grampanchyat news : जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत

SHARE:

जिल्ह्यातील सन 2024-25 मुदत संपलेल्या 4 आणि 2025-26 मध्ये मुदत संपलेल्या 152 अशा 156 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 12) आरक्षण सोडत काढली जाईल. त्यानंतर हरकती, सुनावणीनंतर दि. 10 जुलैला अंतिम प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. गावागावात होणार्‍या ग्रामसभेत आरक्षण सोडत निघणार असल्याने इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.

grampanchyat news : जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत

ग्रामसभेत सोडत निघणार, इच्छुकांचे देव पाण्यात

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर एप्रिल महिन्यात या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे सदस्यपदांसाठी काढण्यात येणार्‍या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्य निवडणूक आयागाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सन 2024-25 मुदत संपलेल्या 4 आणि 2025-26 मध्ये मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतसाठी आरक्षण सोडत काढली जाईल.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडेल.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 156 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये दि. 12 जूनला आरक्षण सोडत प्रक्रिया राबविली जाणार आहे. आरक्षण सोडत काढल्यानंतर दि. 19 जून ते 25 जूनअखेर यावर हरकती मागविल्या जाणार आहेत.

त्यानंतर सुनावणी होऊन प्रांताधिकारी 3 जुलैपर्यंत निर्णय घेऊन जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेसाठी पाठविले जाणार आहे. अंतिम आरक्षण व प्रभाग रचना दि. 10 जुलैला प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागवून अंतिम मतदार याद्या प्रसिध्द होणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे.

आरक्षण सोडतीचा असा कार्यक्रम
– आरक्षण सोडतीच्या ग्रामसभेची सूचना देणे – 8 जून
– ग्रामसभेत आरक्षण सोडत काढणे – 12 जून
– प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकार्‍यांची मान्यता – 17 जून
– हरकती व सूचना स्वीकारणे – 15 ते 25 जून
– आरक्षणासह जिल्हाधिकार्‍यांची अंतिम मान्यता – 8 जुलै
– अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिध्द करणे – 10 जुलै

जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायती
* मिरज- 23
* तासगाव- 39
* कवठेमहांकाळ- 11
* जत 30
* खानापूर- 15
* आटपाडी 11
* कडेगाव 09
* पलूस 14
* वाळवा 02
* शिराळा 02

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *