सोलापुरात 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर अनोखे आंदोलन
कुणी लग्नासाठी मुलगी देता का मुलगी? असा उद्विग्न सवाल विचारत सोलापूर जिल्ह्यातील एका 28 वर्षीय तरुणाने थेट जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील रहिवासी किसनदेव दत्तात्रेय ननावरे असे या तरुणाचे नाव असून, शेतकरी आणि बेरोजगार असल्यामुळे वय उलटून चालले तरी लग्न जमत नसल्याची टोकाची व्यथा त्याने या आंदोलनातून मांडली आहे. या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
किसनदेव ननावरे यांच्याकडे स्वतःची अर्धा एकर शेती असून, सध्या त्यांच्याकडे रोजगार नाही. आजकालच्या काळात मुली आणि त्यांचे पालक केवळ उच्चशिक्षित, सरकारी नोकरदार किंवा भरभक्कम पगार असणार्या मुलालाच लग्नासाठी पहिली पसंती देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी आणि बेरोजगार तरुणांची लग्नाची वये उलटून चालली तरी त्यांना कोणी मुलगी देण्यास तयार होत नाही. ग्रामीण भागातील या भीषण आणि वास्तववादी सामाजिक समस्येकडे शासन व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी किसनदेव यांनी हे आंदोलन छेडल्याचे सांगितले.
आंदोलकाकडून शासनाकडे प्रमुख मागण्या
शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळवून देण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत ’सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र’ सुरू करण्यात यावे.
लग्न जुळल्यानंतर अशा विवाहबद्ध होणार्या तरुणांना शासनाकडून 1 लाख रुपयांचे विशेष लग्न अनुदान द्यावे.
संसारासाठी हक्काचा निवारा मिळावा म्हणून 2 लाख रुपयांचे घरकुल तातडीने मंजूर केले जावे.
स्वावलंबनासाठी आणि स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना 2 लाख रुपयांचे विनाजामीनदार व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे.
ग्रामीण भागात शेतकरी पुत्रांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. ननावरे यांनी मांडलेल्या या व्यथेची प्रशासनाने किती गांभीर्याने दखल घेतली आहे आणि यावर शासन काय तोडगा काढणार, याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











