sugar factory news : सांगलीतील कारखानदार कधी तोंड उघडणार?

SHARE:

sugar factory news : सांगलीतील कारखानदार कधी तोंड उघडणार? : उसाचा हंगाम सुरू झाला… शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस तोडणीसाठी बाहेर पडू लागला… साखर कारखान्यांची धुराडी पेटू लागली… मात्र ज्या शेतकर्‍यांच्या घामावर या कारखान्यांचे आर्थिक साम्राज्य उभे आहे, त्याच शेतकर्‍यांच्या उसाला यंदा नेमका किती दर मिळणार, याबाबत सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप मौन सोडलेले नाही. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी दराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असताना सांगली जिल्ह्यातील कारखानदार मात्र अद्यापही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे सांगलीच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मनातील अस्वस्थता आता संतापात रूपांतरित होताना दिसत आहे.

sugar factory news : सांगलीतील कारखानदार कधी तोंड उघडणार?

कोल्हापुरात दराची घोषणा, सांगलीत मात्र कमालीची शांतता; ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा संताप अनावर!

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या ऊस दरासाठी आक्रमक भूमिका घेतली. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिटन 5 हजार 500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी संघटनेने जोरदार आंदोलन उभारले. पुणे-बंगळूर महामार्ग तब्बल 60 तास रोखून धरत सरकार आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी दराबाबत आपली भूमिका जाहीर केली.

पहिल्या हप्त्यापोटी 3 हजार 900 रुपये, कारखाना बंद झाल्यानंतर आणखी 100 रुपये आणि त्यानंतर साखरेच्या बाजारभावाचा आढावा घेऊन अतिरिक्त 200 रुपये देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली. म्हणजेच एकूण 4 हजार 200 रुपयांपर्यंत दर देण्याची घोषणा झाली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला.

मात्र, कोल्हापुरातील कारखानदारांनी दराची घोषणा केली असताना सांगलीतील कारखानदारांना मात्र अद्याप दर जाहीर करण्याची गरज वाटलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांना शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आवाज ऐकू गेला; मग सांगलीतील कारखानदारांच्या कानापर्यंत शेतकर्‍यांचा आक्रोश का पोहोचत नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाढला, मग उसाचा दर का नाही?

गत हंगामात सांगली जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी प्रतिटन 3 हजार 400 ते 3 हजार 500 रुपयांच्या आसपास दर दिला होता. मात्र यंदाचे आर्थिक गणित वेगळे आहे. साखरेचे बाजारभाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, औषधांचे दर वाढले, मजुरी महागली, वाहतूक खर्च वाढला आणि पाणीपट्टीच्या दरातही मोठी वाढ झाली. शेती करण्यासाठी लागणारा प्रत्येक घटक महाग होत असताना शेतकर्‍यांच्या उसाला मिळणारा दर मात्र समाधानकारक असावा, ही अपेक्षा रास्त नाही काय?

एकीकडे साखर कारखाने साखरेच्या विक्रीतून उत्पन्न मिळवत आहेत, उपपदार्थांतून आर्थिक गणित मजबूत करत आहेत; दुसरीकडे ऊस पिकवणारा शेतकरी मात्र वाढत्या खर्चाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. कारखान्यांच्या प्रगतीचा पाया असलेल्या शेतकर्‍यालाच त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळणार नसेल, तर या सहकार चळवळीच्या यशाला अर्थ तरी काय?

राजू शेट्टींचा अल्टिमेटमही सांगलीतील कारखानदारांनी गांभीर्याने घेतला नाही?

दर जाहीर करण्यासाठी राजू शेट्टी यांनी दिवाळीपूर्वीच सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. दोन दिवसांत दर जाहीर करा, अन्यथा कारखाने बंद पाडू, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. मात्र या इशार्‍याला आता चार दिवस उलटून गेले, तरी एकाही कारखान्याने अधिकृतपणे आपला ऊस दर जाहीर केलेला नाही.

याहून आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीलाही सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी म्हणावी तशी उपस्थिती लावली नाही. या बैठकीला सांगली साखर कारखान्याचे चेअरमन खासदार विशाल पाटील हे एकमेव उपस्थित होते. जिल्ह्यातील इतर कारखानदारांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले.
सांगलीतील शेतकर्‍यांनीच आंदोलनाची वाट पाहायची का?

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी दर जाहीर केला, तर सांगलीतील कारखानदारांनीही त्याच धर्तीवर दर जाहीर करावा, अशी मागणी आता विविध शेतकरी संघटनांकडून होत आहे. शेतकर्‍यांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष दराची घोषणा हवी आहे. कारण ऊस कारखान्यात गेला की शेतकर्‍याच्या हातातील सौदेबाजीची ताकद कमी होते. त्यामुळे गाळप सुरू होण्यापूर्वीच दराबाबत स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे.

सांगली जिल्हा हा ऊस उत्पादन आणि सहकार चळवळीचा महत्त्वाचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांचे साखर कारखाने आहेत. सहकाराच्या माध्यमातून राजकीय आणि आर्थिक ताकद निर्माण केलेल्या या नेत्यांनी आता शेतकर्‍यांच्या प्रश्नावरही तितक्याच ताकदीने पुढे येण्याची गरज आहे.

आता मौन सोडा, दर जाहीर करा!

सध्या सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मनात एकच प्रश्न आहे. कोल्हापुरातील कारखानदारांनी दर जाहीर केला, आंदोलनाची दखल घेतली, शेतकर्‍यांशी संवाद साधला; मग सांगलीतील कारखानदार कधी तोंड उघडणार?
कारखानदारांनी आता मौन सोडून आपली भूमिका स्पष्ट करावी. कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनाही न्याय मिळणार की पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडणार?

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *