jayant patil news : महाराष्ट्रातील एका देवाच्या इच्छेसाठी शक्तीपीठचा अट्टाहास : आ. जयंत पाटील

SHARE:

jayant patil news : महाराष्ट्रातील एका देवाच्या इच्छेसाठी शक्तीपीठचा अट्टाहास : आ. जयंत पाटील : कोणताही देव आपल्या भक्तांना जमिनी द्या आणि माझ्याकडे या असं सांगत नाही. मग हा निर्णय कोणाच्या हितासाठी? महाराष्ट्रातील एका देवाच्या इच्छेसाठी सामान्य जनतेच्या भावना डावलल्या जात आहेत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केली आहे. आम्ही विनंती करत आहोत, मात्र आमची परंपरा क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांची आहे असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

jayant patil news : महाराष्ट्रातील एका देवाच्या इच्छेसाठी शक्तीपीठचा अट्टाहास : आ. जयंत पाटील

क्रांतिकारी वाळवा तालुक्यातील जनतेचा शक्तिपीठ महामार्गास तीव्र विरोध असून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही,असा निर्धार उरुण ईश्वरपूर येथे सर्व पक्षीय मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा.राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते रघुनाथदादा पाटील, माजी आ.मानसिंग नाईक, जेष्ठ सामाजिक नेते डॉ.भारत पाटणकर,उरुण ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यासह शेकडो शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाले होते. कॉ.धनाजी गुरव, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जी.पाटील, तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी वाळवा तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी जमीन बचाव समिती च्या माध्यमातून येथील राजारामबापू नाट्य गृहात या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी शिव शपथ घेण्यात आली.

आ.पाटील म्हणाले,12 जिल्हे 370 गावे,27 हजार 500 एकर जमीन आणि 1 लाख कोटी रुपये खर्चून सरकार हा अनावश्यक महामार्ग करीत आहे. महागाई,पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढी सारख्या समस्याकडे दुर्लक्ष करून कोणाचीही मागणी नसताना सरकारचा शक्तीपीठचा अट्टाहास का? ज्या शक्तीस्थळाना जोडण्यासाठी हा महा मार्ग केला जात आहे,त्या देवांना आता राज्यातील जनता जातच आहे.

सरकारने गावातील पाणंद रस्ते,गावांना जोडणारे रस्ते अधिक चांगले करण्या वर भर दयायला हवा. या महामार्गात तालुक्या तील 11 गावातील 900 एकर जमीन जाणार असून या महामार्गाने तालुका,तसेच अनेक गावे दुभंगणार आहेत. तसेच स्वतःच्या हिमतीवर पिकावू केलेली शेती अडचणीत येणार आहे. आपणा सर्वांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून ताकदीने लढा देवू.

राजू शेट्टी म्हणाले, सध्या नागपूर-रत्नागिरी हा समांतर महामार्ग असताना या महामार्गाची गरजच काय? सरकार राज्यातील जनतेवर एक लाख कोटींचा महामार्ग लादत आहे. यातून 50-60 कोटींचा ढपला मारला जाणार आहे. हा रस्ता अडगळीतून जात असल्याने भरपूर पैसे मिळतील हे डोक्यातून काढून टाका. या रस्त्याचा स्थानिक लोकांना फारसा वापर करता येणार नाही, व्यापार-व्यवसाय करता येणार नाहीत. आम्ही कोल्हापूर जिल्ह्याने विरोध केल्याने हा रस्ता तुमच्याकडे आला आहे. जेंव्हा मोजणीला माणसं येथील तेंव्हा खोरं,टिकावं हातात घेऊन शेतात उभा रहावा.

डॉ.भारत पाटणकर म्हणाले,केंद्र सरकारने 2007 साली कोणताही प्रकल्प उभा करताना स्थानिक लोकांची मंजुरी महत्वाची आल्याचा कायदा केला आहे. या कायद्याच्या आधारेही लढा देऊ. आपण वाळवा तालुक्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाखाचा मोर्चा काढून जिल्हा धिकार्‍यांना मुंबईशी चर्चा घडवून आणण्यास सांगू. तसेच मोजणीसह कोणत्याही कामास माणसं आली तर त्यांना गावात फिरकू देवू नका.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, केवळ जमिनी पुरता विचार करु नका. राष्ट्रीय संपत्तीचा मोठ्या प्रमाणात र्‍हास केला जात आहे. विकासाच्या नावाखाली लाखो झाडे तोडली जात आहेत. नवे रस्ते म्हणजे पैसे खाण्याचा उद्योग आहे. महागाई आणि शेती मालास भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

कॉ.धनाजी गुरव म्हणाले,वाळवा तालुक्या तील कोणत्याही संघटनेचा,पक्षाचा शक्तिपीठला पाठिंबा नाही. सर्वजण लढ्यात सहभागी आहेत. हा लढा शांततेच्या मार्गाने पुढे नेण्यासाठी समिती स्थापन करावी लागेल. त्यासाठी प्रत्येक गावाने एक प्रतिनिधी द्यावा,गावा-गावातील ग्राम पंचायत, तसेच मंडळांनी शक्तिपीठ विरोधी ठराव करावेत.

मानसिंगभाऊ नाईक म्हणाले,या रस्त्याने जनतेचे काय भले होणार हे त्यांनी सांगावे. आनंदराव मलगुंडे म्हणाले,आम्ही या रस्त्याच्या विरोधी ठराव करीत आहोत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,महिला जिल्हाध्य क्षा सुस्मिता जाधव,भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.सचिन पाटील, दलित महासंघांचे नेते शंकरराव महापुरे,आरपी आयचे सचिन जाधव,आपचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील,प्रहारचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, ऐतवडे खुर्दच्या माजी सरपंच डॉ.जोत्स्ना पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

आ.जयंतराव पाटील यांच्या स्वप्नातील देव

आ.पाटील म्हणाले,शेट्टी साहेब,रात्री माझ्या स्वप्नांत देव आला होता. त्यांनी सांगितले,आम्ही जमीन मागितलेली नाही. भक्तांची जमीन गेलेली आम्हाला कसे चालेल? मात्र महाराष्ट्रातील फक्त एका देवाला जमीन हवी आहे, यावर एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले,आम्ही मागणी करतो, त्यांनी आम्हाला मुंबईला वेळ देऊन हा रस्ता रद्द करावा.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *