संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पाठलाग करत धारदार शस्त्राने वार करून एका डिलिव्हरी बॉयचा खून केला. मलकापूर ता. कराड येथील समर्थनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. शहरात महिन्यात दुसरा खून झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तपासाची चक्रे गतीने फिरवत काही तासाच्या आतच पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सुनील नाथा चव्हाण (मूळ रा. लक्ष्मीनगर, चाफळ, तालुका पाटण व सध्या राहणार मलकापूर तालुका कराड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर सुरज दीपक चव्हाण व अक्षय सुरेश म्हेत्रे (दोघेही रा. चाफळ) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील चव्हाण कोल्हापूर नाका येथील एका नामांकित पिझ्झा सेंटरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो त्याच ठिकाणी वास्तव्यास असल्यामुळे अधून मधून मूळ गाव चाफळ येथे येणे जाणे होते. गावातीलच एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय त्या महिलेच्या मुलाला होता. याचा राग मनात धरून शनिवारी रात्री पार्सल पोहोचवण्यासाठी गेलेल्या सुनीलचा लाहोटीनगर ते समर्थनगर परिसरात, उपमार्गावर पाठलाग करून दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात उपमार्गावरच पडला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखील मगदूम, अशोक भापकर, पोलीस निरीक्षक दिपक वागवे, यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीलला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची चक्रे गतीने फिरवली. काही तासातच दोघा संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. तपासाला गती दिली असून खुनामागील नेमके कारण काय, हे शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान शहरात महिन्यात दुसरा खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित्यांचा माग
मलकापूर ता कराड येथील समर्थनगर समोर उपमार्गावरच सपासप वार करून खून केला. या कुणाच्या सखोल तपासासाठी अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. तपासाची गतीने चक्र फिरवत पोलिसांनी या परिसरातील सिसिटीव्ही फुटेजची तपासत संशयित आरोपीचा माग काढला. काही तासातच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.









