kasbe digraj news : सत्तेच्या माजावर घाव, विनायक जाधवांचा राजकीय स्फोट

SHARE:

kasbe digraj news : सत्तेच्या माजावर घाव, विनायक जाधवांचा राजकीय स्फोट : मिरज तालुक्यातील सर्वात चर्चेत असलेल्या कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटात यंदा सत्तेची गणिते जुळवणार्‍यांना जबर धक्का बसला. जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे प्रशांत अवधूत यांनी तब्बल 6,882 मतांनी निर्विवाद विजय मिळवला, हे मान्य. पण याच गटातील पंचायत समिती गणात घडलेले राजकारण मात्र सार्‍या अंदाजांना पुरून उरले.

kasbe digraj news : सत्तेच्या माजावर घाव, विनायक जाधवांचा राजकीय स्फोट

जिथे निकाल आधीच ठरवून टाकला होता, जिथे भाजपचा उमेदवार नामशेष अशी चर्चा होती-तिथेच विनायक जाधव नावाच्या एका जिद्दी कार्यकर्त्याने संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच आव्हान दिले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, सोसायटीचे संचालक, मोठी यंत्रणा, दोन्ही गावांत आखलेली रणनिती-सगळं काही आघाडीच्या बाजूने होते. पद्माळेत भाजपचे वातावरण असूनही तेथे सुधीर देशमुख यांनी जोरदार बांधणी केली होती. त्यामुळे विजयाचा माज सत्ताधार्‍यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. पण कसबे डिग्रजच्या मातीतच स्फोट झाला.

पूर्ण गाव विरोधात असताना, जवळपास सर्वच राजकीय दरवाजे बंद असताना, कुणाचाही वरदहस्त नसताना विनायक जाधव यांनी मैदान सोडले नाही. हा जिंकणार नाही असे शिक्के मारले गेले,
याची लढत औपचारिक आहे असे हसले गेले,
पण त्यांनी प्रत्येक टोमण्याला प्रचारात बदलले.
नियोजन समितीत केलेली कामे, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि विरोधी गटाची जबाबदारी निर्धाराने सांभाळणारा चेहरा-या भांडवलावर त्यांनी एकहाती रणशिंग फुंकले.

वातावरण शून्य, साधनसामग्री अपुरी, तरीही त्यांनी करो या मरोची लढाई लढली.
आणि अखेर-
फक्त 40 मतांनी का होईना, पण सत्ताधार्‍यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला.
समोर विशाल पाटील, जयंत पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते असतानाही, कुठलाही मोठा राजकीय चेहरा नसताना, हा विजय म्हणजे

सामान्य कार्यकर्त्याच्या ताकदीचा स्फोट होता.
दुसरीकडे, सुधीर देशमुख यांच्या पराभवामागे गावातील अंतर्गत वाद, भावकीतील भेगा आणि राष्ट्रवादीतील गटातटाचे गलिच्छ राजकारण उघड झाले.

एकंदरीत काय-
विनायक जाधव यांनी एकटे लढून किल्ला जिंकला.
हा विजय योगायोग नव्हता
तो होता अहंकाराला दिलेला चपराक आणि दुर्लक्षित शक्तीचा इशारा

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *