jat crime news : चिमुरडीवर अत्याचार करून खून करणार्या नराधमास मरेपर्यंत फाशी : जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा ऐतिहासिक निकाल. : सांगली : जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी लोखंडी पेटीत मृतदेह ठेवणार्या नराधमास न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
jat crime news : चिमुरडीवर अत्याचार करून खून करणार्या नराधमास मरेपर्यंत फाशी : जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा ऐतिहासिक निकाल.
पांडुरंग सोमन्ना कळ्ळी (वय 45, रा. करजगी) असे आरोपीचे नाव आहे. सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. सरकारी पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी चालवलेला युक्तिवाद आणि ठोस पुरावे या खटल्यात अत्यंत निर्णायक ठरले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्या बालिकेचा खून करण्यात आला ती सध्या आजीकडे राहत होती. तिची आई काही दिवसांकरिता कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माहेरी गेली होती तर वडिल बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीस गेले होते. मुलीच्या घरापासून काही अंतरावर आरोपी पांडुरंग सोमलिंग कळ्ळी (वय 45) याचे घर होते. दि. 06 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी चिमुरडी तिच्या आठ वर्षांच्या चुलत बहिणीसोबत आरोपी पांडुरंगच्या घरासमोरील बदाम खाण्यासाठी गेली होती.
चुलत बहीण शाळेत जाण्यासाठी निघून गेल्याने बालिका एकटीच झाडाखाली राहिली. सकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावकर्यांनाही माहिती देत संपूर्ण गावभर शोधमोहीम राबविण्यात आली. आरोपी पांडुरंगला विचारले असता त्याने मला काहीच माहित नसल्याचा बनाव केला. शोध न लागल्याने उमदी पोलिसांना माहिती देण्यात आली.
तत्कालीन सहायक निरीक्षक संदीप कांबळे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मुलींबाबत पोलिस चौकशी करत असताना एका वृद्धेला विचारण्यात आले यावेळी तिने मुलगा दारू पिऊन मारत असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांना संशय आला. घराबाहेरच झाडाखाली आरोपी कळ्ळी हा झोपला होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, तो झोपेचे सोंग घेऊन उठलाच नाही. पोलिसांना संशय बळावल्याने त्याच्या घरात जाऊन तपासणी केली असता कोपर्यातील एका लोखंडी पेटित पीडित मुलीचा पोत्यात घालून मृतदेह ठेवल्याचे निदर्शनास आले.
यावेळी कळ्ळी याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनानी आंदोलन केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, तत्कालीन अपर अधीक्षक रितू खोकर, तत्कालीन उपअधीक्षक पै. सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. घुगे यांनी गावकर्यांसोबत बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले होते.
घटनेच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आ. विक्रम सावंत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून न्याय देण्याची ग्वाही दिली होती. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणीच्या महत्व लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी वेळोवेळी तपासी अधिकारी, जिल्हा सरकारी अभियोक्ता यांच्याकडून सुनावणीची स्थिती जाणून घेत मार्गदर्शन केले.
पोलिसांनी अवघ्या 13 दिवसांत दाखल केले दोषारोपपत्र….
तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सुनील साळुंखे आणि सहायक निरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या 13 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी एकूण 15 साक्षीदार तपासले. पीडितेची चुलत बहीण आणि आरोपीसोबत बालिकेला पाहणारे साक्षीदार राजकुमार रेवाप्पा मेत्री यांची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. शिक्षेच्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी 23 विविध न्यायनिवाडे सादर केले.
पीडित बालिका स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ होती आणि हा गुन्हा अत्यंत क्रूर व ’दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा आहे, हे सिद्ध करत त्यांनी फाशीची मागणी केली. न्यायालयाने सुनावणी दरम्यान पोलिसांनी सादर केलेले पुरावे, वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक रिपोर्ट, साक्षीदारांचे जबाब, युक्तिवाद यांच्या आधारे न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी आरोपी पांडुरंग कळ्ळी याला दोषी ठरवले आणि दुपारच्या सत्रात त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
या खटल्यात मूळ फिर्यादीतर्फे ड. तोहीद जमादार यांनी बाजू मांडली, तर पैरवी कक्षातील सहायक निरीक्षक मुदस्सर शेख, उपनिरीक्षक संजय कापूरकर, शिवाजी माळी, वंदना मिसाळ आणि रेखा खोत यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










