jayant patil news : यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढवू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास साधू ः आ. जयंत पाटील

SHARE:

jayant patil news : यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढवू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास साधू ः आ. जयंत पाटील : जिल्ह्याच्या राजकारणात तीस-चाळीस वर्षे कार्यरत असणारी जेष्ठ मंडळी आमच्यासोबत एकत्र आली. एकमेकांची मनं, एकमेकांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही एकत्रित काम करू. यापुढील सर्व निवडणुका याच पद्धतीने एकत्रित लढवू असे आ. जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

jayant patil news : यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढवू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास साधू ः आ. जयंत पाटील

जिल्हा परिषद सभापती निवडीनिमित्त एकत्रित आलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार राष्ट्रवादी, काँग्रेस व दोन्ही शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाटील बोलत होते. यावेळी आ. डॉ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, आ. रोहित पाटील यांच्यासह नेते उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी आमची सदस्य संख्या 34 होती. मात्र या निवडी वेळी कराड मुक्कामापर्यंत आमच्या सोबत असणारे व नंतर आम्हाला सोडून गेलेले विनायक मासाळ हे पुन्हा आमच्यासोबत आलेले आहेत. याशिवाय शिवसेनेचे गटनेते जयदीप भोसले व पृथ्वीराज पाटील हे दोन सदस्य ही आमच्या सोबत आलेले आहेत. त्यामुळे सभापती निवडीसाठी आमची एकूण सदस्य संख्या 37 पोहोचलेली आहे.

जिल्हा परिषदेला मोठा इतिहास आहे. अनेक मोठमोठे नेते या ठिकाणी घडले. या जिल्हा परिषदेच्या सभागृहात कधीही हातघाईचा प्रसंग आला नाही, तीच परंपरा यापुढेही चालू राहील. जिल्ह्याच्या राजकारणात तीस चाळीस वर्षे कार्यरत असणारी मंडळी आमच्या सोबत एकत्र आली आहे. एकमेकांची मनं, एकमेकांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे. ज्येष्ठ नेते समजूतदारपणाने जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही काही एकत्रित काम करु, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

शाळेची गुणवत्ता, शेती, पशुपक्षी विकासावर लक्ष

आ. जयंत पाटील म्हणाले, मी पालकमंत्री असताना मॉडेल स्कूल योजना आणली. जिल्ह्यातील 525 शाळा मॉडेल केल्या. आता उर्वरित शाळा मॉडेल स्कूल करु. तसेच सर्व शाळांमधील गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सर्व शिक्षकांना सोबत घेऊन काम करू, त्यासाठी एक प्लॅन तयार असून शिक्षकांना विश्वासात घेऊन तो राबवला जाईल. स्मार्ट पीएचसी हा आमचाच उपक्रम असून त्याव्दारे आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करु. शेती फलोत्पादन विहिरी अशा योजना अधिक ताकतीने राबवण्याचा प्रयत्न करू. शेती, पशुपक्षी हे एक नवे क्षेत्र निर्माण होत आहे, यामध्ये अधिक लक्ष देऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या क्षेत्रात त तरुण शेतकर्‍यांना चालना दिली जाईल.

पदाधिकारी-अधिकारी यांच्या समन्वयाने काम करु ः नाईक

माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, आम्ही एकत्रित येऊन चांगले यश मिळवले. या सभापती निवडीमध्ये विरोधकांनीही मोठे मन दाखवत अर्ज न भरता एक प्रकारे आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. अधिकारी-पदाधिकारी यांच्या समन्वयातून काम केले जाईल. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडील योजना व निधी कुठेही कमी पडणार नाही, याचा विश्वास आहे.

यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आ. मानसिंगराव नाईक, माजी आ. विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, मनोज शिंदे, बाबासाहेब मुळीक, महिंद्र लाड, शिवसेनेचे तानाजी पाटील, जयदीप भोसले, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, जि. प. अध्यक्षा संगिता पाटील, उपाध्यक्ष ॠषीकेश लाड उपस्थित होते.

तो पिक्चरच संपवून टाकला ः आ. विश्वजीत कदम

सभापती निवडीपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिक्चर अभी बाकी है असे म्हटले होते, याबाबत आ. विश्वजीत कदम यांना विचारले असता ते म्हणाले, आता कशाचा पिक्चर सर्व सभापती बिनविरोध निवडून आले, तो पिक्चरच आम्ही संपवून टाकला, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांनी राजकारणात आयुष्यातील अनेक वर्षे घालवली, अशी मंडळी आमच्यासोबत आहेत. त्याचा नक्कीच जिल्ह्याच्या विकासासाठी उपयोग करून घेऊ. जिल्हा परिषदेमधील सभापती निवडी बिनविरोध झाली, हा जिल्ह्यातील पुरोगामी जनतेचा विजय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *