sangli 12th result : सांगलीत टक्का घसरला, बारावीचा निकाल 86.10 टक्के

SHARE:

sangli 12th result : सांगलीत टक्का घसरला, बारावीचा निकाल 86.10 टक्के : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबु्रवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. यंदा कोल्हापूर विभागा त कॉपीमुक्त अभियानांतर्गंत राबविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकालावर परिणाम झाला असून टक्का घसरला.

sangli 12th result : सांगलीत टक्का घसरला, बारावीचा निकाल 86.10 टक्के

गतवर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी निकालात घट, उत्तीर्णामध्ये मुलींचेच प्रमाण अधिक, पलूस तालुक्याचा सर्वाधिक 93.57 टक्के निकाल

जिल्ह्याचा निकाल 86.10 टक्के लागला. उत्तीर्णामध्ये मुलींचे सर्वाधिक 93.04 टक्के तर मुलांचे प्रमाण 79.42 टक्के आहे. पलूस तालुक्याचा सर्वाधिक 93.57 टक्के तर जत तालुक्यात सर्वात कमी 68.26 टक्के निकालाची नोंद झाली. विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाईन निकाल मोबाईलवरुन पाहिला.

यंदा बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षा लवकर घेण्यात आल्याने लवकरच निकाल लागणार अशी चर्चा होती. यावेळी गतवर्षीपेक्षा आठ दिवस आधीच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षा मंडळाने शनिवारी ऑनलाईन निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

यावर्षी परीक्षांमधील कॉपीमुक्त अभियान केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आणले होते. जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर पारदर्शकता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबवण्यात आल्या. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात होते, त्यामुळे परीक्षा पारदर्शी पार पडली असली तरी त्याचा परिणाम निकालावर झाल्याचे दिसून आले.

कोल्हापूर विभागाचा निकाल 89.974 टक्के लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 91.86 टक्के लागला. सातारा जिल्हा 90.89 तर सांगलीचा 86.10 टक्के निकाल आहे. गतवर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल 93.39 टकके लागला होता, कॉपीमुक्त अभियानामुळे यंदाच्या निकालात गतवर्षीपेक्षा सात टक्क्यांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात एकूण 328 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या विद्यालयात 15 हजार 687 मुले आणि 15 हजार 119 मुलीं अशा एकूण 30 हजार 806 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील 52 परीक्षा केेंद्रांवर परीक्षा दिली. त्यापैकी 12 हजार 460 मुले आणि 14 हजार 67 मुली असे एकूण 26 हजार 527 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची टक्केवारी 79.42 टक्के तर मुलींची 93.04 टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 93.99 टक्के लागला आहे. या शाखेत 18 हजार 18 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 936 जण उत्तीर्ण झाले. 353 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 70.85 टक्के लागला आहे. या शाखेत 7 हजार 768 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 5 हजार 504 जण उत्तीर्ण झाले. 1 हजार 390 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल 80.79 टक्के लागला आहे. या शाखेत 4 हजार 57 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 278 जण उत्तीर्ण झाले.

व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 85.52 टक्के लागला आहे. या शाखेत 850 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 727 जण उत्तीर्ण झाले. आयटीआयचा 72.56 टक्के निकाल लागला असून परीक्षेला 113 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तब्बल 4 हजार 279 विद्यार्थी नापास

यंदा बारावी परीक्षेचा निकालात घट झाली. विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आयटीआय या विभागासाठी 30 हजार 806 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 26 हजार 527 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तब्बल 4 हजार 279 विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना जून-जुलैमध्ये होणारी पुर्नपरीक्षा देता येईल, असे कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
पुर्नपरीक्षार्थींचा निकाल 29.72 टक्के

बारावीच्या पुनपरीक्षार्थीच्या निकालामध्ये यंदा घट झाली. जिल्ह्यातून 858 विद्यार्थी रिपीटर होते. त्यातील 255 विद्यार्थी पास झाले. तर 550 विद्यार्थी नापास झाले. निकालाची टक्केवारी 29.72 टक्के आहे.
जिल्ह्यात पलूस तालुक्याचा सर्वाधिक निकाल

जिल्ह्यात पलूस तालुक्याचा सर्वाधिक 93.57 टक्के तर सर्वात कमी जत तालुक्याचा 68.26 टक्के निकाल लागला. आटपाडी 87.39, कडेगाव 85.86, कवठेमहांकाळ 87.95, खानापूर 91.89, मिरज 92.88, मनपा 86.19, शिराळा 81.13, तासगाव 90.44 व वाळवा तालुक्याचा 90.83 टक्के निकाल लागला.

विभागात जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर

गतवर्षी बारावीचा निकालाची टक्केवारी 93.39 होती. यंदा मात्र यंदा निकालात सात टक्क्यांनी घट झाली. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. तसेच कोल्हापूरचा पहिला आणि सातारा जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी करायची आहे. त्या विद्यार्थ्यांनी दि. 3 मे ते 17 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

तालुकानिहाय निकाल
तालुका निकाल (टक्के)
पलूस 93.57
आटपाडी 87.39
जत 68.26
कडेगाव 85.86
क.महांकाळ 87.95
खानापूर 91.89
मिरज 92.88
मनपा 86.19
शिराळा 81.13
तासगाव 90.44
वाळवा 90.83
एकूण 86.10

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *