sangli news : मनपात भाजप चार तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांना संधी मिळणार : महापालिकेच्या आठ स्वीकृत सदस्य निवडीसाठी महापालिकेची दि. 17 रोजी महासभा होत आहे. या सभेत भाजपच्या चार तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाच्या प्रत्येकी दोन सदस्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. दरम्यान, नगरसचिवांनी इच्छूक सदस्यांचे प्रस्ताव दि. 10 रोजीपर्यंत छाननीसाठी पाठवून द्यावेत, असे पत्र भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांना दिले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या इच्छुकांनी आपल्या नेत्यांजवळ फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.
sangli news : मनपात भाजप चार तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांना संधी मिळणार
महापालिकेची महासभा शुक्रवार दि. 17 रोजी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. फेबु्रवारी महिन्यात महापौर-उपमहापौर निवडी पार पडल्या होत्या. मात्र स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. एप्रिलच्या महासभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याचा एकमेव विषय अजेंठ्यावर आला आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार होणार आहेत. निवडणुकीत भाजप पक्षाला 39, काँग्रेस पक्षाला 18, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाला 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 3 तर शिवसेना (शिंदे) पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या.
संख्याबळानुसार भाजपचे चार तर काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाचे दोन सदस्य ‘स्वीकृत’ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आठ जागांसाठी इच्छूक असलेल्यांची नावांची छाननी व पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे प्रतिज्ञापत्रकासह शुक्रवार दि. 10 रोजपर्यंत सादर करण्याबाबतचे पत्र नगरसचिवांनी भाजपचे गटनेते संदीप आवटी, काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँगे्रेस (अजितदादा) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांना दिले आहे. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता देखील दिली गेली आहे.
यात वैद्यकीय व्यवसायिक, शिक्षण क्षेत्रात काम केलेले निवृत्त प्राध्यापक, मुख्याध्यापक, व्याख्याता, सनदी लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधारक, अभिवक्ता, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, मनपाचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अशासकीय संघटनेचे पदाधिकारी यांचा समावेश होऊ शकतो. मात्र त्यांना किमान पाच वर्षे संबंधित क्षेत्रात काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार असल्याने इच्छूकांनी आता फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.
‘स्वीकृत’च्या जागा आठ पण इच्छूक वीसहून अधिक…
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपकडून शेखर इनामदार, केदार खाडीलकर, मनोज सरगर, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतकेर, शीतल लोंढे, राहुल बोळाज, काँग्रेसकडून अमित शहा, प्रताप चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, विशाल कलगुटगी, तौफिक शिकलगार, चंद्रकांत हुलवान तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाकडून सचिन सावंत, जयंत जाधव, आयशा नायकवडी, राधीका हारगे, जावीद मोमीन, सतीश कांबळे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. आठ जागांसाठी वीसहून अधिक इच्छूक आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











