inam dhamni news : इनाम धामणीत दुषित पाणीपुरवठा; ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामस्थ आक्रमक : मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथील पिण्याच्या पाण्याची जुनी टाकी गेल्या 5 वर्षांपासून साफ न केल्याने ग्रामस्थांना डांबरासारखे काळे व दूषित पाणी प्यावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पाण्याच्या टाकीखालील जुन्या अंगणवाडीच्या उघड्या खोलीत काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची गंभीर घटना घडली आहे.
inam dhamni news : इनाम धामणीत दुषित पाणीपुरवठा; ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामस्थ आक्रमक
याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. या सर्व गंभीर परिस्थितीविरोधात आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात इनाम धामणी येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, सांगली) आणि गट विकास अधिकारी (मिरज) यांना तीव्र इशारा निवेदन देण्यात आले.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, गावात नवीन पाण्याची टाकी पूर्ण बांधून तयार असतानाही ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. जुनी अंगणवाडी खोली उघडी आणि असुरक्षित असल्याने तिथे समाजकंटकांचा वावर वाढला असून तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच/प्रशासक पतीचा बेकायदेशीर हस्तक्षेप सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच पाण्याच्या टाकी परिसरात आणि गावात तातडीने उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जुन्या अंगणवाडीची खोली स्वच्छ करून तिला भक्कम कुलूप लावून सील करावे. नव्याने बांधलेली पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी त्वरित सुरू करावी. कर्तव्यात कसूर करणारे दोषी अधिकारी आणि सरपंच पतीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
पिण्याचे स्वच्छ पाणी आणि सुरक्षा हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. पुढील 7 दिवसांच्या आत प्रशासनाने योग्य ती पावले उचलून
मागण्या पूर्ण न केल्यास, समस्त इनाम धामणी ग्रामस्थ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसमोर तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










