sanjaykaka patil news : अवघ्या दोन मतांनी बदलला तीन दशकांचा इतिहास

SHARE:

sanjaykaka patil news : अवघ्या दोन मतांनी बदलला तीन दशकांचा इतिहास ” सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अवघ्या दोन मताने सुमनताई पाटील यांचा पराभव केला. वरकरणी हा विजय केवळ दोन मताचा असला, तरी त्यामागे दडलेला इतिहास तब्बल 31 वर्षांच्या संघर्षाचा, पराभवाच्या सलग आठवणींचा आणि राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईचा आहे. या एका मताने संजयकाका पाटील यांनी केवळ निवडणूक जिंकली नाही, तर गेल्या तीन दशकांपासून मनात सलत असलेला पराभवाचा डागही पुसून काढला.

sanjaykaka patil news : अवघ्या दोन मतांनी बदलला तीन दशकांचा इतिहास

आबा घराण्याच्या विरोधात 31 वर्षांच्या संघर्षानंतर संजयकाकांना यश

तासगावच्या राजकारणात चिंचणीचे संजयकाका पाटील घराणे आणि अंजनीचे आर. आर. पाटील घराणे यांच्यातील संघर्ष हा काही आजचा नाही. 1995 पासून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष अनेक निवडणुकांचा साक्षीदार ठरला. कधी प्रतिष्ठेची लढाई, कधी राजकीय वर्चस्वाची परीक्षा, तर कधी जनमताचा कौल अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून या दोन घराण्यांमधील संघर्ष पुढे सरकत राहिला.

विशेष म्हणजे, तासगाव विधानसभा मतदारसंघात या दोन्ही घराण्यांमध्ये आतापर्यंत चार वेळा थेट राजकीय सामना रंगला. मात्र, प्रत्येक वेळी विजयाचे पारडे आर. आर. पाटील घराण्याच्याच बाजूने झुकले. त्यामुळे संजयकाका पाटील घराण्यासाठी हा संघर्ष केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहिला नव्हता, तर तो राजकीय प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला होता.

1995 : संघर्षाची पहिली ठिणगी!

1995 च्या विधानसभा निवडणुकीत या दोन घराण्यांमधील राजकीय संघर्षाला पहिल्यांदा उघड स्वरूप प्राप्त झाले. चिंचणीचे दिनकरआबा पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते, तर अंजनीचे आर. आर. पाटील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलेल्या या लढतीत आर. आर. पाटील यांनी विजय मिळवला. याच निवडणुकीपासून तासगावच्या राजकारणात दोन घराण्यांमधील संघर्षाची नवी कहाणी सुरू झाली.

1999 : संजयकाका विरुद्ध आर. आर. पाटील!

1999 मध्ये पुन्हा एकदा राजकीय मैदान सजले. यावेळी दिनकरआबांऐवजी संजयकाका पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याविरोधात थेट आव्हान उभे केले. दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय ताकद पणाला लागली. मात्र, या लढतीतही विजयाचा गुलाल आर. आर. पाटील यांनीच उधळला. संजयकाकांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला.

2004 : पुन्हा सामना, पुन्हा तोच निकाल!

2004 च्या विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील आणि आर. आर. पाटील पुन्हा एकदा आमनेसामने आले. संघर्षाची धार कायम होती. राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, निकाल पुन्हा आर. आर. पाटील यांच्या बाजूने लागला. सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने संजयकाका पाटील यांच्या राजकीय प्रवासात ही लढाई एक मोठे आव्हान ठरली.

2024 : नव्या पिढीशी सामना, पण पराभवाची पुनरावृत्ती!

काळ बदलला, राजकारण बदलले आणि संघर्षाची पिढीही बदलली. आर. आर. पाटील यांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राजकीय मैदानात आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्याविरोधात पुन्हा एकदा आव्हान उभे केले. मात्र, या नव्या पिढीच्या लढाईतही संजयकाकांच्या पदरी पराभवच पडला. त्यामुळे चार विधानसभा निवडणुकांमध्ये संजयकाका घराण्याला विजयाची प्रतीक्षा कायम राहिली.

2026 : 2 मताने इतिहास बदलला!

मात्र, राजकारणात प्रत्येक पराभवाला शेवट नसतो आणि प्रत्येक संघर्षाचा निकाल कायम एकसारखा लागत नसतो. कधी काळाच्या ओघात समीकरणे बदलतात, तर कधी एका मताने इतिहासाला नवे वळण मिळते.

सांगली जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तासगाव सोसायटी गटातून संजयकाका पाटील यांनी सुमनताई पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव केला आणि तब्बल 31 वर्षांच्या संघर्षाला नवे वळण दिले.
ज्या तासगावच्या राजकीय मैदानात चार वेळा पराभवाचे चटके सहन करावे लागले, त्याच तासगावच्या सहकार क्षेत्रात अखेर संजयकाका पाटील घराण्याने विजयाचा झेंडा रोवला.

हा विजय मतांच्या आकडेवारीत एका मताचा असला, तरी राजकीय इतिहासाच्या पानांवर त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण हा केवळ सुमनताई पाटील यांच्याविरोधातील विजय नाही, तर 1995 पासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.
31 वर्षांचा संघर्ष, चार विधानसभा निवडणुकांतील पराभव आणि अखेर सहकाराच्या मैदानात मिळालेला विजय!

काळाने जणू संजयकाका पाटील यांच्या संघर्षाला अखेर उत्तर दिले आहे. तासगावच्या राजकारणात एका मताने नवा इतिहास लिहिला गेला असून, चिंचणी आणि अंजनी या दोन राजकीय घराण्यांमधील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे.

कारण राजकारणात कधी कधी मोठा इतिहास घडवण्यासाठी मोठ्या मताधिक्याची गरज नसते; अवघे एक मतही तीन दशकांचा इतिहास बदलून टाकू शकते!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *