पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सहा आठवड्यांत चौकशी करा! : न्यायाधिकरणाच्या आदेशाने उडाली खळबळ. जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्यांवरून सुरू असलेल्या वादात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. बदल्यांमध्ये पक्षपात, मेहरबानी किंवा द्वेषभावनेचा वापर झाला आहे का, याची पोलिस आस्थापना मंडळाने सखोल तपासणी करावी, असे निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक तक्रारींचे निवारण करून त्यांना पूर्वीच्या पदांवर पुन्हा नियुक्त करण्याच्या शक्यतांचाही विचार करण्यास सांगितले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सहा आठवड्यांत चौकशी करा! : न्यायाधिकरणाच्या आदेशाने उडाली खळबळ.
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी सांगलीच्या तत्कालीन अधीक्षकांनी काढलेल्या बदली आदेशावरून संबंधित चार अधिकाऱ्यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली होती. त्यात मिरज शहरचे पोलिस निरीक्षक निरीक्षक किरण रासकर, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, निरीक्षक महेंद्र दोरकर, कुपवाड एमआयडीसीचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर, प्रवीण घाडगे यांचा त्यात समावेश होता. या प्रकरणात निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी न्यायाधिकरणाने पोलिस अधीक्षकांवर सोपवली आहे.
केवळ बदलीचा आदेश काढला म्हणून प्रकरण संपत नाही, तर त्या निर्णयामागील कारणेही तपासली जाणार आहेत. संबंधित बदल्यांमध्ये कोणाला अनुचित पद्धतीने झुकते माप दिले गेले का? काही अधिकाऱ्यांवर मेहरबानी दाखविण्यात आली का? किंवा काहींच्या बदल्या द्वेषभावना, पूर्वग्रह अथवा पक्षपातातून करण्यात आल्या का, याची सखोल तपासणी करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
यासाठी पोलिस आस्थापना मंडळाने सविस्तर पुनरावलोकन करावे. बदल्यांबाबत वरिष्ठता आणि गुणवत्ता या निकषांसोबतच संबंधित अधिकाऱ्यांची पदासाठीची पात्रता व उपयुक्तताही विचारात घ्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलातील वादग्रस्त बदल्यांच्या प्रकरणात आता अधीक्षक आणि आस्थापना मंडळ कोणती भूमिका घेते, याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह दलाचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











