भूमिका यासाठी ओळखल्या जाणार्‍या डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात वेगळी छाप उमटवली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या डॉ. शालिनीताई पाटील यांनी खासदार व आमदार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. राज्याच्या महसूल मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली.

दिवंगत शालिनीताई पाटील यांनी 1985 मध्ये सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे राजकीय मार्गक्रमण केले. काही काळ त्या सातारारोड पाडळी स्टेशन या मूळगावी वास्तव्यास होत्या. चिमणगावच्या माळावर श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. या कारखान्यासाठी परवाना मिळवताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला.

1999 मध्ये त्यांनी विधानसभेचे माजी सभापती व काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव जगताप यांचा पराभव करत त्यांच्या 25 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. यानंतर त्यांनी कोरेगाव तालुक्यात स्वतःचा कारखाना गट उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी खासदार शरद पवार यांच्याशी जुळवून घेत राष्ट्रवादीतून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला.

आर्थिक निकषावर आरक्षण या विषयावर पक्षश्रेष्ठी शरद पवार यांना न जुमानता त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली. ती राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरली. त्यानंतर त्यांच्यात दरी पडली. यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांनी ‘क्रांतिसेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. यातून त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची भूमिका घेत मागासवर्गीय समाजाच्या विद्यमान आरक्षण धोरणावर आक्षेप नोंदवला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *