आशा सेविकेच्या तत्परतेने माता-बाळ सुखरूप
येरळा नदीच्या काठावरची झोपडी… प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळणारी गर्भवती… घरापर्यंत पोहोचण्यास असमर्थ रुग्णवाहिका आणि पावसामुळे चिखल झालेला कच्चा रस्ता. अशा प्रतिकूल परिस्थितीत बेंद्री (ता. तासगाव) येथील आदिवासी गर्भवती महिलेला तब्बल दोन किलोमीटर पायी आणून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यात आले. आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांच्या तत्पर प्रयत्नांमुळे अखेर तिची सुरक्षित प्रसूती झाली. माता व बाळ दोघेही सुखरूप असल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कल्पना राजेश वाघमारे यांना 3 सप्टेंबर रोजी अचानक पोटात दुखू लागले. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी बेंद्री येथील आशा स्वयंसेविका विद्या सतीश कांबळे यांच्याशी संपर्क साधला. कांबळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने 108 रुग्णवाहिकेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी येळावी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तेथील रुग्णवाहिका बेंद्रीकडे रवाना केली.
दरम्यान, 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क झाल्यानंतर तासगावहून रुग्णवाहिका बेंद्रीकडे येत असल्याचे समजले. तासगाव जवळ असल्याने येळावीची रुग्णवाहिका परत पाठविण्यात आली. मात्र खरी अडचण त्यानंतर उभी राहिली.
वाघमारे यांची झोपडी येरळा नदीच्या काठावर असल्याने तेथे रुग्णवाहिका जाण्यासाठी योग्य रस्ता नव्हता. त्यामुळे प्रसूतीच्या तीव्र वेदना सहन करत कुटुंबीयांना गर्भवती महिलेला सुमारे दोन किलोमीटर पायी घेऊन यावे लागले. बेंद्रीतील एका शेताजवळ तिला रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागली.
पावसामुळे कच्चा रस्ता चिखलाचा झाल्याने रुग्णवाहिकेलाही पुढे जाण्यास अडथळे निर्माण होत होते. तरीही चालकाने परिस्थितीचा सामना करत रुग्णवाहिका शक्य तितक्या पुढे नेली. अखेर गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन तातडीने तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताच डॉक्टर तेजस किल्लेदार, डॉक्टर तानाजी पाटील आणि आरोग्य सेविका महानंदा बनने यांनी महिलेची तातडीने तपासणी केली. विशेष म्हणजे गर्भवती महिलेला आपण गर्भधारणेच्या नेमक्या कितव्या महिन्यात आहोत, याची माहिती नव्हती.
महिलेची सोनोग्राफी करणे आवश्यक असल्याने डॉक्टर किल्लेदार यांनी डॉक्टर डोंबे यांच्याशी संपर्क साधला. मात्र महिलेचे आधारकार्ड उपलब्ध नसल्याने त्यावेळी सोनोग्राफी करता आली नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉक्टर, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकेने आवश्यक ती काळजी घेत उपचार सुरू ठेवले. अखेर प्रयत्नांना यश आले आणि महिलेची प्रसूती व्यवस्थित झाली. माता व नवजात बाळ सुखरूप असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
आदिवासी व दुर्गम भागातील काही कुटुंबांमध्ये आजही प्रसूती घरीच करण्याची पद्धत आढळते. अशा वेळी गर्भवती महिलेला प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्यानंतर तातडीने आशा सेविका किंवा आरोग्य कर्मचार्यांशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बेंद्रीतील घटनेतही कुटुंबीयांनी वेळ न दवडता आशा सेविका विद्या कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रुग्णवाहिका व आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून महिलेला रुग्णालयात पोहोचविण्यात आले.
वैद्यकीय मदतीमुळे वाचले दोन जीव :
घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केला असता परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र वेळेत घेतलेला निर्णय, आशा सेविकेची तत्परता आणि डॉक्टर-आरोग्य कर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे माता व बाळ दोघेही सुखरूप राहिले. या घटनेतून दुर्गम भागातील गर्भवती महिलांसाठी संस्थात्मक प्रसूती आणि वेळेवर वैद्यकीय मदत किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










