crime news : टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले; तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू : तारेच्या कुंपणास इलेक्ट्रिक सप्लाय दिल्याने शॉक लागून भागोजी सदू जाधव (वय 64, रा. खानापूर, ता. आजरा) या शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. टेम्पोतून उतरताना बैल उधळल्याने त्याला पकडण्यासाठी गेले असताना आंबेशेत नावाच्या शेतात ही घटना घडली आहे. मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे पोलिसांनी सुषमा सुभाष राणे व जितेंद्र सुभाष राणे ( दोघेही रा. खानापूर ) या मायलेकरावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
crime news : टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले; तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: भागोजी जाधव यांना शर्यतीचा बैल पाळण्याचा छंद होता. काल त्यांनी बैल खरेदी केला व आज सकाळी 6.30 वाजता गावात टेम्पोतून बैल उतरत असताना बैल टेम्पोतूनच उधळला. बैलाला पकडण्यासाठी भागोजी जाधव, टेम्पो चालक संभाजी तेजम, ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय डांगरे व मुलगा दिगंबर जाधव हे पाठोपाठ गेले. शेताच्या घरातील इलेक्ट्रिक सप्लाय सुषमा व जितेंद्र राणे यांनी तारेच्या कुंपणास दिला होता. भागोजी जाधव यांचा तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागून ते जागीच मृत झाले.

पाठोपाठ आलेले मुलगा दिगंबर जाधव, टेंपो चालक संभाजी तेजम, ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय डांगरे यांनी भागोजी जाधव यांना लाकडी काठी व दोरीच्या साह्याने बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली होती. भागोजी जाधव यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.
मायलेकरांना घेतले ताब्यात
तारेच्या कुंपणाला घरातील इलेक्ट्रिक सप्लायमुळे कोणाचा तरी मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही सुषमा व जितेंद्र राणे यांनी बेजबाबदारपणे तारेच्या कुंपणाला इलेक्ट्रिक सप्लाय दिला होता अशी फिर्याद दिगंबर जाधव यांनी दिल्याने पोलिसांनी सुषमा राणे व जितेंद्र राणे यांचेवर गुन्हा दाखल करून सायंकाळी ताब्यात घेतले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.









