jayant patil news : जिल्हा बँकेत जयंतरावांच्या वर्चस्वाला धक्का

SHARE:

jayant patil news : जिल्हा बँकेत जयंतरावांच्या वर्चस्वाला धक्का : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेली 11 वर्षे एकहाती नेतृत्व सांभाळलेल्या शरद पवार राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत जबर धक्का बसला. राजकारण, अंतर्गत तडजोडी आणि विरोधाच्या नादात स्वतःचाच करेक्ट कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेत अकरा संचालक असलेली संख्या या निवडणुकीत अवघ्या चारवर आली. त्यामुळे बँकेची सत्ता धोक्यात आली असून आता सत्तेसाठी दुसर्‍याच्या कुबड्या घेण्याची वेळ आली आहे. बँकेत आता काँग्रेस सर्वाधिक सहा जागा असलेला मोठा पक्ष ठरला. मात्र जिल्हा परिषदेच्या पॅटर्नप्रमाणे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी गटच ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.

jayant patil news : जिल्हा बँकेत जयंतरावांच्या वर्चस्वाला धक्का

सर्वपक्षीय सेटलमेंटच्या नादात सत्ता धोक्यात, शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादीच्या घ्याव्या लागणार कुबड्या

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष सुरु होता. बँकेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी आहे. परंतु बँकेवर आ. जंयत पाटील यांचेच वर्चस्व राहिले. या निवडणुकीत मात्र त्यांना धक्का देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु राहिल्या. त्यांना जिल्हा बँकेच्या कारभारावरुन टार्गेट करण्यात आले. जिल्हा बँकेचा विषय भाजप नेत्यांनी राज्यभर गाजवला.

वर्षभर बँकेच्या कारभारावर सातत्याने आक्षेप घेवून बदनामी केली. निवडणुकीत भाजपा पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी प्रयत्नशिल असली तरी सत्तेचे सोपान गाठण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांचा चांगलाच कस लागणार असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला निवडणुकीची तयारी आणि सर्व जागांवर लढण्याची भाषा झाली असतानाच दुष्काळाचे कारण पुढे करून जागा वाटपाचा समझोता झाला.
निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या होत्या.

भाजपनेही एक पाऊल मागे येत दुष्काळी परिस्थितीमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन निवडणूक टाळण्याची विनंती केली. यानंतर महायुती व महाविकास आघाडीत बिनविरोध करण्याच्यादृष्टीने चर्चा झाल्या. त्यानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सात, काँग्रेस पाच, भाजप चार, शिवसेना एकनाथ शिंदे तीन व अजित पवार राष्ट्रवादी पक्ष एक असे जागा वाटप निश्चित झाले.

थेट मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून मोर्चेबांधणी केली. बिनविरोध उमेदवारांची यादी निश्चित झाली. मात्र यातही जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज सोसायटी गटाचा तिढा कायम राहिल्याने निवडणूक लागली. तसेच अनुसूचित जाती व भटक्या जाती जमाती या गटातही वेळेत अर्ज माघारी न झाल्याने निवडणूक लागली. बिनविरोधाच्या फॉर्म्युल्यात सत्ताधारी आघाडीला सहा ठिकाणी लढावे लागत आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचे चार ठिकाणी उमेदवार होते. त्यापैकी आ. रोहित पाटील यांच्या मतदारसंघातील तासगाव आणि कवठेमहांकाळ सोसायटी गटात निवडणूक झाली. माजी आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दोन हात केले होते. त्यामध्ये संजयकाकांनी दोन मतांनी सुमनताईंचा पराभव केला. कवठेमहांकाळला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील यांच्याविरोधात अजितदादा राष्ट्रवादीच नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे लढले, ते ही चार मतांनी विजयी झाले.

जतमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनिल पवार यांचे बंधू विनोद पवार यांचा ऐनवेळी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश घेवून उमेदवारी दिली. तेथे बिग फाईट होत असल्याची चर्चा राज्यभर झाली. परंतु पडळकरांनी 54 विरुद्ध 34 अशा मतांनी एकतर्फी विजय मिळविला. याशिवाय भटक्या जातीमधून शरद पवार राष्ट्रवादीचे संभाजी कचरे यांच्याविरोधात अमित पारेकर यांची लढत झाली, त्यामध्ये कचरे यांनी एकतर्फी मारली. असे असले तरी शरद पवार राष्ट्रवादीने निवडणूक झालेल्या चारपैकी तीन जागा गमावल्या. केवळ एका जागेवर यश आले.

मिरज सोसायटी गटात काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे यांच्याविरोधात अनिल शेगुणसे यांच्यातील लढतही एकतर्फी झाली. कोरे यांनी 47 विरुद्ध 19 मतांनी विजय मिळवला. अनुसूचित जाती गटात काँग्रेसचे के. डी. कांबळे यांच्याविरोधात बाबासाहेब मधाळे व विलास बेले यांच्या लढतील कांबळे यांनी विजय साकारला. सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जत वगळता सर्वत्र आघाडीचे पारडे जड असले तरी अजितदादा राष्ट्रवादीने दोन जागांवर मिळविलेला विजय शरद पवार राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणारी आहे.

जिल्हा बँकेत अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि संचालकांनी गेल्या पाच वर्षात दमदार कामगिरी झाली आहे. सोळा हजार कोटीची उलाढाल असलेल्या बॅँक राज्यातील पहिल्या पाचमध्ये समावेश झाला. कर्जवसुली आणि ठेवी वाढल्याने बँकेच्या प्रगतीत भर पडली. थकबाकी कमी झाल्याने बँकेच्या नफयात वाढ झाली आहे. बँकेच्या कारभाराची सुुरु असलेल्या चौकशीतही विद्यमान संचालकांना क्लीनचीट मिळाली होती. त्यामुळे बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकतर्फी बाजी मारणार असल्याची चर्चा सुरु होती.

मात्र बँकेत जयंतरावांचे अकरा संचालक असलेली संख्या यावेळी अवघ्या चारवर आली. त्यामुळे बँकेची सत्ता धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून बाजुला ठेवण्यासाठी सेना आणि अजितदादा राष्ट्रवादीला सोबत घेवून सत्ता स्थापन केली. आता झेड.पी चा पॅटर्न जिल्हा बँकेत येणार असल्याने शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी गटच ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहणार असल्याचे दिसून येते.

आघाडीचे नेते तहात जिंकले अन् युद्धात हरले…जिल्हा बँकेवर सातत्याने आरोपांची राळ उठविणार्‍या भाजपशी सत्ताधारी आघाडीने हातमिळवणी केली. दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये काही प्रमाणात यश आले असले तरी आघाडीच दुष्काळाच्या चक्रव्युहात अडकल्याचे स्पष्ट झाले. सहा जागांवर निवडणूक झाली असून तीन जागा गमावल्या. त्यामुळे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी तहात जिंकले, परंतु युद्धात हरल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *