जयंतरावांची जमवाजमव, भाजपमध्ये अस्वस्थता

SHARE:

जयंतरावांची जमवाजमव, भाजपमध्ये अस्वस्थता

जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजकारण तापले, सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चेच्या फेर्‍या सुरु

जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपताच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांना सोबत घेवून सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चेच्या फेर्‍या सुरु केल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या पॅनलबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काही नेतेही जयंतरावांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
मागील महिन्याभरापूर्वीच आ. जयंत पाटील यांनी बँकेच्या आगामी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावासाठी आपले नाव समाविष्ट व्हावे, यासाठी काही सहकारी संस्थांच्या संचालकांवर दबाव आणण्यात आल्याचे प्रकार समोर आले. काही ठिकाणी माणसे पळवून नेणे आणि दहशतीच्या वातावरणात ठराव करण्याचे प्रकार घडले. सांगली जिल्ह्यात यापूर्वी निवडणुका खुलेपणाने आणि लोकशाही मार्गाने लढण्याची परंपरा राहिली आहे. माणसे पळवून नेणे अथवा दहशतीच्या जोरावर सत्ता मिळविण्याची प्रथा जिल्ह्यात कधीच नव्हती. मात्र, अशा प्रकारांना सुरुवात झाली तर ते सहकारासाठी अत्यंत घातक असल्याचा इशारा देत बँकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली.
मागील पाच वर्षात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. बँकेत चुकीचे काहीही घडलेले नसून संचालक मंडळाने विश्वासाने कामकाज केले आहे,. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार उत्तम सुरू असतानाही काही मंडळींनी बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. आता गणेशोत्सवानंतर निवडणूक जाहीर होणार असल्याचे स्पष्ट आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगली होती.
जिल्हा बँकेच्या वाटचालीत खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांचीही चांगली साथ मिळाली, त्यामुळे खासदार पाटील आणि आमदार कदम यांच्यासोबत समेट कायम ठेवून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे तीन संचालक आहेत, त्यांनी पुन्हा तीन जागांची मागणी सत्ताधारी नेत्यांकडे केली आहे. सेना जवळपास जयंतरावांच्या पॅनेलसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट दिसते. रिझव्हर्र् बँकेने दहा वर्षे पूर्ण झालेल्याना पुन्हा सहकारी बँकांमध्ये संचालक होता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे हा मुद्दा ही जयंतरावांनी अग्रस्थानी घेतला आहे. मात्र सहकार विभागाने रिझर्व बँकेच्या आज आदेशाचे रूपांतर कायद्यात केलेली नाही. त्यामुळे दहा वर्षे झालेले काही संचालक पुन्हा दिसणार आहेत. जयंतराव आणि स्वतःच्या पक्षासह काँग्रेस बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा नेत्यासोबत ही सकारात्मक चर्चा केल्याचे समजते. काही तालुक्यात थेट जाऊन त्यांनी नेते आणि मतदारांशी संवाद साधला आहे. त्यामुळे गतवेळी झालेले आघाडीचे पॅनेल यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे.
जिल्ह्यातील भाजप आणि मित्र पक्षाच्या आमदारांनी जिल्हा बँकेतील काही प्रकरणावरुन सत्ताधारी गटाचे नेते जयंत पाटील यांना टार्गेट केले. नोकरभरती असो अथवा कर्ज प्रकरणावरून जिल्हा बँकेला वेळोवेळी सहकार विभागाच्या माध्यमातून नोटीसा पाठवून संचालकांची कोंडी केली. बँकेत भाजपचे संचालक असूनही त्या आमदारांमुळे मुख्यमंत्र्यांपर्यंत बँकेची भूमिका पाठवून देण्यात अपयश आले. निवडणूक अवघ्या काही दिवसावर आली असली तरी भाजपमध्ये पॅनेलबाबत संभ्रमावस्था आहे आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध गटातून झालेले ठराव आणि निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे यावरूनही मतभेद आहेत. निवडणूक लढवून सत्ता स्थापन करण्या इतपत त्यांच्याकडे मतदार असल्याचे दिसून येत नाही. काही गटामध्ये भाजपची सरशी होऊ शकते. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निवडणुकीबाबत कोणती भूमिका घेणार यावर भाजपची गणित अवलंबून आहेत.
निवडणुकीचे रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी आघाडीचे पारडे जड दिसत आहे. या कारणांनी भाजपमधील काही नेते आघाडीचे नेते जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले काही संचालक जयंतरावांच्या भेटीसाठी घेत आहेत. भाजपच्या पॅनलमधून निवडून येण्याची शाश्वती नाही, आम्हाला तुमच्या पॅनलमधून संधी द्यावी, अशी आग्रही मागणी ते संचालक करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होताच पॅनेलबाबतचे चित्र समोर येणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *