jat news :जत पालिकेचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात : जत नगरपरिषदेतील कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रविण रंगराव बाबर यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सांगली पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जत नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालिका स्थापन झाल्यापासून लाच लुचपतची ही पहिलीच घटना आहे.
jat news :जत पालिकेचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा फोटो स्टुडिओचा व्यवसाय असून सन 2025 मधील जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी फोटो व व्हिडिओ शूटिंगचे काम त्यांनी केले होते. या कामाचे बिल मंजूर करून त्याचा धनादेश तक्रारदारांना मिळाल्यानंतर संबंधित बिलाच्या मोबदल्यासाठी कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रविण बाबर यांनी 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी तडजोडीनंतर 50 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार बुधवारी (दि. 10) जत येथील यशोदा फोटो स्टुडिओमध्ये तक्रारदारांकडून 50 हजार रुपये स्वीकारताना प्रविण बाबर यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगलीचे पोलीस उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, सागर नायकुडे, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडणीकर, मनोज निळकंठ, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश जाधव, राजेश मुदगल, महेश शेंडगे, विना जाधव, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांनी सहभाग घेतला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










