सुनेसह तिघांवर गुन्हा दाखल
iswarpur crime news : मसुचीवाडीत खंडणी व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याच्या धमकीला कंटाळून वृद्धाची आत्महत्या : सुनेने पहिल्या विवाहाची माहिती लपवून, पुन्हा एकत्र नांदण्यासाठी तसेच घटस्फोटासाठी तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने, सुनेच्या माहेरकडच्या लोकांच्या मानसिक छळाला कंटाळून एका 63 वर्षीय वृद्धाने विषारी तणनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्वास नाथा फाटक (वय 63, मूळ रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) असे आत्महत्या केलेल्या सासर्यांचे नाव आहे.
iswarpur crime news : मसुचीवाडीत खंडणी व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याच्या धमकीला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
याप्रकरणी शिक्षक मुलगा ऋषिकेश विश्वास फाटक (वय 32, रा. कल्पवृक्ष प्लाझा, कराड-तासगाव रोड, पलूस, मूळ रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) यांनी फिर्याद दिली आहे. ईश्वरपूर पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजना अविनाश पवार (वय 19), अविनाश ज्ञानदेव पवार (वय 45, दोघे रा. तुपारी, ता. पलूस) आणि स्नेहल प्रवीण गलांडे (वय 33, रा. पलूस) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश फाटक यांच्याशी विवाह करताना संशयितांनी संजना हिच्या पहिल्या विवाहाबाबतची माहिती पूर्णपणे लपवून ठेवली होती. त्यानंतर 16 जानेवारी 2026 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पलूस, सांगली, बुर्ली व मसुचीवाडी येथे संशयितांनी एकत्र नांदण्यासाठी व घटस्फोटासाठी 20 लाख रुपयांची मागणी लावून धरली. ही रक्कम न दिल्यास ऋषिकेश यांचे वडील विश्वास फाटक यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू, अशी सतत धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास दिला.
या सततच्या त्रासाला व ब्लॅकमेलिंगला कंटाळून विश्वास फाटक यांनी 21 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मसुचीवाडी येथील शेतात विषारी तणनाशक प्राशन केले. त्यांना तात्काळ सांगली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान 22 ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. घटनेची ईश्वरपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










